2बाप्तिस्मा करणारा योहान तुरूंगात होता. त्याने ख्रिस्त करीत असलेल्या कामाविषयी ऐकले. तेव्हा त्याने आपल्या काही शिष्यांच्या हाती निरोप पाठवला.
3आणि त्यास विचारले, “जो येणार होता, तो तूच आहेस? किंवा आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?”
4येशूने उत्तर दिले, “जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा.
5आंधळे पाहतात. पांगळे चालतात. कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मरण पावलेले उठवले जातात व गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते.
6जो कोणी माझ्यामुळे अडखळत नाही तो धन्य आहे.”
7मग ते जात असता येशू योहानाविषयी लोकांशी बोलू लागला, तुम्ही वैराण प्रदेशात काय पाहायला गेला होता? वाऱ्याने हलविलेला बोरू काय?
8तुम्ही काय पाहायला गेला होता? तलम वस्त्रे घातलेल्या मनुष्यास पाहायला गेला होता काय? तलम वस्त्रे घालणारे राजाच्या घरात असतात.
9तर मग तुम्ही बाहेर कशाला गेला होतात? संदेष्ट्याला पाहायला काय? होय. मी तुम्हास सांगतो आणि संदेष्ट्यांपेक्षाही अधिक मोठा असा त्याला.
10त्याच्याविषयी असे लिहिण्यात आले आहे की, पाहा, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवतो तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील.
11मी तुम्हास खरे सांगतो की, स्त्रीयांपासून जन्मलेल्यांमध्ये बाप्तिस्मा करणारा योहान याच्यापेक्षा मोठा असा कोणी झाला नाही, तरीही स्वर्गाच्या राज्यात जो अगदी लहान आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे.
12बाप्तिस्मा करणारा योहान याच्या दिवसापासून आतापर्यंत लोक स्वर्गाच्या राज्यावर जोराने हल्ला करीत आहे आणि हल्ला करणारे ते हिरावून घेतात.
13कारण योहानापर्यंत सर्व संदेष्टे व नियमशास्त्र यांनी भविष्य सांगितले.
14आणि जर तुम्ही ते स्वीकारण्यास तयार असाल तर येणारा एलीया तो हाच आहे.
15ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.
16या पिढीला मी कोणती उपमा देऊ? जी बाजारात बसून आपल्या सोबत्यांना हाक मारतात त्यांच्यासारखी ही पिढी आहे. ती म्हणतात.
17आम्ही तुमच्यासाठी संगीत वाजवले तरी तुम्ही नाचला नाहीत. आम्ही विलाप केला तरी तुम्ही ऊर बडवून घेतले नाही.
18योहान काही न खाता व पिता आला, पण ते म्हणतात त्यास भूत लागले आहे.
19मनुष्याचा पुत्र खातपीत आला. ते म्हणतात, पाहा, हा खादाडा व दारूबाज, जकातदार व पापी लोकांचा मित्र, परंतु ज्ञानाची योग्यता त्याच्याद्वारे घडणाऱ्या योग्य गोष्टीमुळे ठरते.