मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › एप्रिल 2027 › 3 एप्रिल
कॅथलिक दिनदर्शिका
दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 3 एप्रिल 2027
शनिवार · पास्काचे अष्टक
सण आणि संत
पास्काच्या अष्टकातील शनिवार
महासण · उपासनेचा रंग: पांढरा
दिवसाची वाचने
पहिले वाचन
13तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, आणि ही निरक्षर व अशिक्षित माणसे आहेत, हे जाणून त्यांनी आश्चर्य केले, आणि हे येशूच्या संगतीत होते असे त्यांनी ओळखले. 14तेव्हा तो बरा झालेला मनुष्य त्यांच्याजवळ उभा असलेला पाहून, यहूदी पुढाऱ्यांना त्यांच्याविरुद्ध काही बोलता येईना. 15मग त्यांना सभेच्या बाहेर जाण्याची आज्ञा करून ते आपसात विचार करू लागले. 16ते म्हणाले, “या मनुष्यांस आपण काय करावे? कारण खरोखर यांच्याकडून प्रसिद्ध चमत्कार घडला आहे यरूशलेम शहरात राहणाऱ्या सर्वास माहित आहे; व ते आपण नाकारू शकत नाही. 17परंतु हे लोकांमध्ये अधिक पसरू नये, म्हणून आपण त्यांना अशी धमकी द्यावी की, यापुढे तुम्ही या नावाने कोणाशीही बोलू नये.” 18मग त्यांनी पेत्र व योहानला बोलावून आज्ञा केली की तुम्ही येशूच्या नावाने मुळीच बोलू नका व शिकवूही नका. 19परंतु पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर देऊन म्हटले, “देवापेक्षा तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे, हे तुम्हीच ठरवा. 20कारण ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या व ऐकल्या त्या आम्ही बोलू नयेत हे आम्हास शक्य नाही.” 21तेव्हा त्यांनी त्यांना आणखी धमकावून सोडून दिले, कारण लोकांमुळे त्यांना शिक्षा कशी करावी. हे त्यांना काहीच सुचेना, कारण घडलेल्या गोष्टीवरून सर्व लोक देवाचे गौरव करीत होते.
प्रतिसाद स्तोत्र
1परमेश्वरास धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे. 14परमेश्वर माझे सामर्थ्य आणि आनंद आहे. आणि तो माझे तारण झाला आहे. 15उत्सवाचा आणि तारणाचा शब्द नितीमानाच्या तंबूत ऐकू येत आहे; परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो. 16परमेश्वराचा उजवा हात उंचावला आहे; परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो. 18परमेश्वराने मला जबर शिक्षा केली; परंतु त्याने मला मृत्यूच्या हाती दिले नाही. 19माझ्यासाठी धार्मिकतेचे दरवाजे उघडा; मी त्यामध्ये प्रवेश करीन आणि मी परमेश्वरास धन्यवाद देईन. 20हे परमेश्वराचे दार आहे; नितीमान त्यातून प्रवेश करतील. 21मी तुला धन्यवाद देईन, कारण तू मला उत्तर दिले आहे आणि तू माझे तारण झाला आहेस.
शुभवर्तमान
9आठवड्याच्या पहिल्या दिवशी येशू उठल्यावर त्याने प्रथम मग्दालीया नगराची मरीयाला, जिच्यातून त्याने सात भूते काढली होती, तिला दर्शन दिले. 10ती गेली आणि रडून शोक करणाऱ्या त्याच्या अनुयायांना तिने हे वृत्त सांगितले. 11त्यांनी ऐकले की तो जिवंत आहे व तिने त्यास पाहिले आहे. तेव्हा त्यांनी तिच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नाही. 12यानंतर त्यांच्यापैकी दोघे उघड्या माळरानावर चालले होते. गावाकडे जात असता येशू त्यांना दुसऱ्या रुपाने प्रकट झाला. 13ते परत आले व इतरांना त्याविषयी सांगितले परंतु त्यांनी त्यांच्यावरही विश्वास ठेवला नाही. 14नंतर अकरा शिष्य जेवत बसले असता येशू त्यांना प्रकट झाला. त्याने शिष्यांच्या अविश्वासाबद्दल आणि त्यांच्या अंतःकरणाच्या कठोरतेबद्दल त्यांना समज दिली कारण ज्यांनी त्यास उठल्यावर पाहिले होते त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. 15तो त्यांना म्हणाला, “सर्व जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा.
सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क