मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › नोव्हेंबर 2027 › 21 नोव्हेंबर
ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 8 नोव्हेंबर (जुनी पद्धत)
ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 21 नोव्हेंबर 2027
रविवार · स्वर 5
सण आणि संत
पेन्टेकॉस्टनंतरचा 22वा रविवार
उपवास
उपवास नाही
हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.
दिवसाची वाचने
संध्याप्रार्थना: वाचन
13यहोशवाने यरीहोजवळ असताना समोर पहिले तो कोणी पुरुष आपल्या हाती उपसलेली तलवार घेऊन पुढे उभा आहे असे त्याच्या नजरेस पडले. यहोशवाने जवळ जाऊन विचारले, तू आमच्या पक्षाचा की आमच्या वैऱ्यांच्या पक्षाचा? 14तो म्हणाला, “दोहोंपैकी कोणतेही नाही; कारण मी परमेश्वराच्या सेनेचा सेनापती आहे.” तेव्हा यहोशवाने त्यास नमन करण्यासाठी आपले मुख भूमीकडे करून म्हटले, “माझ्या स्वामीची आपल्या सेवकाला काय आज्ञा आहे?” 15परमेश्वराचा सेनापती यहोशवाला म्हणाला, “आपल्या पायातले जोडे काढ; कारण ज्या जागी तू उभा आहेस ती पवित्र आहे.” तेव्हा यहोशवाने तसे केले.
संध्याप्रार्थना: वाचन
2तेव्हा मिद्यानाने इस्राएलावर अधिकाराने जुलूम केला; मिद्यान्यांमुळे इस्राएलाच्या लोकांनी आपल्यासाठी डोंगरातील भुयारे, गुहा व किल्ले यांचा आश्रय घेतला. 7जेव्हा इस्राएलाच्या संतानानी मिद्यान्यांमुळे परमेश्वराकडे मोठ्याने रडून हाक मारली तेव्हा असे झाले की, 11आणखी परमेश्वराचा दूत येऊन अबियेजेरी योवाश याच्या अफ्रा येथील एला झाडाखाली बसला; तेव्हा त्याचा पुत्र गिदोन मिद्यांन्यापासून गहू लपवावा म्हणून द्राक्षकुंडात गव्हाची मळणी करत होता. 12आणि परमेश्वराचा दूत त्यास दर्शन देऊन त्यास बोलला, “हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे.” 13तेव्हा गिदोन त्यास बोलला, “हे माझ्या प्रभू, जर परमेश्वर आमच्याबरोबर आहे तर हे सर्व आमच्या बाबतीत का घडले? परमेश्वराने आम्हांला मिसरातून बाहेर आणले आणि त्याच्या अद्भुत कृत्यांबद्दल आमचे पूर्वज आम्हाजवळ सांगत आले, परमेश्वराने आम्हांला मिसरातून वर आणले की नाही? आता तर परमेश्वराने आमचा त्याग करून आम्हांला मिद्यान्यांच्या हाती दिले आहे.” 14मग परमेश्वराने त्याच्याकडे बघितले आणि म्हटले, “तू आपल्या या बळाने जा, आणि इस्राएलांना मिद्यान्यांच्या ताब्यातून सोडव; मी तुला पाठवले आहे की नाही?” 15गिदोन त्यास बोलला, “हे माझ्या प्रभू, मी इस्राएलला कसा सोडवणार? पाहा, मनश्शेत माझे घराणे कमजोर आहे, आणि मी आपल्या पित्याच्या घरात कमी महत्त्वाचा आहे.” 16परमेश्वर त्यास बोलला, “खरोखर मी तुझ्याबरोबर राहीन, जसे एका मनुष्यास मारावे तसे तू एकजात सर्व मिद्यान्यांना ठार करशील.” 17गिदोन त्यास बोलला, “तुझी कृपादृष्टी माझ्यावर असली तर तूच माझ्याशी बोलत आहेस याविषयी मला काही चिन्ह दाखव. 18मी तुला विनंती करतो, मी तुझ्याकडे येईपर्यंत तू येथून जाऊ नको; म्हणजे मी आपली भेट आणून तुझ्यापुढे ठेवीन.” तेव्हा तो बोलला, “तू परत येईपर्यंत मी येथेच थांबतो.” 19गिदोनाने जाऊन एक करडू व एफाभर सपिठाच्या बेखमीर भाकरी तयार केल्या; त्याने मांस टोपलीत घातला आणि रस्सा पातेल्यात घातला, मग त्याच्याजवळ एला झाडाखाली नेऊन ते सादर केले. 20तेव्हा देवाच्या दूताने त्यास सांगितले, “तू मांस व बेखमीर भाकरी या खडकावर आणून ठेव, आणि त्यावर रस्सा ओत.” मग गिदोनाने तसे केले. 21तेव्हा परमेश्वराच्या दूताने आपल्या हातातल्या काठीच्या टोकाने मांसास व बेखमीर भाकरीला स्पर्श केला; मग खडकातून अग्नी निघाला आणि त्याने ते मांस व बेखमीर भाकरी भस्म केल्या; परमेश्वराचा दूतही निघून गेला आणि यापुढे गिदोन त्यास पाहू शकला नाही. 22तेव्हा गिदोनाला समजले की तो परमेश्वराचा दूत होता; गिदोन म्हणाला, हाय हाय, “हे प्रभू देवा! कारण मी परमेश्वराचा दूत समोरासमोर, पाहिला आहे!” 23परमेश्वर त्यास म्हणाला, “तुला शांती असो! भिऊ नको, तू मरणार नाहीस.” 24तेव्हा गिदोनाने तेथे परमेश्वरासाठी वेदी बांधली, त्याचे नाव परमेश्वर शांती आहे, असे ठेवले; ती आजपर्यंत अबियेजेऱ्यांच्या अफ्रा येथे अजून आहे.
संध्याप्रार्थना: वाचन
7सर्व पृथ्वी विसावा पावली आहे आणि शांत झाली आहे; त्यांनी गाणे गाऊन उत्सावाला सुरवात केली आहे. 8लबानोनाचे गंधसरूबरोबर देवदारूवृक्षसुध्दा तुझ्यावर हर्षित होतात; ते म्हणतात, ‘तू खाली पडलास तेव्हापासून लाकडे कापणारा आम्हावर चढून आला नाही.’ 9जेव्हा तू अधोलोकात खाली जाशील तेव्हा तुला भेटण्यास ते उत्सुक आहे. तो तुजसाठी पृथ्वीवरील मरून गेलेल्या सर्व राजांना उठवील, सर्व राष्ट्रांच्या राजांना आपल्या सिंहासनावरून उठवीत आहे. 10ते सर्व बोलतील आणि तुला म्हणतील, ‘तू आमच्यासारखा अशक्त झाला आहे. तू आमच्या सारखा झाला आहे. 11तुझा थाटमाट, तुझ्या तंतुवाद्यांच्या आवाज अधोलोकात खाली जात आहे. तुझ्याखाली अळ्या पसरल्या आहेत आणि किडे तुला झाकत आहेत.’ 12हे र्देदीप्यमान ताऱ्या, प्रभातपुत्रा, तू आकाशातून खाली कसा पडला आहेस! ज्या तू राष्ट्रांस जिंकले, तुला तोडून कसा जमिनीवर टाकला आहे! 13जो तू आपल्या मनात म्हणालास, ‘मी आकाशात वर चढेन, देवाच्या तांरागणाच्यावर उच्चस्थानी मी माझे सिंहासन करीन, आणि उत्तरेच्या अगदी शेवटच्या भागात मी मंडळीच्या पर्वतावर बसेन. 14मी मेघाच्या उंचीच्यावरती चढेन; मी परात्पर देवासारखा होईन.’ 15तथापि तुला आता खाली अधोलोकात, खोल खळग्यात आणले आहे. 16जे तुझ्याकडे निरखून पाहतील; तुझ्याबद्दल विचार करतील. ते म्हणतील, ‘ज्याने पृथ्वी थरथर कापविली व राज्ये डळमळविली तो हाच का पुरुष? 17जो जग रानासारखे करीत असे, त्यांची नगरे उलथून टाकत असे आणि ज्यांने त्याच्या कैद्यांना आपल्या घरी जाऊ दिले नाही तो हाच का?’ 18सर्व राष्ट्रांचे राजे, त्यांच्यातील सर्व, गौरवाने प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या कबरेत निजले आहेत. 19पण, तुला फेकून दिलेल्या फांदीप्रमाणे तुझ्या कबरेतून काढून बाहेर फेकले आहे. जे तलवारीने भोसकलेले, खाचेतल्या दगडांमध्ये खाली उतरले जातात, तसे तू मृत्युने झाकला आहेस. 20जसे पाया खाली तुडवलेले मृत शरीर, तुला कधीच त्यांच्याबरोबर पुरण्यात येणार नाही, कारण तू आपल्या देशाचा नाश केला आहे. तू आपले लोक वधले आहेत, जे वाईट करणाऱ्यांची मुले आहेत आणि त्यांचा कधी पुन्हा उल्लेख होणार नाही.”
प्रातःप्रार्थनेचे 11वे शुभवर्तमान
15मग त्यांची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणतो, “माझी कोकरे चार.” 16तो पुन्हा दुसऱ्यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणाला, “माझी मेंढरे राख.” 17तो तिसर्यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” पेत्र दुःखी होऊन त्यास म्हणाला, “प्रभू, तुला सर्व माहीत आहे, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” येशू त्यास म्हणतो, “माझी मेंढरे चार.” 18“मी तुला खरे खरे सांगतो, तू जेव्हा तरुण होतास तेव्हा आपली कंबर बांधून तुझी इच्छा असेल तिकडे जात होतास; पण तू म्हातारा होशील तेव्हा हात पुढे करशील, दुसरा तुझी कंबर बांधील आणि तुझी इच्छा नसेल तिकडे तुला नेईल.” 19तो कोणत्या मरणाने देवाचे गौरव करणार होता हे प्रकट करायला तो हे बोलला आणि हे बोलल्यावर तो त्यास म्हणतो, “माझ्यामागे ये.” 20तेव्हा पेत्र मागे वळला आणि पाहतो की, ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती जो भोजनाच्या वेळी त्याच्या छातीशी टेकला असता मागे लवून ‘प्रभू, तुला धरून देणारा तो कोण आहे?’ असे म्हणाला होता, त्यास त्याने मागे चालतांना पाहिले. 21म्हणून, त्यास बघून, पेत्र येशूला म्हणाला, “प्रभू, ह्याचे काय?” 22येशूने त्यास म्हटले, “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर त्याचे तुला काय? तू माझ्यामागे ये.” 23तेव्हा बांधवांत हे बोलणे पसरले की, तो शिष्य मरणार नाही. पण येशू त्यास म्हणाला नव्हता की, तो मरणार नाही, पण “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर तुला काय?” 24जो या गोष्टींची साक्ष देतो व ज्याने या गोष्टी लिहिल्या आहेत तोच हा शिष्य आहे; आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हास माहीत आहे. 25आणि ह्याशिवाय येशूने केलेली पुष्कळ कृत्ये आहेत; ती एकएक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात देखील मावणार नाहीत असे मला वाटते.
प्रेषितांचे पत्र
11पाहा, किती मोठ्या अक्षरात, मी तुम्हास स्वतःच्या हाताने लिहित आहे. 12जितके दैहिक गोष्टींचा डौल मिरवू पाहतात असे तितके ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे त्यांचा छळ होऊ नये म्हणूनच तुम्हास सुंता करून घेण्यास भाग पाडतात; 13कारण ज्यांची सुंता झाली आहे ते स्वतः तर नियमशास्त्र पाळीत नाहीत पण तुमच्या देहावरून नावाजून घेण्यासाठी, म्हणून, तुमची सुंता व्हावी अशी त्यांची इच्छा बाळगतात. 14आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्यापासून दूर राहो पण ज्याच्या द्वारे जग मला आणि मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे. 15कारण सुंता होण्यात किंवा सुंता न होण्यात काही नाही, तर नवी उत्पत्ती हीच काय ती होय. 16आणि जे या नियमाने चालतात अशा सर्वांवर व देवाच्या इस्राएलावर शांती व दया असो. 17आतापासून कोणी मला त्रास देऊ नये, कारण मी आपल्या शरीरावर येशूच्या खुणा धारण केल्या आहेत. 18बंधूंनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या बरोबर असो. आमेन.
प्रेषितांचे पत्र (देवदूतांसाठी)
2कारण नियमशास्त्र जे देवदूतांकरवी सांगितले गेले ते इतके प्रभावी होते आणि जर प्रत्येक आज्ञाभंगाच्या व प्रत्येक अवमानाच्या कृत्याला योग्य ती शिक्षा होते. 3तर आपण अशा महान तारणाकडे दुर्लक्ष केल्यास, मग आपण शिक्षेपासून कसे सुटू? या तारणाची पहिली घोषणा प्रभूने केली. ज्यांनी प्रभूचे ऐकले त्यांच्याकडून याची खात्री पटली 4देवानेसुद्धा चिन्हांद्वारे, अद्भूत कृत्यांद्वारे आणि निरनिराळ्या चमत्कारांद्वारे, त्यांच्या साक्षीची भर व त्याच्या इच्छेनुसार पवित्र आत्म्याची दाने वाटून दिली. 5आम्ही ज्या भावी जगाविषयी बोलत आहोत, त्याचे सत्ताधीश म्हणून देवाने देवदूतांची निवड केली नाही. 6पवित्र शास्त्रामध्ये एका ठिकाणी असे लिहिले आहे “मनुष्य कोण आहे की ज्याची तुला चिंता वाटते? किंवा मनुष्याचा पुत्र कोण आहे की ज्याचा तू विचार करावा? 7थोड्या काळासाठी तू त्यास देवदूतांपेक्षा कमी केले तू त्यास गौरव व सन्मान यांचा मुकुट घातला आहेस 8तू सर्वकाही त्याच्या पायाखाली ठेवलेस.” देवाने सर्वकाही त्याच्या अधिपत्याखाली ठेवले आणि कोणतीही गोष्ट त्याच्या अधिपत्याखाली ठेवायची सोडली नाही. पण आता अजूनपर्यंत सर्वकाही त्याच्या अधिपत्याखाली ठेवलेले आपल्या दृष्टीस पडत नाही खरे. 9परंतु आपण येशूला पाहतो, ज्याला काही काळासाठी देवदूतांपेक्षा किंचीत कमी केले होते. आता आम्ही त्याला, त्याने सहन केलेल्या मरणामुळे, गौरव व सन्मान यांचा मुकुट घातल्याचे पाहत आहोत कारण देवाच्या कृपेमुळे येशूने सर्व मानवजातीसाठी मरण सोसले. 10देव, ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि ज्याच्या गौरवासाठी सर्व गोष्टी आहेत, त्याच्या गौरवाचे भागीदार होण्यासाठी पुष्कळ पुत्र व कन्या आणाव्यात म्हणून देवाने येशूला दुःखसहनाद्वारे परिपूर्ण करून लोकांचा तारणारा बनविले.
शुभवर्तमान
41तेव्हा पाहा, याईर नावाचा कोणी मनुष्य आला; तो तर सभास्थानाचा अधिकारी होता; आणि त्याने येशूच्या पाया पडून, तू माझ्या घरी यावे, अशी त्यास विनंती केली. 42कारण त्यास सुमारे बारा वर्षाची एकुलती एक मुलगी होती व ती मरणास टेकली होती. मग तो जात असता लोकसमुदाय त्याच्याजवळ दाटी करीत होते. 43आणि बारा वर्षे रक्तस्राव होत असलेली कोणीएक स्त्री, जी (आपली सर्व उपजीविका वैद्यांवर खर्ची घालून) कोणाकडूनही निरोगी होईना, 44तिने त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या काठाला स्पर्श केला आणि लागलीच तिचा रक्तस्राव बंद झाला. 45मग येशू म्हणाला, “मला कोणी स्पर्श केला?” तेव्हा सर्वजण नाकारीत असता पेत्र व जे त्याच्याबरोबर होते ते त्यास म्हणाले, हे गुरूजी, समुदाय दाटी करून तुम्हास चेंगरीत आहेत. 46तेव्हा येशू म्हणाला, “कोणीतरी मला स्पर्श केला, कारण माझ्यातून सामर्थ्य निघाले हे मला समजले.” 47मग ती स्त्री, आपण गुप्त राहिलो नाही असे पाहून, थरथर कांपत आली आणि त्याच्यापुढे उपडी पडून आपण कोणत्या कारणासाठी स्पर्श केला व लागलीच आपण कसे बरे झालो, हे तिने सर्व लोकांच्या देखत सांगितले. 48तेव्हा त्याने तिला म्हटले, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे. शांतीने जा.” 49तो अजून बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या येथून कोणी आला व म्हणाला, तुझी मुलगी मरण पावली आहे; गुरूजीला आणखी श्रम देऊ नका. 50पण येशूने ते ऐकून त्यास उत्तर दिले, “भिऊ नको, विश्वास मात्र धर, म्हणजे ती बरी केली जाईल.” 51मग घरात आल्यावर पेत्र व योहान व याकोब आणि मुलीचा पिता व तिची आई यांच्यावाचून कोणालाही आपणाबरोबर आत येऊ दिले नाही. 52आणि सर्व तिच्यासाठी रडत व शोक करीत होते, पण तो म्हणाला, “रडू नका, कारण ती मरण पावली नाही, तर झोपेत आहे.” 53तरी ती मरण पावली आहे हे जाणून ते त्यास हसू लागले. 54पण त्याने तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला हाक मारून म्हटले, “मुली, ऊठ.” 55तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती लागलीच उठली; मग तिला खायला द्यावे अशी त्याने आज्ञा केली. 56आणि तिचे आई-वडील थक्क झाले; परंतु जे झाले ते कोणाला सांगू नका असे त्याना निक्षून सांगितले.
शुभवर्तमान (देवदूतांसाठी)
16जो शिष्यांचे ऐकतो तो माझे ऐकतो आणि जो शिष्यांना नाकारतो तो मला नाकारतो आणि जो मला नाकारतो तो ज्याने मला पाठवले त्यास नाकारतो.” 17ते सत्तर लोक आनंदाने परतले आणि म्हणाले, “प्रभू, तुझ्या नावाने भूतेसुद्धा आम्हास वश होतात!” 18तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मी सैतानाला आकाशातून विजेसारखे पडताना पाहिले! 19पाहा, मी तुम्हास साप आणि विंचू यांना तुडविण्याचा व शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिला आहे आणि कशानेच तुम्हास अपाय होणार नाही. 20तथापि तुम्हास दुष्ट आत्मे वश होतात याचा आनंद मानू नका तर तुमची नावे स्वर्गात लिहिली आहेत याचा आनंद माना.” 21त्या क्षणी तो पवित्र आत्म्यात आनंदीत झाला आणि म्हणाला, “हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू मी तुझी स्तुती करतो, कारण तू या गोष्टी ज्ञानी आणि बुद्धीमान लोकांपासून लपवून ठेवून त्या लहान बालकांस प्रकट केल्या आहेस. होय, पित्या कारण तुला जे योग्य वाटले ते तू केलेस.
तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 8 नोव्हेंबर म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 21 नोव्हेंबर. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क