मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › मार्च 2027 › 24 मार्च
कॅथलिक दिनदर्शिका
दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 24 मार्च 2027
बुधवार · पवित्र आठवडा
सण आणि संत
पवित्र आठवड्याचा बुधवार
आठवड्याचा दिवस · उपासनेचा रंग: जांभळा
दिवसाची वाचने
पहिले वाचन
4थकलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा म्हणून प्रभू परमेश्वराने, मला सुशिक्षितांची जीभ दिली आहे. तो मला सकाळी सकाळी जागे करतो; तो मला शिकविल्याप्रमाणे माझे कान उघडतो. 5प्रभू परमेश्वराने माझा कान उघडला आहे, आणि मीही बंडखोर झालो नाही किंवा मागे वळलो नाही. 6ज्यांनी मला मारले त्यांच्यापुढे मी पाठ केली आणि ज्यांनी माझ्या दाढीचे केस उपटले त्यांच्यापुढे मी आपले गाल केले. लज्जा व थुंकणे यांपासून मी आपले तोंड लपवले नाही. 7कारण प्रभू परमेश्वर मला मदत करील; म्हणून मी लज्जित झालो नाही; माझा प्रभू मला मदत करील. म्हणून मी माझे तोंड गारगोटीसारखे केले, कारण मला माहीत आहे माझी फजिती होणार नाही. 8मला नितीमान ठरवणारा परमेश्वर जवळ आहे. मला कोण विरोध करणार? उभे राहा आणि एक दुसऱ्यास धैर्याने तोंड द्या. 9पाहा, प्रभू परमेश्वर मला मदत करील. मला कोण दोषी ठरविल? पाहा, ते सर्व वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील; कसर त्यांना खाऊन टाकील.
प्रतिसाद स्तोत्र
स्तोत्र 69:7–9, 20–21, 30, 32–33
7कारण तुझ्याकरता मी निंदा सहन केली आहे; लाजेने माझे तोंड झाकले आहे. 8मी आपल्या बंधूला परका झालो आहे, आपल्या आईच्या मुलांस विदेशी झालो आहे. 9कारण तुझ्या मंदीराविषयीच्या आवेशाने मला खाऊन टाकले आहे, आणि तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेल्या निंदा माझ्यावर पडल्या आहेत. 20निंदेने माझे हृदय तुटले आहे; मी उदासपणाने भरलो आहे; माझी कीव करणारा कोणीतरी आहे का हे मी पाहिले, पण तेथे कोणीच नव्हता; मी सांत्वनासाठी पाहिले, पण मला कोणी सापडला नाही. 21त्यांनी मला खाण्यासाठी विष दिले; मला तहान लागली असता आंब दिली 30मी देवाच्या नावाची स्तुती गाणे गाऊन करीन, आणि धन्यवाद देऊन त्यास उंचाविन. 32लीनांनी हे पाहिले आहे आणि हर्षित झाले; जे देवाचा शोध घेतात त्या तुमचे हृदय जिवंत होवो. 33कारण परमेश्वर गरजवंताचे ऐकतो आणि आपल्या बंदिवानांचा तिरस्कार करत नाही.
शुभवर्तमान
14बारा शिष्यांपैकी एक यहूदा इस्कार्योत मुख्य याजकांकडे गेला. 15यहूदा म्हणाला, “मी येशूला धरून तुमच्या हाती दिले तर तुम्ही मला काय द्याल?” तेव्हा त्यांनी त्यास चांदीची तीस नाणी दिली. 16तेव्हापासून यहूदा येशूला धरून देण्याच्या संधीची वाट पाहू लागला. 17बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी येशूचे शिष्य त्याच्याकडे आले. ते म्हणाले, “आम्ही आपल्यासाठी वल्हांडणाचे जेवण कोठे करावे अशी आपली इच्छा आहे?” 18येशू म्हणाला, “तुम्ही नगरात अमुक मनुष्याकडे जा आणि त्यास सांगा; ‘गुरूजी म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे. तुझ्या घरी मी माझ्या शिष्यांसह वल्हांडण साजरा करणार आहे.” 19येशूने जे सांगितले होते ते त्याच्या शिष्यांनी केले आणि त्यांनी वल्हांडण सणाचे जेवण तयार केले. 20संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या शिष्यांबरोबर जेवावयास बसला. 21जेवण करीत असता येशू म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो तुमच्यातला एकजण माझा विश्वासघात करील.” 22ते खूप दुःखी झाले आणि त्यांच्यातील प्रत्येकजण त्यास विचारु लागला, प्रभूजी, तो मी तर नाही? 23मग येशूने उत्तर दिले, “ज्याने माझ्याबरोबर ताटात हात घातला तोच माझा विश्वासघात करील. 24जसे मनुष्याच्या पुत्राविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे, तसा तो जातो खरा; पण जो त्याचा विश्वासघात करतो त्यास धिक्कार असो! तो मनुष्य जर जन्मला नसता तर त्याच्यासाठी ते बरे झाले असते.” 25मग यहूदा, जो त्याचा विश्वासघात करणार होता, तो येशूकडे वळून म्हणाला, “रब्बी, तो मी आहे का?” येशू त्यास म्हणाला, “तू म्हणालास, तसेच आहे.”
सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क