Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › मे 2027 › 23 मे

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 10 मे (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 23 मे 2027

रविवार · स्वर 3

सण आणि संत

पास्काचा चौथा रविवार

पक्षघाती मनुष्याचा रविवार

उपवास

उपवास नाही

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

संध्याप्रार्थना: वाचन

1 योहा 3:21–4:6

21प्रिय मित्रांनो, वाईट करण्याबद्दल जर आमची अंतःकरणे आम्हास दोष देत नाहीत तर देवाकडे जाण्यासाठी आम्हास धैर्य आहे. 22आणि आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो आणि त्यास जे आवडते ते करतो. 23तो आम्हास अशी आज्ञा आहे की, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आम्ही विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे एकमेकांवर प्रीती करावी. 24जो देवाची आज्ञा पाळतो तो त्याच्यामध्ये राहतो आणि देव त्याच्यात राहतो आणि त्याने जो पवित्र आत्मा आपल्याला दिला, त्यावरून आपल्याला कळून येते की, तो आपल्याठायी राहतो. 4:1प्रियांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका परंतु ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याची परीक्षा करा कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत. 2अशाप्रकारे तुम्ही देवाचा आत्मा ओळखा “येशू ख्रिस्त देह धारण करून आला.” हे जो प्रत्येक आत्मा कबूल करतो तो देवापासून आहे. 3आणि जो प्रत्येक आत्मा येशूला कबूल करत नाही, तो देवापासून नाही. हाच ख्रिस्तविरोधकाचा आत्मा आहे; तो येणार हे तुम्ही ऐकले आहे. तो जगात आताही आहे. 4माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्यांना तुम्ही जिंकले आहे कारण जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षां जो तुमच्यामध्ये आहे; तो महान देव आहे. 5ते आत्मे जगाचे आहेत म्हणून ते जगाच्या गोष्टी बोलतात व जग त्यांचे ऐकते. 6पण आम्ही देवाचे आहोत. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो. परंतु जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. अशा रीतीने सत्य प्रकट करणारा आत्मा कोणता आणि फसवणारा आत्मा कोणता हे आपण ओळखतो.

संध्याप्रार्थना: वाचन

1 योहा 4:11–16

11प्रियांनो, जर देवाने आमच्यावर अशाप्रकारे प्रीती केली तर आम्ही एकमेकांवर प्रीती केलीच पाहिजे. 12देवाला कोणी कधीही पाहिले नाही पण जर आपण एकमेकांवर प्रीती केली तर देव आपल्यामध्ये राहतो व त्याची प्रीती आपल्यात पूर्ण होते. 13अशाप्रकारे आम्हास समजू शकते की तो आमच्यामध्ये राहतो व आम्ही त्याच्यामध्ये राहतो, त्याने त्याच्या आत्म्यातून आपल्याला दिले आहे. 14ही गोष्ट आम्ही पाहिली आहे व आम्ही साक्ष देतो की, जगाचा तारणारा म्हणून पित्याने पुत्राला पाठवले आहे. 15जर कोणी “येशू हा देवाचा पुत्र आहे” हे कबूल करतो तर त्याच्याठायी देव राहतो आणि देव त्यांच्यामध्ये राहतो. 16आणि म्हणून आम्ही ओळखतो आणि त्या प्रीतीवर आम्ही विश्वास ठेवतो की, जी देवाने आमच्यावर केली. देव प्रीती आहे आणि जो प्रीतीत राहतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्यामध्ये राहतो.

संध्याप्रार्थना: वाचन

1 योहा 4:20–5:5

20“मी देवावर प्रीती करतो,” असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील, तर तो लबाड आहे कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही तर त्यास न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. 21जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी, ही ख्रिस्ताची आपल्याला आज्ञा आहे. 5:1येशू हा ख्रिस्त आहे, असा जो कोणी विश्वास धरतो तो देवापासून जन्मलेला आहे आणि जो कोणी जन्म देणाऱ्यावर प्रीती करतो. तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरही प्रीती करतो. 2देवावर प्रीती करण्याने व त्याच्या आज्ञा पाळण्याने आम्ही ओळखतो की आम्ही देवाच्या मुलांवर प्रीती करतो. 3देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञापालन करणे आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत. 4कारण प्रत्येकजण जो देवापासून जन्मला आहे तो जगावर विजय मिळवतो आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. 5येशू हा देवाचा पुत्र आहे असा विश्वास धरणाऱ्याशिवाय जगावर विजय मिळविणारा कोण आहे?

प्रातःप्रार्थनेचे चौथे शुभवर्तमान

लूक 24:1–12

1आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्या स्त्रिया अगदी पहाटेस कबरेकडे आल्या आणि त्यांनी स्वतः तयार केलेले सुगंधी मसाले आणले. 2त्यांना धोंड कबरेवरुन लोटलेला आढळला. 3त्या आत गेल्या, परंतु त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. 4यामुळे त्या अवाक झाल्या असतानाच, अचानक लखलखीत कपडे घातलेले दोन पुरूष त्यांच्या बाजूला उभे राहिले. 5तेव्हा अतिशय भयभीत होऊन त्यांनी आपले चेहरे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, जो जिवंत आहे त्याचा शोध तुम्ही मरण पावलेल्यांमध्ये का करता? 6तो येथे नाही; तो उठला आहे! तो गालील प्रांतात असताना त्याने तुम्हास काय सांगितले याची आठवण करा. 7ते असे की, “मनुष्याच्या पुत्राला धरुन पापी लोकांच्या हाती द्यावे, त्यास वधस्तंभावर खिळावे आणि तिसऱ्या दिवशी त्याने उठावे.” 8नंतर स्त्रियांना येशूच्या शब्दाची आठवण झाली. 9त्या कबरेपासून परतल्या आणि त्यांनी या सर्व गोष्टींचे वर्तमान अकरा प्रेषितांना व इतर सर्वांना सांगितले. 10त्या स्त्रिया मग्दालीया नगराची मरीया, योहान्ना आणि याकोबाची आई मरीया या होत्या. त्या आणि इतर स्त्रियांसुद्धा ज्या त्यांच्याबरोबर होत्या, प्रेषितांना या गोष्टी सांगत होत्या. 11पण प्रेषितांना त्यांचे सांगणे मूर्खपणाचे वाटले आणि त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. 12पण पेत्र उठला आणि कबरेकडे पळाला. त्याने खाली वाकून पाहिले पण त्यास तागाच्या गुंडाळण्याच्या वस्त्राशिवाय काही आढळले नाही. जे घडले त्याविषयी तो स्वतःशीच आश्चर्य करीत दूर गेला.

प्रेषितांचे पत्र

प्रेषि 9:32–42

32मग असे झाले की, पेत्र यरूशलेम शहराच्या सभोवतालच्या गावामध्ये फिरला, लोद या गावामध्ये जे देवाचे पवित्रजन होते त्यांना भेटला. 33लोद येथे त्यास ऐनेयास नावाचा मनुष्य आढळला, त्याच्या अंगातून वारे गेल्याने तो पंगू झाला होता व आठ वर्षे अंथरुणाला खिळून होता. 34पेत्र त्यास म्हणाला, “ऐनेयास, येशू ख्रिस्त तुला बरे करीत आहे; ऊठ, आपले अंथरुण नीट कर.” ऐनेयास ताबडतोब उभा राहिला. 35लोद येथे राहणाऱ्या सर्व लोकांनी आणि शारोनात राहणाऱ्यांनी त्यास पाहिले, तेव्हा ते सर्व प्रभूकडे वळले. 36यापो शहरात येशूची एक शिष्या राहत होती, तिचे नाव तबिथा होते, (ग्रीक भाषेत तिचे नाव “दुर्कस” होते. त्याचा अर्थ हरीण) ती नेहमी लोकांसाठी चांगली कामे करीत असे गरीबांना दानधर्म करीत असे. 37जेव्हा पेत्र लोदमध्ये होता, तेव्हा तबिथा आजारी पडली व मरण पावली; लोकांनी तिला आंघोळ घालून व माडीवरच्या एका खोलीत ठेवले. 38यापो येथील शिष्यांनी ऐकले की, पेत्र लोदमध्ये आहे, लोद हे यापोजवळ आहे, म्हणून त्यांनी दोन माणसे पाठविली, त्यांनी त्यास विनंती केली, ते म्हणाले, “त्वरा करा, आमच्याकडे लवकर या.” 39पेत्र तयार झाला व त्यांच्याबरोबर गेला, जेव्हा तो तेथे पोहोचला तेव्हा त्यांनी त्यास माडीवरच्या एका खोलीत नेले, सर्व विधवा स्त्रिया पेत्राभोवती उभ्या राहिल्या, त्या रडत होत्या, दुर्कस जिवंत असताना जे कपडे व झगे तिने तयार केले होते ते त्यांनी पेत्राला दाखवले. 40पेत्राने खोलीतील सर्वांना बाहेर काढले त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली आणि दुर्कसच्या शरीराकडे वळून तो म्हणाला, “तबिथा ऊठ” तेव्हा तिने डोळे उघडले, जेव्हा तिने पेत्राला पाहीले तेव्हा ती उठून बसली. 41त्याने तिला आपला हात देऊन उभे राहण्यास मदत केली, नंतर त्याने पवित्रजनांना आणि विधवा स्त्रियांना खोलीमध्ये बोलावले, त्याने तबिथाला त्यांना दाखवले, ती जिवंत होती. 42यापोमधील सर्व लोकांस हे समजले, यातील पुष्कळ लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला.

प्रेषितांचे पत्र (संत शिमोन यांच्यासाठी)

1 करिं 4:9–16

9कारण मला वाटते की देवाने आम्हास मरण्यासाठी शिक्षा दिलेल्या अशा लोकांसारखे शेवटचे प्रेषित केले कारण आम्ही जगाला, देवदूतांना तसेच मनुष्यांना जणू तमाशा असे झालो आहोत. 10आम्ही ख्रिस्तासाठी मूर्ख, तर तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे आहात! आम्ही अशक्त आहोत, पण तुम्ही बलवान आहात! तुम्ही आदरणीय आहात, पण आम्ही तुच्छ आहोत! 11अगदी या क्षणापर्यंत आम्ही भुकेले आणि तहानलेले, उघडे आहोत, अमानुषपणे मारलेले, आम्ही बेघर असे आहोत. 12आणि आम्ही श्रम करतो, आम्ही स्वतःच्या हातांनी काम करतो, आमची निंदा होत असता आम्ही आशीर्वाद देतो. 13जेव्हा आमची निंदा होते, तेव्हा आम्ही आशीर्वाद देतो. जेव्हा आमचा छळ होतो तेव्हा आम्ही सहन करतो. जेव्हा आमची निंदा होते, आम्ही दयाळूपणे त्यांच्याशी बोलतो, या क्षणापर्यंत आम्ही जगासाठी गाळ आणि कचरा असे झालो आहोत. 14मी तुम्हास हे लाजविण्यासाठी लिहित नाही, तर उलट मी तुम्हास माझ्या प्रिय लेकरांप्रमाणे चांगल्या गोष्टींची जाणीव करून देत आहे. 15कारण जरी तुम्हास ख्रिस्तामध्ये दहा हजार गुरू असले तरी पुष्कळ वडील नाहीत कारण ख्रिस्त येशूमध्ये शुभवर्तमानाच्या योगे मी तुम्हास जन्म दिला आहे. 16यास्तव मी तुम्हास बोध करतो की माझे अनुकरण करा.

शुभवर्तमान

योहा 5:1–15

1त्यानंतर यहूद्यांचा सण होता आणि येशू यरूशलेम शहरास वर गेला. 2यरूशलेम शहरास, मेंढरे दरवाज्याजवळ एक तळे आहे, ज्याला इब्री भाषेत बेथेसदा म्हणतात, त्याच्याजवळ पाच पडव्या आहेत. 3त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे. 4कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यांत उतरून पाणी हलवत असे आणि पाणी हलवल्यानंतर त्यामध्ये प्रथम जो जाईल त्यास कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. 5तेथे अडतीस वर्षांपासून आजारी असलेला कोणीएक मनुष्य होता. 6येशूने त्यास पडलेले पाहिले व त्यास तसे पडून आता बराच काळ लोटला हे ओळखून त्यास म्हटले, “तुला बरे होण्याची इच्छा आहे काय?” 7त्या आजारी मनुष्याने त्यास उत्तर दिले, “साहेब, पाणी हालविले जाते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझ्याजवळ कोणी नाही; आणि मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो.” 8येशू त्यास म्हणाला, “ऊठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग.” 9लगेच तो मनुष्य बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. तो दिवस शब्बाथ दिवस होता. 10यावरुन यहूदी त्या बऱ्या झालेल्या मनुष्यास म्हणाले, “आज शब्बाथ आहे, बाज उचलणे तुला योग्य नाही.” 11त्याने त्यांना उत्तर दिले, “ज्याने मला बरे केले त्यानेच मला सांगितले की, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग.” 12त्यांनी त्यास विचारले, “आपली बाज उचलून चाल, असे ज्याने तुला म्हणले तो मनुष्य कोण आहे?” 13पण तो कोण होता हे त्या बऱ्या झालेल्या मनुष्यास माहित नव्हते; कारण त्याठिकाणी लोकसमुदाय असल्यामुळे येशू निसटून गेला होता. 14त्यानंतर तो येशूला परमेश्वराच्या भवनात भेटला तेव्हा तो त्यास म्हणाला, “पाहा, तू बरा झाला आहेस, आतापासून पाप करू नकोस, करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.” 15त्या मनुष्याने जाऊन यहूद्यांना सांगितले, “ज्याने मला बरे केले तो येशू आहे.”

शुभवर्तमान (संत शिमोन यांच्यासाठी)

मत्त 13:54–58

54आणि स्वतःच्या गावी आल्यावर त्याने त्याच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हे ज्ञान व अद्भूत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य या मनुष्यास कोठून मिळते? 55हा सुताराचा पुत्र ना? याच्या आईला मरीया म्हणतात ना? याकोब, योसे, शिमोन व यहूदा, हे याचे भाऊ ना? 56याच्या बहिणी, त्या सर्व आपणाबरोबर नाहीत काय? मग ते सर्व याला कोठून? 57असे ते त्याच्याविषयी अडखळले. येशूने त्यास म्हटले, “संदेष्ट्याला आपला देश व आपले घर यामध्ये मात्र सन्मान मिळत नाही.” 58तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भूत कृत्ये केली नाहीत.

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 10 मे म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 23 मे. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क