Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › ऑगस्ट 2027 › 5 ऑगस्ट

कॅथलिक दिनदर्शिका

दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 5 ऑगस्ट 2027

गुरुवार · सामान्यकाळाचा 18वा आठवडा

सण आणि संत

सामान्यकाळाच्या 18व्या आठवड्याचा गुरुवार

ऐच्छिक स्मृतिदिन · उपासनेचा रंग: हिरवा

संत मरीया महाबॅसिलिकाची (सांता मारिया माज्जोरे) प्रतिष्ठापना · ऐच्छिक स्मृतिदिन

दिवसाची वाचने

पहिले वाचन

गण 20:1–13

1इस्राएलाचे लोक सीनच्या वाळवंटात पहिल्या महिन्यात आले. त्यांनी कादेशला मुक्काम केला. मिर्याम तेथे मरण पावली आणि तिला तेथेच पुरण्यात आले. 2त्याठिकाणी लोकांस पुरेसे पाणी नव्हते. म्हणून ते मोशे आणि अहरोनाजवळ तक्रार करण्यासाठी एकत्र आले. 3लोकांनी मोशेशी वाद घातला. ते म्हणाले, आमचे भाऊबंद जसे परमेश्वरासमोर मरण पावले तसेच आम्ही मरायला पाहिजे होते. 4“तू परमेश्वराच्या लोकांस या रानात का आणलेस? आम्ही आणि आमची जनावरे इथे मरावी असे तुला वाटते का? 5तू आम्हास मिसर देशातून का आणलेस? तू आम्हास या वाईट ठिकाणी का आणलेस? इथे धान्य नाही. इथे अंजीर, द्राक्षे किंवा डाळिंबही नाहीत आणि इथे पिण्यास पाणीही नाही.” 6म्हणून मोशे आणि अहरोन लोकांची गर्दी सोडून दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराशी गेले. त्यांनी जमिनीपर्यंत लवून नमस्कार केला आणि त्यांना परमेश्वराचे तेज दिसले. 7परमेश्वर मोशेशी बोलला आणि म्हणाला, 8तुझी काठी घे. तुझा भाऊ अहरोन याला आणि त्या लोकांस बरोबर घे आणि खडकाजवळ जा. लोकांसमोर खडकाशी बोल. नंतर त्या खडकातून पाणी वाहू लागेल आणि तू ते पाणी त्या लोकांस आणि त्यांच्या जनावराना देऊ शकशील. 9मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे परमेश्वरापुढून त्याने काठी घेतली. 10मोशे आणि अहरोन यांनी लोकांस त्या खडकासमोर भेटायला सांगितले. नंतर मोशे म्हणाला, अहो, तुम्ही बंडखोरांनो ऐका. तुम्हासाठी आम्ही या खडकातून पाणी काढावयाचे काय? 11मोशेने आपला हात वर उचलला आणि काठीने खडकावर दोन वार केले. खडकातून पाणी बाहेर वाहू लागले आणि माणसे व जनावरे ते पाणी पिऊ लागली. 12पण परमेश्वर मोशेला आणि अहरोनाला म्हणाला, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. इस्राएली लोकांपुढे तुम्ही माझे पावित्र्य राखले नाही. मी वचन दिल्याप्रमाणे या मंडळीला जो देश दिला आहे ह्याना त्या देशात तुम्ही त्यांना तिथे घेऊन जाणार नाही. 13त्या जागेला मरीबा असे नांव पडले. इस्राएल लोकांनी परमेश्वराबरोबर जिथे वाद घातला तीच ती जागा होती. याच जागेवर परमेश्वराने त्यांना तो किती पवित्र आहे ते दाखवले होते.

प्रतिसाद स्तोत्र

स्तोत्र 95:1–2, 6–9

1याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करू; आपल्या तारणाचा खडक त्याचा हर्षाने जयजयकार करू. 2उपकारस्तुती करीत त्याच्या सान्निध्यात प्रवेश करू; स्तुतीचे स्तोत्रे गात त्याचा जयजयकार करू. 6याहो या, आपला निर्माणकर्ता परमेश्वर यापुढे गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्यास नमन करू; 7कारण तो आपला देव आहे, आणि आपण त्याच्या कुरणातील लोक आणि त्याच्या हातातील मेंढरे आहोत. आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. 8मरीबा येथल्याप्रमाणे किंवा मस्साच्या दिवशी रानात केले तसे आपली मने कठीण करू नका, 9तेव्हा तुमच्या वडिलांनी माझ्या अधिकाराला आव्हान दिले, आणि जरी त्यांनी माझी कृती पाहिली होती, तरी माझ्या सहनशीलतेची परीक्षा केली.

शुभवर्तमान

मत्त 16:13–23

13येशू फिलिप्पाच्या कैसरीया या भागाकडे गेला. तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात?” 14आणि ते म्हणाले, “काही बाप्तिस्मा करणारा योहान, तर कित्येक एलीया तर दुसरे काही यिर्मया किंवा संदेष्ट्यापैकी एक असे म्हणतात.” 15मग येशू त्यांना म्हणाला, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” 16शिमोन पेत्राने उत्तर दिले, “तू ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र आहेस.” 17येशू म्हणाला, “शिमोन, बार्योना, तू धन्य आहेस कारण रक्त व मांस यांनी तुला हे उघड केले नाही, तर माझा पिता जो स्वर्गात आहे त्याने तुला हे उघड केले. 18आणखी मी तुला असे सांगतो की, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्यापुढे मृतलोकाच्या द्वारांचे कांहींच चालणार नाही. 19मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.” 20तेव्हा त्याने शिष्यांना मी ख्रिस्त आहे ते तुम्ही कोणालाही सांगू नका असे निक्षून सांगितले. 21तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की, आपण यरूशलेम शहराला जाऊन वडील, यहूदी नेते व मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राच्या शिक्षक यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी व जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे याचे अगत्य आहे. 22तेव्हा पेत्राने त्यास एकाबाजूला घेऊन निषेध करून म्हटले, “प्रभू, तुझ्यापासून हे दूर असो. असे तुला कधीही होणारच नाही!” 23परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापासून चालता हो, तू मला अडखळण आहेस, कारण तू देवाच्या गोष्टींकडे लक्ष लावीत नाहीस तर मनुष्यांच्या गोष्टींकडे लक्ष लावतोस.”

सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क