Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › मार्च 2027 › 18 मार्च

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 5 मार्च (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 18 मार्च 2027

गुरुवार · महान लेंतचा पहिला आठवडा · स्वर 8

सण आणि संत

Martyr Conon of Isauria (1st C)

महान लेंत

कडक उपवास (कोरडे अन्न: भाकर, भाज्या, फळे)

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

सहावा तास

यश 2:11–21

11न्यायाच्या त्या दिवशी गर्विष्ठ मनुष्याची दृष्टी नीच केली जाईल, व त्याचा गर्व खाली करण्यात येईल, आणि फक्त परमेश्वराचेच नाव उंचावले जाईल. 12कारण सेनाधीश परमेश्वराचा दिवस, प्रत्येक गर्विष्ठ व उंचावलेला यांच्या विरोधात, प्रत्येक उन्मत्त व्यक्तीच्या विरोधात येईल व तो नमविला जाईल. 13आणि लबानोनातील देवदारूची सर्व उंच झाडे, आणि बाशानातील सर्व अल्लोनाची झाडे यांच्या विरोधात, 14आणि सर्व उंच पर्वत व उंचावलेल्या टेकड्या यांच्या विरोधात, 15आणि प्रत्येक उंच बुरुज व प्रत्येक अभेद्य भिंत यांच्याविरोधात, 16आणि तार्शीशातील सर्व जहाजे व समुद्र पर्यटन करणाऱ्या सर्व सुंदर नौका यांच्याविरोधात येईल. 17त्या दिवशी मनुष्याचा गर्व उतरवला जाईल, त्याचा ताठा गळून पडेल; फक्त परमेश्वरच उंचावला जाईल. 18सर्व मूर्ती पूर्णपणे नष्ट होतील. 19परमेश्वर जेव्हा पृथीवर हाहाकार करण्यास उठेल तेव्हा परमेश्वराच्या भयामुळे व त्याच्या तेजाच्या भव्यतेमुळे लोक खडकातील गुहेत व जमिनीतील भगदाडात शिरतील. 20त्या दिवशी लोक त्यांच्या चांदीच्या व सोन्याच्या मूर्ती ज्या त्यांनी त्यांची पूजा करावयास बनविल्या त्या दूर फेकून देतील, ते त्या मूर्ती दूरवर उंदरांजवळ व वटवाघूळ यांच्याकडे फेकून देतील. 21जेव्हा परमेश्वर पृथ्वीला घाबरून सोडण्यास उठेल, तेव्हा परमेश्वराच्या भयावह कृतीमुळे व त्याच्या तेजामुळे लोक खडकाच्या गुहेत व जीर्ण होऊन फुटलेल्या खडकाच्या कपारीत शिरतील.

संध्याप्रार्थना: वाचन

उत्प 2:4–19

4परमेश्वर देवाने ज्या दिवशी ते निर्माण केले, तेव्हाचा आकाश व पृथ्वीसंबंधीच्या घटनाक्रमाविषयीचा वृत्तान्त हा आहे. 5शेतातील कोणतेही झुडूप अजून पृथ्वीवर नव्हते, आणि शेतातील कोणतीही वनस्पती अजून उगवली नव्हती, कारण परमेश्वर देवाने अद्याप पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता. 6पण पृथ्वीवरुन धुके वर जात असे व त्याने सर्व जमिनीचा पृष्ठभाग पाण्याने भिजवला जात असे. 7परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जिवंत प्राणी झाला. 8परमेश्वर देवाने पूर्वेकडे एदेनात एक बाग लावली आणि त्या बागेत आपण घडविलेल्या मनुष्यास ठेवले. 9परमेश्वर देवाने दिसण्यास सुंदर आणि खाण्यास चांगले फळ देणारे प्रत्येक झाड जमिनीतून उगवले. त्यामध्ये बागेच्या मध्यभागी असलेले जीवनाचे झाड, आणि बऱ्यावाईटाचे ज्ञान देणारे झाड यांचाही समावेश होता. 10बागेला पाणी देण्यासाठी एदेनातून एक नदी निघाली. तेथून ती विभागली आणि तिच्या चार नद्या झाल्या. 11पहिल्या नदीचे नाव पीशोन. ही संपूर्ण हवीला देशामधून वाहते, तेथे सोने सापडते. 12त्या देशाचे सोने चांगल्या प्रतीचे असून तेथे मोती व गोमेद रत्नेसुद्धा सापडतात. 13दुसऱ्या नदीचे नाव गीहोन आहे. ही सगळ्या कूश देशामधून वाहते. 14तिसऱ्या नदीचे नाव टायग्रीस. ही अश्शूर देशाच्या पूर्वेस वाहत जाते. चौथ्या नदीचे नाव फरात असे आहे. 15परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत तिची मशागत करण्यासाठी व बागेची काळजी घेण्यासाठी ठेवले. 16परमेश्वर देवाने मनुष्यास आज्ञा दिली; तो म्हणाला, “बागेतील कोणत्याही झाडाचे फळ तू खुशाल खात जा; 17परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ तू खाऊ नये, कारण तू ज्या दिवशी त्या झाडाचे फळ खाशील त्याच दिवशी तू नक्कीच मरशील.” 18नंतर परमेश्वर देव बोलला, “मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही; मी त्याच्यासाठी सुसंगत मदतनीस निर्माण करीन.” 19परमेश्वर देवाने मातीमधून जमिनीवरील सर्व जातीचे प्राणी आणि आकाशातील सर्व जातीचे पक्षी उत्पन्न केले आणि त्यांना मनुष्याकडे नेले आणि मनुष्याने त्या सर्वांना नावे दिली.

संध्याप्रार्थना: वाचन

नीति 3:1–18

1माझ्या मुला, माझ्या आज्ञा विसरु नकोस, आणि माझी शिकवण तुझ्या हृदयात ठेव; 2कारण त्यापासून दीर्घायुष्य, वयोवृद्धी आणि शांती ही तुला अधिक लाभतील. 3विश्वासाचा करार आणि प्रामाणिकपणा तुला कधीही न सोडो, त्यांना एकत्र करून आपल्या गळ्यात बांध, ते आपल्या हृदयाच्या पाटीवर लिहून ठेव. 4म्हणजे तुला देवाच्या व मनुष्याच्या दृष्टीने कृपा व सुकीर्ती ही मिळतील. 5तू आपल्या सर्व अंतःकरणाने परमेश्वरावर विश्वास ठेव. आणि तुझ्या स्वत:च्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस; 6तुझ्या सर्व मार्गात त्याची जाणीव ठेव, आणि तो तुझ्या वाटा सरळ करील. 7तू आपल्याच दृष्टीने ज्ञानी असू नकोस; परमेश्वराचे भय धर आणि वाईटापासून दूर राहा. 8हे तुझ्या शरीराला आरोग्य आणि तुझ्या हाडांना सत्व असे होईल. 9तुझ्या संपत्तीने आणि आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथमफळाने परमेश्वरास मान दे, 10त्याने तुझी कोठारे समृद्धीने भरतील आणि तुझी पिंपे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. 11माझ्या मुला, परमेश्वराची शिस्त तुच्छ मानू नको, आणि त्याच्या शासनाचा द्वेष करू नकोस, 12जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला शिक्षा करतो, तसा परमेश्वर ज्यांच्यावर प्रीती करतो त्यांनाच तो शिस्त लावतो. 13ज्या कोणाला ज्ञान सापडले तो सुखी आहे, त्यास ग्रहणशक्ती सुद्धा प्राप्त होते. 14ज्ञानापासून जी काय वाढ होते त्याची प्राप्ती परत मिळणाऱ्या रुप्याच्या प्राप्तीपेक्षा चांगली आहे, आणि त्याचे फायदे उत्कृष्ट सोन्यापेक्षा चांगले आहेत. 15ज्ञान रत्नांपेक्षा अधिक मौल्यवान आहे. आणि तुम्ही त्यांची अपेक्षा कराल त्याची तुलना तिच्याशी होऊ शकणार नाही. 16तिच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे, तिच्या डाव्या हातात संपत्ती आणि सन्मान आहेत. 17तिचे मार्ग दयाळूपणाचे मार्ग आहेत, आणि तिच्या सर्व वाटा शांतीच्या आहेत. 18जे कोणी तिला धरून राहतात त्यांना ती जीवनाचे वृक्ष आहे, जो कोणी ते धरून ठेवतो तो सुखी आहे.

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 5 मार्च म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 18 मार्च. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क