Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › जुलै 2027 › 6 जुलै

कॅथलिक दिनदर्शिका

दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 6 जुलै 2027

मंगळवार · सामान्यकाळाचा 14वा आठवडा

सण आणि संत

सामान्यकाळाच्या 14व्या आठवड्याचा मंगळवार

ऐच्छिक स्मृतिदिन · उपासनेचा रंग: हिरवा

संत मारिया गोरेत्ती, कुमारिका आणि हुतात्मा · ऐच्छिक स्मृतिदिन

दिवसाची वाचने

पहिले वाचन

उत्प 32:22–32

22मग याकोब रात्री उठला. त्याने आपल्या दोन्ही स्त्रिया, दोन्ही दासी आणि अकरा मुले यांना बरोबर घेतले आणि तो यब्बोक नदीच्या उतारापाशी गेला. 23अशा रीतीने त्याने आपले जे सर्वकाही होते त्यांसह सर्वांना नदी पार करून पाठवले. 24याकोब एकटाच मागे राहिला होता, आणि एक पुरुष आला व त्याने याकोबाशी सूर्य उगवेपर्यंत कुस्ती केली. 25जेव्हा त्या मनुष्याने पाहिले की, आपण याकोबाचा पराभव करू शकत नाही, तेव्हा त्याने त्याच्या जांघेला स्पर्श केला. तेव्हा त्याच्याशी कुस्ती करीत असता याकोबाच्या जांघेचा सांधा निखळला. 26मग तो पुरुष याकोबाला म्हणाला, “आता मला जाऊ दे.” परंतु याकोब म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही.” 27तो पुरुष त्यास म्हणाला, “तुझे नाव काय आहे?” आणि याकोब म्हणाला, “माझे नाव याकोब आहे.” 28तेव्हा तो पुरुष म्हणाला, “तुझे नाव याकोब असणार नाही. येथून पुढे तुझे नाव इस्राएल असेल. कारण तू देवाशी व मनुष्यांशी झगडून विजय मिळवला आहेस.” 29मग याकोबाने त्यास विचारले, “कृपया तुझे नाव मला सांग.” परंतु तो पुरुष म्हणाला, “तू माझे नाव का विचारतोस?” त्या वेळी तेथेच त्या पुरुषाने याकोबाला आशीर्वाद दिला. 30म्हणून याकोबाने त्या जागेचे नाव पनीएल ठेवले. याकोब म्हणाला, “या ठिकाणी मी देवाला समक्ष पाहिले आहे, तरी माझा जीव वाचला आहे.” 31मग पनीएलाहून तो पुढे निघाला तेव्हा सूर्य उगवला. याकोब आपल्या पायामुळे लंगडत चालत होता. 32म्हणून आजपर्यंत इस्राएल लोक जनावरांच्या जांघेच्या सांध्याजवळचा स्नायू खात नाहीत कारण याच स्नायूपाशी याकोबाला दुखापत झाली होती.

प्रतिसाद स्तोत्र

स्तोत्र 17:1–3, 6–8, 15

1दाविदाची प्रार्थना. हे परमेश्वरा, न्यायासाठी माझी विनवणी ऐक. माझ्या रडण्याकडे लक्ष दे! माझ्या निष्कपट ओठातून जी प्रार्थना निघते तिच्याकडे कान दे. 2तुझ्या उपस्थितीत माझा न्याय कर; जे खरे ते तुझे डोळे पाहोत. 3तू माझे हृदय पारखले आहे, रात्री तू झडती घेतली आहेस, तू मला गाळून पाहिले आहे, तरी तुला काही सापडत नाही, माझे तोंड पाप करणार नाही असा निश्चय मी केला आहे. 6देवा, मी तुला हाक मारतो, कारण तू उत्तर देतोस, तुझे कान माझ्याकडे फिरव आणि माझे बोलने ऐक. 7जो तू आपल्या उजव्या हाताने तुझ्यामध्ये आश्रय घेणाऱ्यास त्यांच्या शत्रूंपासून वाचवतो, तो तू तुझी आश्चर्यजनक प्रेमदया दाखव. 8तुझ्या डोळ्यातल्या बुबुळाप्रमाणे माझे रक्षण कर; मला तुझ्या पंखाच्या सावलीखाली लपव. 15मी न्यायीपणात तुझे मुख पाहीन, जेव्हा मी जागा होईन, तेव्हा तुझ्या दर्शनाने मी समाधानी होईन.

शुभवर्तमान

मत्त 9:32–38

32मग ते दोघे तेथून निघून जात असताना लोकांनी एका मुक्या, भूतबाधा झालेल्या मनुष्यास येशूकडे आणले. 33जेव्हा येशूने भूत काढून टाकले तेव्हा पूर्वी मुका असलेला तो मनुष्य बोलू लागला. लोकांस याचे आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “इस्राएलामध्ये यापूर्वी असे घडलेले कधीही पाहण्यात आले नव्हते.” 34परंतु परूशी म्हणाले, “हा भुतांच्या अधिपतीच्या साहाय्याने भूते काढतो.” 35येशू त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देत व राज्याच्या सुवार्तेची घोषणा करत आणि सर्वप्रकारचे रोग व सर्वप्रकारचे आजार बरे करत, प्रत्येक नगरातून व प्रत्येक गावातून फिरला. 36आणि जेव्हा त्याने लोकांचे समुदाय पाहिले तेव्हा त्यास त्यांचा कळवळा आला कारण ते चिंताक्रांत व गोंधळलेले होते व मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते. 37तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “पीक खरोखर फार आहे, पण कामकरी थोडे आहेत. 38म्हणून पिकाच्या धन्याकडे प्रार्थना करा की, त्याने आपल्या पिकाची कापणी करायला कामकरी पाठवावेत.”

आजचे संत

सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क