मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › मे 2027 › 13 मे
ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 30 एप्रिल (जुनी पद्धत)
ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 13 मे 2027
गुरुवार · पास्काचा दुसरा आठवडा · स्वर 1
सण आणि संत
Holy Apostle James Zebedee, brother of John the Theologian († 44)
उपवास
उपवास नाही
हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.
दिवसाची वाचने
संध्याप्रार्थना: वाचन (संत याकोब यांच्यासाठी)
1याकोब, देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक, याजकडून, जगभर पांगलेल्या, विश्वास ठेवणाऱ्या बारा यहूदी वंशांना नमस्कार. 2माझ्या बंधूंनो, ज्या ज्या वेळी तुमच्यावर निरनिराळया परीक्षा येतात तेव्हा तुम्ही आनंदच माना. 3तुम्हास माहीत आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेमुळे सहनशीलता निर्माण होते. 4आणि त्या सहनशीलतेला आपले कार्य पूर्ण करू द्या. यासाठी की तुम्ही प्रौढ, परिपूर्ण व कोणत्याही बाबतीत कमतरता नसलेले असे पूर्ण व्हावे. 5म्हणून जर तुमच्यातील कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने देवाकडे मागावे म्हणजे ते त्यास मिळेल कारण तो दोष न लावता सर्वांस उदारपणे देतो. 6पण त्याने विश्वासाने मागावे व संशय धरू नये कारण जो संशय धरतो तो वाऱ्यामुळे लोटलेल्या व उचबंळलेल्या समुद्रातील लाटेसारखा आहे. 7अशा मनुष्यांने असा विचार करू नये की, प्रभूपासून त्यास काही प्राप्त होईल. 8कारण तो द्विमनाचा असून तो सर्व मार्गात अस्थिर असतो. 9दीन असलेल्या बंधूने, आपल्या उच्चपणाविषयी अभिमान बाळगावा. 10आणि श्रीमंत बंधूने आपल्या दीन स्थितीविषयी अभिमान बाळगावा कारण तो एखाद्या गवताच्या फुलासारखा नाहीसा होईल. 11सूर्य त्याच्या तीव्र तेजाने उगवला आणि त्याने गवत कोमजवले. मग त्याचे फुल गळून पडले व त्याच्या रुपाची शोभा नाहीशी झाली. त्याचप्रमाणे श्रीमंत मनुष्यदेखील त्याच्या उद्योगात भरात कोमेजून जाईल. 12जो परीक्षा सोसतो तो धन्य आहे कारण परीक्षेत उतरल्यावर जो जीवनाचा मुकुट प्रभूने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांस देऊ केला आहे तो त्यास मिळेल.
संध्याप्रार्थना: वाचन (संत याकोब यांच्यासाठी)
13कोणाची परिक्षा होत असता, तेव्हा त्याने असे म्हणू नये की “देवाने मला मोहात घातले.” कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह पडणार नाही आणि तो कोणालाही मोहात पाडत नाही. 14तर प्रत्येकजण त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार मोहात पडतो व भुलवला जातो. 15मग इच्छा गर्भवती होऊन पापाला जन्म देते व पापाची पूर्ण वाढ झाल्यावर मरणाला उपजवते. 16माझ्या प्रिय बंधूंनो, स्वतःची फसवणूक होऊ देऊ नका. 17प्रत्येक उत्तम दान व परिपूर्ण देणगी देवाकडून आहे. जो बदलत नाही व फिरण्याने छायेत नाही अशा स्वर्गीय प्रकाश असणाऱ्या पित्यापासून ते उतरते. 18आपण त्याच्या निर्मीती मधील जसे काय प्रथमफळ व्हावे म्हणून त्याने सत्यवचनाद्वारे स्वतःच्या इच्छेने आपणाला जन्म दिला. 19माझ्या प्रिय बंधूंनो, हे लक्षात ठेवा प्रत्येक मनुष्य ऐकण्यास तत्पर असावा, बोलण्यात सावकाश असावा आणि रागास मंद असावा. 20कारण मनुष्याच्या रागामुळे देवाचे नीतिमत्त्वाचे कार्य घडत नाही. 21म्हणून तुमच्यासभोवतीच्या सर्व अमंगळ गोष्टींपासून पूर्णपणे स्वतःची सुटका करून घ्या आणि जी तुमच्या आत्म्याचे तारण करण्यास समर्थ आहे ती देवाची शिकवण तुमच्या अंतःकरणात मुळावलेली आहे ती लीनतेने स्वीकारा. 22वचनाप्रमाणे आचरण करणारे असा व फक्त ऐकणारेच असू नका तर त्याप्रमाणे करा कारण जर तुम्ही फक्त ऐकता तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता. 23जो कोणी देवाचे वचन ऐकतो परंतु त्यानुसार वागत नाही, तो आरशामध्ये आपले शारीरिक तोंड पाहणाऱ्या मनुष्यासारखा आहे. 24तो मनुष्य स्वतःकडे लक्षपूर्वक पाहतो. नंतर निघून जातो आणि आपण कसे होतो ते लगेच विसरून जातो. 25परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमाचे बारकाईने पालन करतो आणि वचन ऐकून ते विसरून न जाता त्यानुसार चालतो, तो मनुष्य जे काही करतो त्यामध्ये आशीर्वादित होईल. 26जर एखादा मनुष्य स्वतःला धार्मिक समजतो आणि तरी स्वतःच्या जीभेवर ताबा ठेवत नाही, तर तो स्वतःच्या अंतःकरणाला फसवतो. त्या व्यक्तीची धार्मिकता निरर्थक आहे. 27अनाथ व विधवा यांच्या संकटात जो त्यांची काळजी घेतो व स्वतःला जगातील बिघडलेल्या वातावरणापासून दूर ठेवतो, अशा मनुष्याची धार्मिकता देवासमोर शुद्ध व निर्दोष ठरते.
संध्याप्रार्थना: वाचन (संत याकोब यांच्यासाठी)
1माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे तुम्ही पक्षपाताने वागू नका 2कारण तुमच्या सभास्थानात कोणी सोन्याची अंगठी घालणारा, भपकेदार कपड्यातला मनुष्य आला आणि तेथे मळक्या कपड्यात कोणी गरीबही मनुष्य पण आला, 3तर भपकेदार झगा घातलेल्या मनुष्याकडे तुम्ही आदराने पाहता व त्यास म्हणता की, “इथे चांगल्या जागी बसा”; आणि गरिबाला म्हणता, “तू तिथे उभा रहा,” किंवा “इथे माझ्या पायाशी बस.” 4तर, तुम्ही आपसात भेद ठेवता आणि दुष्ट विचार करणारे न्यायाधीश झालात ना? 5माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; देवाने जगात जे गरीब आहेत त्यांना विश्वासात धनवान होण्यास आणि जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांना त्याने ज्याचे वचन दिले आहे त्या राज्याचे वारीस होण्यास निवडले आहे की नाही? 6पण तुम्ही गरिबांना तुच्छ मानले आहे. जे श्रीमंत आहेत ते तुम्हास जाचतात आणि न्यायालयात खेचून नेतात की नाही? 7आणि तुम्हास जे उत्तम नाव ख्रिस्तात मिळाले त्या चांगल्या नावाची ते निंदा करतात ना? 8खरोखर, “तू जशी आपल्यावर तशीच आपल्या शेजार्यावर प्रीती कर,” या शास्त्रलेखातील राजमान्य नियम जर तुम्ही पूर्ण करीत असाल तर तुम्ही चांगले करीत आहात. 9पण तुम्ही पक्षपात बाळगीत असाल तर तुम्ही पाप करता आणि उल्लंघन करणारे म्हणून नियमशास्त्राकडून तुम्ही दोषी ठरवले जाता. 10कारण कोणीही मनुष्य संपूर्ण नियमशास्त्र पाळतो आणि एखाद्या नियमाविषयी अडखळतो, तरी तो सर्वांविषयी दोषी ठरतो. 11कारण ज्याने म्हणले की, “व्यभिचार करू नको,” त्यानेच म्हणले की, “खून करू नको” आता, तू जर व्यभिचार केला नाहीस, पण तू खून केला आहेस तर तू नियमशास्त्र उल्लंघणारा झालास. 12तर स्वातंत्र्याच्या नियमाप्रमाणे ज्यांचा न्याय होणार आहे त्यांच्याप्रमाणे बोला आणि करा. 13कारण, ज्याने दया दाखवली नाही त्याचा न्याय दयेवाचून होईल व दया न्यायावर विजय मिळवते.
प्रातःप्रार्थना: शुभवर्तमान
15मग त्यांची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणतो, “माझी कोकरे चार.” 16तो पुन्हा दुसऱ्यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणाला, “माझी मेंढरे राख.” 17तो तिसर्यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” पेत्र दुःखी होऊन त्यास म्हणाला, “प्रभू, तुला सर्व माहीत आहे, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” येशू त्यास म्हणतो, “माझी मेंढरे चार.” 18“मी तुला खरे खरे सांगतो, तू जेव्हा तरुण होतास तेव्हा आपली कंबर बांधून तुझी इच्छा असेल तिकडे जात होतास; पण तू म्हातारा होशील तेव्हा हात पुढे करशील, दुसरा तुझी कंबर बांधील आणि तुझी इच्छा नसेल तिकडे तुला नेईल.” 19तो कोणत्या मरणाने देवाचे गौरव करणार होता हे प्रकट करायला तो हे बोलला आणि हे बोलल्यावर तो त्यास म्हणतो, “माझ्यामागे ये.” 20तेव्हा पेत्र मागे वळला आणि पाहतो की, ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती जो भोजनाच्या वेळी त्याच्या छातीशी टेकला असता मागे लवून ‘प्रभू, तुला धरून देणारा तो कोण आहे?’ असे म्हणाला होता, त्यास त्याने मागे चालतांना पाहिले. 21म्हणून, त्यास बघून, पेत्र येशूला म्हणाला, “प्रभू, ह्याचे काय?” 22येशूने त्यास म्हटले, “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर त्याचे तुला काय? तू माझ्यामागे ये.” 23तेव्हा बांधवांत हे बोलणे पसरले की, तो शिष्य मरणार नाही. पण येशू त्यास म्हणाला नव्हता की, तो मरणार नाही, पण “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर तुला काय?” 24जो या गोष्टींची साक्ष देतो व ज्याने या गोष्टी लिहिल्या आहेत तोच हा शिष्य आहे; आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हास माहीत आहे. 25आणि ह्याशिवाय येशूने केलेली पुष्कळ कृत्ये आहेत; ती एकएक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात देखील मावणार नाहीत असे मला वाटते.
प्रेषितांचे पत्र
23तेव्हा त्यांची सुटका झाल्यानंतर, ते आपल्या लोकांकडे आले आणि मुख्य याजकांनी व वडिलांनी जे काही म्हणले होते ते सर्व त्यांनी सांगितले. 24ते ऐकून ते एकचित्त होऊन देवाला उच्च वाणीने म्हणाले, “हे प्रभू, आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्वकाही ज्याने निर्माण केले तो तूच आहे. 25तुझा सेवक, आमचा पूर्वज दावीद, याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्याद्वारे तू म्हटले, ‘राष्ट्रे का खवळली व लोकांनी व्यर्थ कल्पना का केल्या? 26प्रभूविरूद्ध व त्याच्या ख्रिस्ताविरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले, व अधिकारी एकत्र जमले.’ 27कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केलास तो तुझा पवित्र सेवक, येशू, ह्याच्याविरुद्ध या नगरात परराष्ट्रीय व इस्राएली लोक यांच्याबरोबर हेरोद व पंतय पिलात एकत्र झाले. 28यासाठी की जे काही घडावे म्हणून तुझ्या हाताने व तुझ्या इच्छेने पूर्वी नेमले होते ते त्यांनी करावे. 29तर हे प्रभू, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा आणि तुझ्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन बोलावे असे दान दे. 30तू आपला हात लोकांस निरोगी करण्यास पुढे करीत असता असे कर तुझा पवित्र सेवक येशू याच्या नावाने चमत्कार व अद्भूते घडावी असे ही कर.” 31आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेमध्ये ते एकत्र जमले होते ती हालली, आणि ते सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन, देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.
प्रेषितांचे पत्र (संत याकोब यांच्यासाठी)
1त्या वेळेच्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतील काही जणांस छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला. 2योहानाचा भाऊ याकोबा ह्याला त्याने तलवारीने जिवे मारले. 3हेरोदाने पाहिले की, यहूदी अधिकाऱ्यांना हे आवडले आहे, म्हणून त्याने पेत्रालासुद्धा अटक करण्याचे ठरवले, ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. 4हेरोदाने पेत्राला अटक करून तुरुंगात टाकले, त्याच्या रखवालीकरिता त्यास शिपायांच्या चार चौकड्यांच्या स्वाधीन केले, वल्हांडण सण झाल्यावर पेत्राला लोकांसमोर आणण्याची योजना होती. 5म्हणून पेत्राला तुंरूगात ठेवण्यात आले, पण मंडळी सातत्याने पेत्रासाठी देवाकडे प्रार्थना करीत होती. 6पेत्र दोन शिपायांच्यामध्ये झोपला होता, त्यास दोन साखळ्यांनी बांधले होते, तुरुंगाच्या दाराजवळ आणखी काही शिपाई पहारा देत होते, ती रात्रीची वेळ होती व हेरोदाने असा विचार केला की, दुसऱ्या दिवशी पेत्राला लोकांसमोर आणावे. 7तेव्हा पाहा, अचानक परमेश्वराचा दूत तेथे उभा राहिला, तुरुंगाच्या खोलीत एकदम प्रकाश पडला, देवदूताने पेत्राच्या कुशीला स्पर्श करून त्यास उठवले, देवदूत म्हणाला, “लवकर ऊठ!” तेव्हा पेत्राच्या हातातील साखळ्या गळून पडल्या. 8देवदूत पेत्राला म्हणाला, “कपडे घाल व तुझ्या वहाणा घाल,” मग पेत्राने कपडे घातले, मग देवदूत म्हणाला, “तुझा झगा अंगात घाल व माझ्यामागे ये.” 9मग देवदूत बाहेर पडला व पेत्र त्याच्यामागे चालला, पेत्राला कळत नव्हते की, हे खरोखर काय करीत आहे, त्यास वाटले आपण दृष्टांत पाहत आहोत. 10पहिल्या व दुसऱ्या फेऱ्यातील पहारेकऱ्यांना ओलांडून पेत्र व देवदूत लोखंडी दाराजवळ येऊन पोहोचले, ते त्यांच्यासाठी आपोआप उघडले, पेत्र व देवदूत दरवाजामधून बाहेर पडले, त्यांनी एक रस्ता पार केला आणि अचानक देवदूत पेत्राला सोडून निघून गेला. 11पेत्राला मग कळले की नक्की काय घडले आणि तो म्हणाला, “आता मला समजले की प्रभूने खरोखर त्याचा दूत माझ्याकडे पाठविला व त्याने मला हेरोदाच्या हातातून व यहूदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे.”
शुभवर्तमान
24मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही; तो मरणातून जीवनात पार गेला आहे. 25मी तुम्हास खरे खरे सांगतो की, मरण पावलेले लोक देवाच्या पुत्राचा आवाज ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील, अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे. 26कारण पित्याच्या ठायी जसे स्वतःचे जीवन आहे तसे पुत्राच्या ठायीही स्वतःचे जीवन असावे असे त्याने त्यास दिले. 27आणि तो मनुष्याचा पुत्र आहे, या कारणास्तव न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही त्यास दिला. 28त्याचे आश्चर्य करू नका; कारण जेव्हा कबरात असलेले सर्व त्याचा आवाज ऐकतील अशी घटका येत आहे, 29आणि ज्याने सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील. 30मला स्वतः होऊन काही करता येत नाही. जसे मी ऐकतो तसा न्यायनिवाडा करतो आणि माझा निवाडा योग्य आहे कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नाही तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला पाहतो.
शुभवर्तमान (संत याकोब यांच्यासाठी)
1मग असे झाले की, तो गनेसरेत सरोवराच्या काठी उभा असता लोक देवाचे वचन ऐकण्यासाठी येशूभोवती गर्दी करू लागले, 2तेव्हा त्याने सरोवरात दोन होड्या पाहिल्या, पण होडीतील मासे पकडणारे बाहेर होते व त्यांची जाळी धूत होते. 3त्यातील एका होडीत येशू गेला जी शिमोनाची होती आणि त्याने किनाऱ्यापासून थोडे दूर नेण्यास सांगितले. नंतर तो होडीत बसला व लोकांस शिक्षण देऊ लागला. 4त्याने बोलणे संपविल्यावर तो शिमोनाला म्हणाला, “होडी खोल पाण्यात घेऊन चल आणि मासे पकडण्यासाठी तुझे जाळे खाली सोड.” 5शिमोनाने उत्तर दिले, “साहेब, संपूर्ण रात्र आम्ही खूप कष्ट घेतले पण काहीच मासे पकडू शकलो नाही. तरी तुझ्या शब्दावरून मी जाळी खाली सोडतो.” 6मग त्यांनी तसे केल्यावर त्यांच्या जाळ्यात माश्यांचा मोठा घोळका सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली 7तेव्हा त्यांनी दुसऱ्या होडीतील आपल्या सहकाऱ्यांना मदत करण्यासाठी बोलावले. ते आले आणि त्या दोन्ही होड्या माश्यांनी इतक्या भरल्या की, त्या बुडू लागल्या. 8हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, “प्रभू, माझ्यापासून दूर जा कारण मी पापी मनुष्य आहे.” 9कारण त्यांनी धरलेल्या माश्यांचा घोळका पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. 10तसेच शिमोनाचे भागीदार जब्दीचे पुत्र याकोब व योहान हेही त्यांच्याप्रमाणे आश्चर्यचकित झाले. मग येशू शिमोनाला म्हणाला, “भिऊ नको, कारण येथून पुढे तू माणसे धरणारा होशील.” 11मग तारवे किनाऱ्याला लावल्यावर त्यांनी सर्वकाही सोडले आणि त्याच्यामागे गेले.
तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 30 एप्रिल म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 13 मे. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क