Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › ऑक्टोबर 2027 › 31 ऑक्टोबर

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 18 ऑक्टोबर (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 31 ऑक्टोबर 2027

रविवार · स्वर 2

सण आणि संत

पेन्टेकॉस्टनंतरचा 19वा रविवार

उपवास

उपवास नाही

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

संध्याप्रार्थना: वाचन

1 योहा 1:1–7

1जे आरंभापासून होते, ते आम्ही ऐकले आहे, आमच्या डोळ्यांनी आम्ही जे पाहिले आणि न्याहाळले आहे, जे आमच्या हातांनी हाताळले त्याच जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. 2ते जीवन आम्हास प्रकट झाले. आम्ही ते पाहिले आहे; त्याविषयी आम्ही साक्ष देतो आणि आम्ही त्या सार्वकालिक जीवनाविषयी तुम्हास घोषणा करीत आहोत. ते जीवन पित्याजवळ होते आणि ते आम्हास प्रकट केले गेले. 3आम्ही जे पाहिले व ऐकले आहे ते आम्ही आता तुम्हांलाही घोषित करीत आहोत, यासाठी की तुमचीही आमच्यासोबत सहभागिता असावी. आमची सहभागिता तर देवपिता व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याजबरोबर आहे. 4तुमचा-आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही या गोष्टी तुम्हास लिहितो. 5जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तोच आम्ही तुम्हास सांगत आहोत, देव प्रकाश आहे आणि त्याच्याठायी मुळीच अंधार नाही. 6जर आम्ही म्हणतो की, आमची देवाबरोबर सहभागिता आहे पण पापाच्या अंधारामध्ये आम्ही जगतो तर आम्ही खोटे बोलत आहोत व सत्याला अनुसरत नाही. 7पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते.

संध्याप्रार्थना: वाचन

याको 1:1–12

1याकोब, देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक, याजकडून, जगभर पांगलेल्या, विश्वास ठेवणाऱ्या बारा यहूदी वंशांना नमस्कार. 2माझ्या बंधूंनो, ज्या ज्या वेळी तुमच्यावर निरनिराळया परीक्षा येतात तेव्हा तुम्ही आनंदच माना. 3तुम्हास माहीत आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेमुळे सहनशीलता निर्माण होते. 4आणि त्या सहनशीलतेला आपले कार्य पूर्ण करू द्या. यासाठी की तुम्ही प्रौढ, परिपूर्ण व कोणत्याही बाबतीत कमतरता नसलेले असे पूर्ण व्हावे. 5म्हणून जर तुमच्यातील कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने देवाकडे मागावे म्हणजे ते त्यास मिळेल कारण तो दोष न लावता सर्वांस उदारपणे देतो. 6पण त्याने विश्वासाने मागावे व संशय धरू नये कारण जो संशय धरतो तो वाऱ्यामुळे लोटलेल्या व उचबंळलेल्या समुद्रातील लाटेसारखा आहे. 7अशा मनुष्यांने असा विचार करू नये की, प्रभूपासून त्यास काही प्राप्त होईल. 8कारण तो द्विमनाचा असून तो सर्व मार्गात अस्थिर असतो. 9दीन असलेल्या बंधूने, आपल्या उच्चपणाविषयी अभिमान बाळगावा. 10आणि श्रीमंत बंधूने आपल्या दीन स्थितीविषयी अभिमान बाळगावा कारण तो एखाद्या गवताच्या फुलासारखा नाहीसा होईल. 11सूर्य त्याच्या तीव्र तेजाने उगवला आणि त्याने गवत कोमजवले. मग त्याचे फुल गळून पडले व त्याच्या रुपाची शोभा नाहीशी झाली. त्याचप्रमाणे श्रीमंत मनुष्यदेखील त्याच्या उद्योगात भरात कोमेजून जाईल. 12जो परीक्षा सोसतो तो धन्य आहे कारण परीक्षेत उतरल्यावर जो जीवनाचा मुकुट प्रभूने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांस देऊ केला आहे तो त्यास मिळेल.

संध्याप्रार्थना: वाचन

यहू 1:1–7, 17–25

1येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा भाऊ यहूदा ह्याजकडून पत्र; देवपित्याला प्रिय असलेल्या व ख्रिस्त येशूसाठी त्याने राखलेल्या, अशा सर्व बोलावलेल्यांस 2दया, शांती व प्रीती ही तुम्हास विपुल मिळत राहो. 3प्रियांनो, मी आपल्या सामाईक तारणाविषयी तुम्हास लिहिण्याचा प्रयत्न करीत असता, मला हे आवश्यक वाटले की, जो विश्वास पवित्रजनांना सर्वकाळसाठी एकदा दिला, तो राखण्याविषयी मी तुम्हास लिहून उत्तेजन द्यावे. 4कारण, जे या दंडासाठी पूर्वीपासून नेमलेले, असे कित्येकजण चोरुन आत आले आहेत; ते भक्तिहीन लोक आहेत, त्यामुळे ते आपल्या देवाची कृपा पालटून तिला कामातुरपणाचे स्वरूप देवून आपला एकच स्वामी व प्रभू येशू ख्रिस्त ह्याला नाकारतात. 5जरी तुम्हास हे पूर्वीपासून माहीती आहे तरी मी तुम्हास हे आठवून घावे अशी माझी इच्छा आहे की, परमेश्वराने त्या लोकांस मिसर देशातून वाचवल्यावर ज्यांनी विश्वास ठेवला नाही त्यांना त्याने नंतर नष्ट केले; 6आणि ज्या देवदूतांनी आपले अधिकारपद न सांभाळता आपले स्वतःचे योग्य वस्तीस्थान सोडले त्यांना त्याने सर्वकाळच्या बंधनामध्ये निबीड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरिता राखून ठेवले आहे; 7सदोम व गमोरा आणि त्यांच्या आसपासची इतर नगरे, ह्यांनी त्यांच्याप्रमाणेच जारकर्मे केली व परदेहाच्या मागे लागली आणि ती उदाहरण म्हणून, सर्वकाळच्या अग्नीची शिक्षा भोगीत ठेवली आहेत. 17पण प्रियांनो, तुम्ही तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची तुम्ही आठवण करा; 18त्यांनी तुम्हास म्हणले होते की, “शेवटच्या काळात टवाळखोर माणसे उठतील व आपल्या भक्तिहीन वासनांप्रमाणे चालतील.” 19हे फूट पाडणारे लोक देहबुद्धी स्वभावाचे, आत्मा नसलेले लोक आहेत. 20पण प्रियांनो, तुम्ही आपल्या परमपवित्र विश्वासावर आपली रचना करीत राहून पवित्र आत्म्याने प्रार्थना करा, 21तुम्ही सर्वकाळच्या जीवनासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या दयेची प्रतीक्षा करीत स्वतःला देवाच्या प्रीतीत राखा. 22जे संशय धरतात त्यांच्यावर तुम्ही दया करा; 23आणि काहींना अग्नीतून ओढून काढून वाचवा. काही जणांवर तुम्ही भीत भीत दया करा; पण हे करताना देहामुळे डागाळलेल्या वस्त्रांचाही द्वेष करा. 24आता, तुम्हास अढळ राखण्यास आणि आपल्या गौरवी समक्षतेत हर्षाने, निष्कलंक उभे करण्यास जो समर्थ आहे 25असा जो एकच देव आपला तारणारा त्यास येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याद्वारे गौरव, महिमा, पराक्रम आणि अधिकारही युगांच्या आधीपासून, आता आणि युगानुयुग आहेत. आमेन.

प्रातःप्रार्थनेचे आठवे शुभवर्तमान

योहा 20:11–18

11पण इकडे मरीया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि ती रडता रडता तिने ओणवून कबरेत पाहिले; 12आणि जेथे येशूचे शरीर आधी ठेवलेले होते तेथे ते शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन देवदूत एक डोक्याकडील बाजूस आणि एक पायांकडील बाजूस बसलेले दिसले. 13आणि ते तिला म्हणाले, “मुली, तू का रडतेस?” ती त्यांना म्हणाली, “त्यांनी माझ्या प्रभूला नेले आणि त्यास कोठे ठेवले हे मला माहीत नाही.” 14असे बोलून ती मागे वळली आणि तो तिला येशू उभा असलेला दिसला; पण तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. 15येशूने तिला म्हटले, “मुली, तू का रडतेस? तू कोणाला शोधतेस?” तो माळी आहे असे समजून त्यास म्हणाली, “साहेब, तू त्यास येथून नेले असेल तर कोठे ठेवलेस ते मला सांग म्हणजे मी त्यास घेऊन जाईन.” 16येशूने तिला म्हटले, “मरीये,” ती वळून त्यास इब्री भाषेत म्हणाली, “रब्बूनी,” (म्हणजे गुरूजी) 17येशूने तिला म्हटले, “मला शिवू नकोस; कारण, मी अजून पित्याकडे वर गेलो नाही; तर माझ्या बांधवांकडे जाऊन, त्यांना सांग की, जो माझा पिता आणि तुमचा पिता, माझा देव आणि तुमचा देव आहे त्याच्याकडे मी वर जातो.” 18मग्दालीया नगराची मरीया गेली आणि आपण प्रभूला पहिल्याचे आणि त्याने आपल्याला या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळविले.

प्रेषितांचे पत्र

2 करिं 11:31–12:9

31देव आणि प्रभू येशूचा पिता, ज्याची अनंतकाळपर्यंत स्तुती केली पाहिजे, तो हे जाणतो की मी खोटे बोलत नाही. 32दिमिष्क नगरात अरीतास राजाने नेमलेल्या अधिकाऱ्याने मला अटक करण्यासाठी दिमिष्ककरांच्या नगरावर पहारा दिला होता. 33पण मला टोपलीत बसवून गावकुसाच्या खिडकीतून खाली सोडण्यात आले आणि त्याच्या हातून मी निसटलो. 12:1मला अभिमान मिरवणे भाग पडते; तरी हे उचित नाही पण मी प्रभूच्या दर्शनांकडे व प्रकटीकरणांकडे आता वळतो. 2मला एक ख्रिस्तातील मनुष्य माहीत आहे; तो चौदा वर्षांपूर्वी (शरीरात की शरीराबाहेर हे मला माहीत नाही, देवाला माहीत आहे) तिसर्‍या स्वर्गापर्यंत नेला गेला. 3तो मला माहीत आहे आणि असा तो मनुष्य (शरीरात की शरीरापासून वेगळा हे मला माहीत नाही, देवाला माहीत आहे) 4त्या मनुष्यास सुखलोकात उचलून नेण्यात आले आणि मनुष्याने ज्यांचा उच्चारही करणे योग्य नाही अशी वाक्ये त्याने ऐकली. 5मी अशा मनुष्याविषयी अभिमान मिरवीन, मी स्वतःविषयी नाही, तर केवळ आपल्या दुर्बलतेची प्रौढी मिरवीन. 6कारण आपण अभिमान मिरवावा अशी जरी मी इच्छा धरली, तरी मी मूढ होणार नाही, कारण मी जे खरे ते बोलेन; पण मी स्वतःस आवरले पाहिजे, म्हणजे कोणी जे माझे पाहतो किंवा ऐकतो त्याहून त्याने मला अधिक मानू नये. 7आणि प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये म्हणून माझ्या देहात एक काटा दिलेला आहे, तो मला ठोसे मारणार्‍या सैतानाचा दूत आहे; म्हणजे मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये. म्हणून तो ठेवण्यात आला आहे. 8माझ्यामधून तो निघावा म्हणून मी प्रभूला ह्याविषयी तीनदा विनंती केली. 9आणि त्याने मला म्हणले की, ‘माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणात माझे सामर्थ्य पूर्ण होते.’ म्हणून, फार आनंदाने, मी माझ्या अशक्तपणात अभिमान मिरवीन, म्हणजे ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर रहावे;

प्रेषितांचे पत्र (संत लूक यांच्यासाठी)

कल 4:5–9, 14, 18

5बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञानीपणाने वागा. संधी साधून घ्या. 6तुमचे बोलणे नेहमी कृपायुक्त, मिठाने रूचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे. 7माझा प्रिय बंधू तुखिक, प्रभूमधील विश्वासू सेवक व माझ्यासोबतीचा दास हा माझ्याविषयी सर्व गोष्टी तुम्हास कळवील. 8मी त्यास त्याच हेतूने तुमच्याकडे पाठवले आहे की, म्हणजे आमच्याविषयीच्या सर्व गोष्टी त्याने तुम्हास कळवून तुमच्या मनाचे समाधान करावे. 9मी त्याच्याबरोबर विश्वासू व प्रिय बंधू अनेसिम, जो तुमच्यांतलाच आहे त्यालाही पाठवले आहे; ते तुम्हास येथील सर्व गोष्टी कळवतील. 14प्रिय वैद्य लूक आणि देमास हे तुम्हास सलाम सांगतात. 18मी पौलाने स्वहस्ते लिहीलेला सलाम; मी बंधनात आहे याची आठवण ठेवा. तुम्हांबरोबर कृपा असो.

शुभवर्तमान

लूक 8:5–15

5“पेरणारा आपले बी पेरायला निघाला; आणि तो पेरीत असता काही बी पाय वाटेवर पडले आणि ते तुडवले गेले व आकाशातील पाखरांनी ते खाऊन टाकले. 6आणि काही खडकाळीवर पडले आणि ते उगवल्यावर वाळून गेले, कारण त्यास ओलावा नव्हता. 7आणि काही काटेरी झाडाझुडपांमध्ये पडले आणि झाडाझुडपांबरोबर वाढून त्याची वाढ खुंटवली. 8आणि काही चांगल्या जमिनीवर पडले आणि ते उगवून त्यास शंभरपट पीक आले.” असे म्हटल्यावर तो मोठ्याने म्हणाला, “ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.” 9तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्यास विचारले, या दाखल्याचा अर्थ काय आहे? 10मग तो म्हणाला, “देवाच्या राज्याची गुजे जाणण्याची देणगी तुम्हास दिली आहे, परंतु बाकीच्या लोकांस ती दाखल्यांनी सांगितली आहेत, यासाठी की त्यांनी दिसत असता पाहू नये व त्यांनी ऐकत असता समजू नये. 11तर दाखला हा आहे बी हे देवाचे वचन आहे. 12आणि जे वाटेवरचे ते ऐकणारे आहेत, पण त्यानंतर सैतान येतो आणि त्यांनी विश्वास धरून तारण पावू नये म्हणून त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो. 13आणि जे खडकाळीवरचे हे आहेत की, ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने घेतात, पण त्यांना मूळ नसते; ते काही वेळेपर्यंत विश्वास धरतात व परीक्षेच्या वेळी गळून पडतात. 14आणि काटेरी झाडांमध्ये पडणारे बी हे ऐकणारे आहेत, पण पुढे जाता जाता चिंता व धन व या जीवनातली सुखे यांनी गुदमरून जातात व भरदार फळ देत नाहीत. 15पण चांगल्या जमिनीत पडणारे बी हे असे आहेत, की ते वचन ऐकून ते भल्या व चांगल्या अंतःकरणात घट्ट धरून ठेवतात आणि धीराने पीक देत जातात.

शुभवर्तमान (संत लूक यांच्यासाठी)

लूक 10:16–21

16जो शिष्यांचे ऐकतो तो माझे ऐकतो आणि जो शिष्यांना नाकारतो तो मला नाकारतो आणि जो मला नाकारतो तो ज्याने मला पाठवले त्यास नाकारतो.” 17ते सत्तर लोक आनंदाने परतले आणि म्हणाले, “प्रभू, तुझ्या नावाने भूतेसुद्धा आम्हास वश होतात!” 18तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मी सैतानाला आकाशातून विजेसारखे पडताना पाहिले! 19पाहा, मी तुम्हास साप आणि विंचू यांना तुडविण्याचा व शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिला आहे आणि कशानेच तुम्हास अपाय होणार नाही. 20तथापि तुम्हास दुष्ट आत्मे वश होतात याचा आनंद मानू नका तर तुमची नावे स्वर्गात लिहिली आहेत याचा आनंद माना.” 21त्या क्षणी तो पवित्र आत्म्यात आनंदीत झाला आणि म्हणाला, “हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू मी तुझी स्तुती करतो, कारण तू या गोष्टी ज्ञानी आणि बुद्धीमान लोकांपासून लपवून ठेवून त्या लहान बालकांस प्रकट केल्या आहेस. होय, पित्या कारण तुला जे योग्य वाटले ते तू केलेस.

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 18 ऑक्टोबर म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 31 ऑक्टोबर. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क