Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › नोव्हेंबर 2026 › 1 नोव्हेंबर

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 19 ऑक्टोबर (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 1 नोव्हेंबर 2026

रविवार · स्वर 5

सण आणि संत

पेन्टेकॉस्टनंतरचा 22वा रविवार

उपवास

उपवास नाही

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

प्रातःप्रार्थनेचे 11वे शुभवर्तमान

योहा 21:15–25

15मग त्यांची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणतो, “माझी कोकरे चार.” 16तो पुन्हा दुसऱ्यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणाला, “माझी मेंढरे राख.” 17तो तिसर्‍यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” पेत्र दुःखी होऊन त्यास म्हणाला, “प्रभू, तुला सर्व माहीत आहे, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” येशू त्यास म्हणतो, “माझी मेंढरे चार.” 18“मी तुला खरे खरे सांगतो, तू जेव्हा तरुण होतास तेव्हा आपली कंबर बांधून तुझी इच्छा असेल तिकडे जात होतास; पण तू म्हातारा होशील तेव्हा हात पुढे करशील, दुसरा तुझी कंबर बांधील आणि तुझी इच्छा नसेल तिकडे तुला नेईल.” 19तो कोणत्या मरणाने देवाचे गौरव करणार होता हे प्रकट करायला तो हे बोलला आणि हे बोलल्यावर तो त्यास म्हणतो, “माझ्यामागे ये.” 20तेव्हा पेत्र मागे वळला आणि पाहतो की, ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती जो भोजनाच्या वेळी त्याच्या छातीशी टेकला असता मागे लवून ‘प्रभू, तुला धरून देणारा तो कोण आहे?’ असे म्हणाला होता, त्यास त्याने मागे चालतांना पाहिले. 21म्हणून, त्यास बघून, पेत्र येशूला म्हणाला, “प्रभू, ह्याचे काय?” 22येशूने त्यास म्हटले, “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर त्याचे तुला काय? तू माझ्यामागे ये.” 23तेव्हा बांधवांत हे बोलणे पसरले की, तो शिष्य मरणार नाही. पण येशू त्यास म्हणाला नव्हता की, तो मरणार नाही, पण “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर तुला काय?” 24जो या गोष्टींची साक्ष देतो व ज्याने या गोष्टी लिहिल्या आहेत तोच हा शिष्य आहे; आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हास माहीत आहे. 25आणि ह्याशिवाय येशूने केलेली पुष्कळ कृत्ये आहेत; ती एकएक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात देखील मावणार नाहीत असे मला वाटते.

प्रेषितांचे पत्र

गल 6:11–18

11पाहा, किती मोठ्या अक्षरात, मी तुम्हास स्वतःच्या हाताने लिहित आहे. 12जितके दैहिक गोष्टींचा डौल मिरवू पाहतात असे तितके ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे त्यांचा छळ होऊ नये म्हणूनच तुम्हास सुंता करून घेण्यास भाग पाडतात; 13कारण ज्यांची सुंता झाली आहे ते स्वतः तर नियमशास्त्र पाळीत नाहीत पण तुमच्या देहावरून नावाजून घेण्यासाठी, म्हणून, तुमची सुंता व्हावी अशी त्यांची इच्छा बाळगतात. 14आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्यापासून दूर राहो पण ज्याच्या द्वारे जग मला आणि मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे. 15कारण सुंता होण्यात किंवा सुंता न होण्यात काही नाही, तर नवी उत्पत्ती हीच काय ती होय. 16आणि जे या नियमाने चालतात अशा सर्वांवर व देवाच्या इस्राएलावर शांती व दया असो. 17आतापासून कोणी मला त्रास देऊ नये, कारण मी आपल्या शरीरावर येशूच्या खुणा धारण केल्या आहेत. 18बंधूंनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या बरोबर असो. आमेन.

शुभवर्तमान

लूक 8:5–15

5“पेरणारा आपले बी पेरायला निघाला; आणि तो पेरीत असता काही बी पाय वाटेवर पडले आणि ते तुडवले गेले व आकाशातील पाखरांनी ते खाऊन टाकले. 6आणि काही खडकाळीवर पडले आणि ते उगवल्यावर वाळून गेले, कारण त्यास ओलावा नव्हता. 7आणि काही काटेरी झाडाझुडपांमध्ये पडले आणि झाडाझुडपांबरोबर वाढून त्याची वाढ खुंटवली. 8आणि काही चांगल्या जमिनीवर पडले आणि ते उगवून त्यास शंभरपट पीक आले.” असे म्हटल्यावर तो मोठ्याने म्हणाला, “ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.” 9तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्यास विचारले, या दाखल्याचा अर्थ काय आहे? 10मग तो म्हणाला, “देवाच्या राज्याची गुजे जाणण्याची देणगी तुम्हास दिली आहे, परंतु बाकीच्या लोकांस ती दाखल्यांनी सांगितली आहेत, यासाठी की त्यांनी दिसत असता पाहू नये व त्यांनी ऐकत असता समजू नये. 11तर दाखला हा आहे बी हे देवाचे वचन आहे. 12आणि जे वाटेवरचे ते ऐकणारे आहेत, पण त्यानंतर सैतान येतो आणि त्यांनी विश्वास धरून तारण पावू नये म्हणून त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो. 13आणि जे खडकाळीवरचे हे आहेत की, ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने घेतात, पण त्यांना मूळ नसते; ते काही वेळेपर्यंत विश्वास धरतात व परीक्षेच्या वेळी गळून पडतात. 14आणि काटेरी झाडांमध्ये पडणारे बी हे ऐकणारे आहेत, पण पुढे जाता जाता चिंता व धन व या जीवनातली सुखे यांनी गुदमरून जातात व भरदार फळ देत नाहीत. 15पण चांगल्या जमिनीत पडणारे बी हे असे आहेत, की ते वचन ऐकून ते भल्या व चांगल्या अंतःकरणात घट्ट धरून ठेवतात आणि धीराने पीक देत जातात.

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 19 ऑक्टोबर म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 1 नोव्हेंबर. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क