Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › जुलै 2027 › 7 जुलै

कॅथलिक दिनदर्शिका

दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 7 जुलै 2027

बुधवार · सामान्यकाळाचा 14वा आठवडा

सण आणि संत

सामान्यकाळाच्या 14व्या आठवड्याचा बुधवार

आठवड्याचा दिवस · उपासनेचा रंग: हिरवा

दिवसाची वाचने

पहिले वाचन

उत्प 41:55–57; 42:5–7, 17–24

55दुष्काळ पडण्यास सुरुवात झाली, तेव्हा लोकांनी अन्नासाठी फारोकडे ओरड केली. तेव्हा फारो मिसरच्या सर्व लोकांस म्हणाला, “योसेफाला विचारा व तो सांगले ते करा.” 56संपूर्ण देशामध्ये दुष्काळ पडला होता. योसेफाने सर्व गोदामे उघडली आणि मिसरच्या लोकांस धान्य विकत दिले. मिसरमध्ये फार कडक दुष्काळ पडला होता. 57सर्व पृथ्वीवरील देशातून लोक धान्य विकत घेण्यासाठी मिसरात योसेफाकडे येऊ लागले, कारण त्या वेळी पृथ्वीच्या सर्व भागांत दुष्काळ पडला होता. 42:5कनान देशात फारच तीव्र दुष्काळ पडला होता, पुष्कळ लोक धान्य विकत घ्यावयास मिसराला गेले त्या लोकात इस्राएलाचे पुत्रही होते. 6त्या वेळी योसेफ मिसरचा अधिपती होता. तो देशातल्या सर्व लोकांस धान्य विकत असे. योसेफाचे भाऊ त्याच्याकडे आले आणि त्यांनी आपली तोंडे भूमीकडे करून खाली वाकून नमन केले. 7योसेफाने आपल्या भावांना पाहिल्याबरोबर ओळखले, परंतु ते कोण आहेत हे माहीत नसल्यासारखे दाखवून तो त्यांच्याशी कठोरपणाने बोलला. त्याने त्यांना विचारले, “तुम्ही कोठून आला?” त्याच्या भावांनी उत्तर दिले, “महाराज, आम्ही कनान देशातून धान्य विकत घेण्यासाठी आलो आहो.” 17मग त्याने त्या सर्वांना तीन दिवस तुरुंगात अटकेत ठेवले. 18तीन दिवसानंतर योसेफ त्यांना म्हणाला, “मी देवाला भितो, म्हणून मी सांगतो तसे करा आणि जिवंत राहा. 19तुम्ही जर खरेच प्रामाणिक असाल तर मग तुम्हातील एका भावाला येथे तुरुंगात ठेवा व बाकीचे तुम्ही तुमच्या घरच्या मनुष्यांकरिता धान्य घेऊन जा. 20मग तुमच्या धाकट्या भावाला येथे माझ्याकडे घेऊन या. यावरुन तुम्ही माझ्याशी खरे बोलता किंवा नाही याची मला खात्री पटेल आणि तुम्हास मरावे लागणार नाही.” तेव्हा त्यांनी तसे केले. 21ते एकमेकांना म्हणाले, “खरोखर आपण आपल्या भावाविषयी अपराधी आहोत. कारण आपण त्याच्या जिवाचे दुःख पाहिले तेव्हा त्याने काकुळतीने रडून आपणास विनंती केली, परंतु आपण त्याचे ऐकले नाही. त्यामुळेच आता आपणांस हे भोगावे लागत आहे.” 22मग रऊबेन त्यांना म्हणाला, “मी तुम्हास म्हणत नव्हतो का की, ‘मुलाविरूद्ध पाप करू नका,’ परंतु तुम्ही ते ऐकले नाही. आता पाहा, त्याचे रक्त तुमच्यापासून मागितले जात आहे.” 23योसेफ दुर्भाष्यामार्फत आपल्या भावांशी बोलत असल्यामुळे, योसेफाला आपल्या भाषेतील बोलणे कळत असेल असे त्यांना वाटले नाही. 24म्हणून तो त्यांच्यापासून बाजूला जाऊन रडला. थोड्या वेळाने तो परत त्यांच्याकडे आला आणि त्यांच्याशी बोलला. त्याने शिमोनाला त्यांच्यातून काढून घेतले आणि त्यांच्या नजरेसमोरच त्यास बांधले.

प्रतिसाद स्तोत्र

स्तोत्र 33:2–3, 10–11, 18–19

2वीणा वाजवून परमेश्वरास धन्यवाद द्या; दहा तारांच्या वाद्यावर त्याचे गुणगान गा. 3त्याच्यासाठी नवे गीत गा; मोठा आवाज करून कौशल्याने वाद्ये वाजवा. 10राष्ट्रांचा उपदेश परमेश्वर मोडतो, तो लोकांच्या योजनांवर अधिकार करतो. 11परंतु परमेश्वराच्या योजना सर्वकाळ राहतात, त्याच्या हृदयातील योजना पिढ्यानपिढ्या स्थिर राहतात. 18पाहा! परमेश्वराची दृष्टी त्याचे भय बाळगणाऱ्यांवर आहे. जे त्याच्या प्रेमदयेची आशा धरतात, 19त्यांना मरणापासून, आणि दुष्काळापासून वाचवायला त्याची दृष्टी त्यांच्यावर आहे.

शुभवर्तमान

मत्त 10:1–7

1येशूने आपल्या बारा शिष्यांना आपल्याजवळ एकत्र बोलावले आणि त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यांवर प्रभुत्त्व दिले व तसेच त्या अशुद्ध आत्म्यांना घालवण्यासाठी, प्रत्येक प्रकारचे आजार व प्रत्येक प्रकारचे व्याधी बरे करण्यासाठी अधिकार दिला. 2तर त्या बारा प्रेषितांची नावे ही होती: पेत्र (ज्याला शिमोन म्हणत) आणि त्याचा भाऊ अंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान 3फिलिप्प व बर्थलमय, थोमा आणि मत्तय जकातदार, अल्फीचा मुलगा याकोब व तद्दय 4शिमोन कनानी व पुढे ज्याने त्याचा विश्वासघात केला तो यहूदा इस्कार्योत. 5येशूने या बाराजणांना अशी आज्ञा देऊन पाठवले की: परराष्ट्रीय लोकांमध्ये जाऊ नका व शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका. 6तर त्याऐवजी इस्राएलाच्या हरवलेल्या मेंढराकडे जा. 7तुम्ही जाल तेव्हा संदेश द्या व असे म्हणा, “स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”

सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क