Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › ऑक्टोबर 2026 › 31 ऑक्टोबर

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 18 ऑक्टोबर (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 31 ऑक्टोबर 2026

शनिवार · पेन्टेकॉस्टनंतरचा 22वा आठवडा · स्वर 4

सण आणि संत

Holy Apostle and Evangelist Luke (1st C)

उपवास

उपवास नाही

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

संध्याप्रार्थना: वाचन

1 योहा 1:1–7

1जे आरंभापासून होते, ते आम्ही ऐकले आहे, आमच्या डोळ्यांनी आम्ही जे पाहिले आणि न्याहाळले आहे, जे आमच्या हातांनी हाताळले त्याच जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. 2ते जीवन आम्हास प्रकट झाले. आम्ही ते पाहिले आहे; त्याविषयी आम्ही साक्ष देतो आणि आम्ही त्या सार्वकालिक जीवनाविषयी तुम्हास घोषणा करीत आहोत. ते जीवन पित्याजवळ होते आणि ते आम्हास प्रकट केले गेले. 3आम्ही जे पाहिले व ऐकले आहे ते आम्ही आता तुम्हांलाही घोषित करीत आहोत, यासाठी की तुमचीही आमच्यासोबत सहभागिता असावी. आमची सहभागिता तर देवपिता व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याजबरोबर आहे. 4तुमचा-आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही या गोष्टी तुम्हास लिहितो. 5जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तोच आम्ही तुम्हास सांगत आहोत, देव प्रकाश आहे आणि त्याच्याठायी मुळीच अंधार नाही. 6जर आम्ही म्हणतो की, आमची देवाबरोबर सहभागिता आहे पण पापाच्या अंधारामध्ये आम्ही जगतो तर आम्ही खोटे बोलत आहोत व सत्याला अनुसरत नाही. 7पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते.

संध्याप्रार्थना: वाचन

याको 1:1–12

1याकोब, देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक, याजकडून, जगभर पांगलेल्या, विश्वास ठेवणाऱ्या बारा यहूदी वंशांना नमस्कार. 2माझ्या बंधूंनो, ज्या ज्या वेळी तुमच्यावर निरनिराळया परीक्षा येतात तेव्हा तुम्ही आनंदच माना. 3तुम्हास माहीत आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेमुळे सहनशीलता निर्माण होते. 4आणि त्या सहनशीलतेला आपले कार्य पूर्ण करू द्या. यासाठी की तुम्ही प्रौढ, परिपूर्ण व कोणत्याही बाबतीत कमतरता नसलेले असे पूर्ण व्हावे. 5म्हणून जर तुमच्यातील कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने देवाकडे मागावे म्हणजे ते त्यास मिळेल कारण तो दोष न लावता सर्वांस उदारपणे देतो. 6पण त्याने विश्वासाने मागावे व संशय धरू नये कारण जो संशय धरतो तो वाऱ्यामुळे लोटलेल्या व उचबंळलेल्या समुद्रातील लाटेसारखा आहे. 7अशा मनुष्यांने असा विचार करू नये की, प्रभूपासून त्यास काही प्राप्त होईल. 8कारण तो द्विमनाचा असून तो सर्व मार्गात अस्थिर असतो. 9दीन असलेल्या बंधूने, आपल्या उच्चपणाविषयी अभिमान बाळगावा. 10आणि श्रीमंत बंधूने आपल्या दीन स्थितीविषयी अभिमान बाळगावा कारण तो एखाद्या गवताच्या फुलासारखा नाहीसा होईल. 11सूर्य त्याच्या तीव्र तेजाने उगवला आणि त्याने गवत कोमजवले. मग त्याचे फुल गळून पडले व त्याच्या रुपाची शोभा नाहीशी झाली. त्याचप्रमाणे श्रीमंत मनुष्यदेखील त्याच्या उद्योगात भरात कोमेजून जाईल. 12जो परीक्षा सोसतो तो धन्य आहे कारण परीक्षेत उतरल्यावर जो जीवनाचा मुकुट प्रभूने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांस देऊ केला आहे तो त्यास मिळेल.

संध्याप्रार्थना: वाचन

यहू 1:1–7, 17–25

1येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा भाऊ यहूदा ह्याजकडून पत्र; देवपित्याला प्रिय असलेल्या व ख्रिस्त येशूसाठी त्याने राखलेल्या, अशा सर्व बोलावलेल्यांस 2दया, शांती व प्रीती ही तुम्हास विपुल मिळत राहो. 3प्रियांनो, मी आपल्या सामाईक तारणाविषयी तुम्हास लिहिण्याचा प्रयत्न करीत असता, मला हे आवश्यक वाटले की, जो विश्वास पवित्रजनांना सर्वकाळसाठी एकदा दिला, तो राखण्याविषयी मी तुम्हास लिहून उत्तेजन द्यावे. 4कारण, जे या दंडासाठी पूर्वीपासून नेमलेले, असे कित्येकजण चोरुन आत आले आहेत; ते भक्तिहीन लोक आहेत, त्यामुळे ते आपल्या देवाची कृपा पालटून तिला कामातुरपणाचे स्वरूप देवून आपला एकच स्वामी व प्रभू येशू ख्रिस्त ह्याला नाकारतात. 5जरी तुम्हास हे पूर्वीपासून माहीती आहे तरी मी तुम्हास हे आठवून घावे अशी माझी इच्छा आहे की, परमेश्वराने त्या लोकांस मिसर देशातून वाचवल्यावर ज्यांनी विश्वास ठेवला नाही त्यांना त्याने नंतर नष्ट केले; 6आणि ज्या देवदूतांनी आपले अधिकारपद न सांभाळता आपले स्वतःचे योग्य वस्तीस्थान सोडले त्यांना त्याने सर्वकाळच्या बंधनामध्ये निबीड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरिता राखून ठेवले आहे; 7सदोम व गमोरा आणि त्यांच्या आसपासची इतर नगरे, ह्यांनी त्यांच्याप्रमाणेच जारकर्मे केली व परदेहाच्या मागे लागली आणि ती उदाहरण म्हणून, सर्वकाळच्या अग्नीची शिक्षा भोगीत ठेवली आहेत. 17पण प्रियांनो, तुम्ही तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची तुम्ही आठवण करा; 18त्यांनी तुम्हास म्हणले होते की, “शेवटच्या काळात टवाळखोर माणसे उठतील व आपल्या भक्तिहीन वासनांप्रमाणे चालतील.” 19हे फूट पाडणारे लोक देहबुद्धी स्वभावाचे, आत्मा नसलेले लोक आहेत. 20पण प्रियांनो, तुम्ही आपल्या परमपवित्र विश्वासावर आपली रचना करीत राहून पवित्र आत्म्याने प्रार्थना करा, 21तुम्ही सर्वकाळच्या जीवनासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या दयेची प्रतीक्षा करीत स्वतःला देवाच्या प्रीतीत राखा. 22जे संशय धरतात त्यांच्यावर तुम्ही दया करा; 23आणि काहींना अग्नीतून ओढून काढून वाचवा. काही जणांवर तुम्ही भीत भीत दया करा; पण हे करताना देहामुळे डागाळलेल्या वस्त्रांचाही द्वेष करा. 24आता, तुम्हास अढळ राखण्यास आणि आपल्या गौरवी समक्षतेत हर्षाने, निष्कलंक उभे करण्यास जो समर्थ आहे 25असा जो एकच देव आपला तारणारा त्यास येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याद्वारे गौरव, महिमा, पराक्रम आणि अधिकारही युगांच्या आधीपासून, आता आणि युगानुयुग आहेत. आमेन.

प्रातःप्रार्थना: शुभवर्तमान

योहा 21:15–25

15मग त्यांची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणतो, “माझी कोकरे चार.” 16तो पुन्हा दुसऱ्यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणाला, “माझी मेंढरे राख.” 17तो तिसर्‍यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” पेत्र दुःखी होऊन त्यास म्हणाला, “प्रभू, तुला सर्व माहीत आहे, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” येशू त्यास म्हणतो, “माझी मेंढरे चार.” 18“मी तुला खरे खरे सांगतो, तू जेव्हा तरुण होतास तेव्हा आपली कंबर बांधून तुझी इच्छा असेल तिकडे जात होतास; पण तू म्हातारा होशील तेव्हा हात पुढे करशील, दुसरा तुझी कंबर बांधील आणि तुझी इच्छा नसेल तिकडे तुला नेईल.” 19तो कोणत्या मरणाने देवाचे गौरव करणार होता हे प्रकट करायला तो हे बोलला आणि हे बोलल्यावर तो त्यास म्हणतो, “माझ्यामागे ये.” 20तेव्हा पेत्र मागे वळला आणि पाहतो की, ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती जो भोजनाच्या वेळी त्याच्या छातीशी टेकला असता मागे लवून ‘प्रभू, तुला धरून देणारा तो कोण आहे?’ असे म्हणाला होता, त्यास त्याने मागे चालतांना पाहिले. 21म्हणून, त्यास बघून, पेत्र येशूला म्हणाला, “प्रभू, ह्याचे काय?” 22येशूने त्यास म्हटले, “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर त्याचे तुला काय? तू माझ्यामागे ये.” 23तेव्हा बांधवांत हे बोलणे पसरले की, तो शिष्य मरणार नाही. पण येशू त्यास म्हणाला नव्हता की, तो मरणार नाही, पण “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर तुला काय?” 24जो या गोष्टींची साक्ष देतो व ज्याने या गोष्टी लिहिल्या आहेत तोच हा शिष्य आहे; आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हास माहीत आहे. 25आणि ह्याशिवाय येशूने केलेली पुष्कळ कृत्ये आहेत; ती एकएक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात देखील मावणार नाहीत असे मला वाटते.

प्रेषितांचे पत्र

2 करिं 5:1–10

1कारण आम्ही हे जाणतो की, आमचे हे जगिक घर ज्यामध्ये आम्ही राहतो, नष्ट झाले तर आम्हास देवापासून मिळालेले सर्वकाळचे घर स्वर्गात आहे. 2या तंबूत आम्ही कण्हत आहोत आणि आमच्या स्वर्गातील घराचा पोशाख करण्यास आम्ही आतुर झालो आहोत. 3आम्ही अशाप्रकारे वस्त्र परिधान केलेले असलो म्हणजे आम्ही उघडे सापडणार नाही. 4कारण या मंडपात असलेले आम्ही आमच्यावर भार पडल्यामुळे कण्हतो पण आमचे वस्त्र काढले जावे असे इच्छीत नाही, तर आमचा स्वर्गीय पोशाख घातला जावा म्हणजे हे मरणाधीनपण जीवनात गिळले जावे. 5आणि याच एका गोष्टीसाठी ज्याने आम्हास तयार केले तो देव आहे आणि त्यानेच आम्हास पवित्र आत्मा हा विसार दिला आहे. 6म्हणून आम्ही सतत धैर्य धरणारे आहोत कारण आम्ही हे जाणतो की आम्ही शरीरात राहत असताना प्रभूपासून दूर आहोत. 7कारण आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही; 8आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर होऊन प्रभूजवळ राहण्यास आम्ही तयार आहोत. 9म्हणून आम्ही झटत आहोत, म्हणजे आम्ही येथे किंवा तेथे असलो, तरी देवाला संतोष देणारे असे असावे. 10कारण आपल्याला, प्रत्येक जणाला, ख्रिस्ताच्या न्यायासनापुढे प्रकट झाले पाहिजे; ह्यासाठी की, शरीरात केलेल्या गोष्टींबद्दल प्रत्येक मनुष्यास त्याने जे जे केले असेल त्याचे प्रतिफळ मिळावे. ते चांगले असेल किंवा वाईट असेल.

प्रेषितांचे पत्र (संत लूक यांच्यासाठी)

कल 4:5–9, 14, 18

5बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञानीपणाने वागा. संधी साधून घ्या. 6तुमचे बोलणे नेहमी कृपायुक्त, मिठाने रूचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे. 7माझा प्रिय बंधू तुखिक, प्रभूमधील विश्वासू सेवक व माझ्यासोबतीचा दास हा माझ्याविषयी सर्व गोष्टी तुम्हास कळवील. 8मी त्यास त्याच हेतूने तुमच्याकडे पाठवले आहे की, म्हणजे आमच्याविषयीच्या सर्व गोष्टी त्याने तुम्हास कळवून तुमच्या मनाचे समाधान करावे. 9मी त्याच्याबरोबर विश्वासू व प्रिय बंधू अनेसिम, जो तुमच्यांतलाच आहे त्यालाही पाठवले आहे; ते तुम्हास येथील सर्व गोष्टी कळवतील. 14प्रिय वैद्य लूक आणि देमास हे तुम्हास सलाम सांगतात. 18मी पौलाने स्वहस्ते लिहीलेला सलाम; मी बंधनात आहे याची आठवण ठेवा. तुम्हांबरोबर कृपा असो.

शुभवर्तमान

लूक 6:1–10

1नंतर असे झाले की, एका शब्बाथ दिवशी येशू शेतामधून जात होता आणि त्याचे शिष्य कणसे मोडून हातावर चोळून खात होते. 2मग परूश्यांपैकी काही म्हणाले, “शब्बाथ दिवशी जे करण्यास योग्य नाही, ते तुम्ही का करता?” 3येशूने त्यांना म्हटले, “जेव्हा दावीद व त्याच्याबरोबरच्या मनुष्यांना भूक लागली तेव्हा त्यांनी काय केले हे तुम्ही कधी वाचले नाही काय? 4तो देवाच्या घरात गेला आणि ज्या समर्पित भाकरी याजकांशिवाय कोणीच खाणे योग्य नाही त्या त्याने कशा घेऊन खाल्ल्या व आपल्याबरोबर जे होते त्यांनाही दिल्या.” 5आणखी येशू त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा प्रभू आहे.” 6असे झाले की, दुसऱ्या एका शब्बाथ दिवशी येशू सभास्थानात गेला आणि शिकवू लागला. ज्याचा उजवा हात वाळलेला होता असा एक मनुष्य तेथे होता. 7येशू शब्बाथ दिवशी कोणाला बरे करतो की काय हे पाहण्यासाठी नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी त्याच्यावर लक्ष ठेवून होते. यासाठी की त्यांना आरोप ठेवण्यासाठी काहीतरी कारण मिळावे. 8परंतु तो त्यांचे विचार जाणून वाळलेल्या हाताच्या मनुष्यास म्हणाला, “ऊठ आणि सर्वांसमोर उभा राहा,” आणि तो मनुष्य उठून तेथे उभा राहिला. 9येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास विचारतो, शब्बाथ दिवशी कोणत्या गोष्टी करायला परवानगी आहे? चांगले करणे की वाईट करणे? कोणते कायदेशीर आहे, एखाद्याचा जीव वाचवणे का त्याचा नाश करणे?” 10मग त्याने सभोवती त्या सर्वांकडे पाहीले आणि म्हणाला, “तू आपला हात लांब कर.” तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात बरा झाला.

शुभवर्तमान (संत लूक यांच्यासाठी)

लूक 10:16–21

16जो शिष्यांचे ऐकतो तो माझे ऐकतो आणि जो शिष्यांना नाकारतो तो मला नाकारतो आणि जो मला नाकारतो तो ज्याने मला पाठवले त्यास नाकारतो.” 17ते सत्तर लोक आनंदाने परतले आणि म्हणाले, “प्रभू, तुझ्या नावाने भूतेसुद्धा आम्हास वश होतात!” 18तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मी सैतानाला आकाशातून विजेसारखे पडताना पाहिले! 19पाहा, मी तुम्हास साप आणि विंचू यांना तुडविण्याचा व शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिला आहे आणि कशानेच तुम्हास अपाय होणार नाही. 20तथापि तुम्हास दुष्ट आत्मे वश होतात याचा आनंद मानू नका तर तुमची नावे स्वर्गात लिहिली आहेत याचा आनंद माना.” 21त्या क्षणी तो पवित्र आत्म्यात आनंदीत झाला आणि म्हणाला, “हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू मी तुझी स्तुती करतो, कारण तू या गोष्टी ज्ञानी आणि बुद्धीमान लोकांपासून लपवून ठेवून त्या लहान बालकांस प्रकट केल्या आहेस. होय, पित्या कारण तुला जे योग्य वाटले ते तू केलेस.

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 18 ऑक्टोबर म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 31 ऑक्टोबर. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क