मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › नोव्हेंबर 2026 › 29 नोव्हेंबर
ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 16 नोव्हेंबर (जुनी पद्धत)
ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 29 नोव्हेंबर 2026
रविवार · स्वर 1
सण आणि संत
पेन्टेकॉस्टनंतरचा 26वा रविवार
नाताळचा उपवास
मासे चालतात
हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.
दिवसाची वाचने
संध्याप्रार्थना: वाचन
1येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याजकडून, पंत, गलतीया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया या प्रांतात उपरी म्हणून पांगलेल्या देवाच्या लोकांस पत्र, 2देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार, आत्म्याच्या पवित्रीकरणाद्वारे, येशूच्या आज्ञेत राहण्यासाठी त्याचे रक्त शिंपडून निवडलेले तुम्हास कृपा व शांती विपुल मिळोत. 3आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव आणि पिता धन्यवादित असो! त्याने आपल्या महादयेने येशू ख्रिस्ताला मृतांतून उठवून आपल्याला एका जिवंत आशेत पुन्हा जन्म दिला आहे, 4आणि त्याद्वारे मिळणारे अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन स्वर्गात तुमच्यासाठी राखून ठेवले आहे, 5आणि शेवटच्या काळात प्रकट करण्याकरता सिद्ध केलेल्या तारणासाठी तुम्ही देवाच्या सामर्थ्याने विश्वासाद्वारे, राखलेले आहात. 6आणि या कारणास्तव, आताच्या काळात, निरनिराळया प्रकारच्या परीक्षांमुळे तुम्हास थोडा वेळ भाग पडल्यास तुम्ही दुःख सोशीत असताही आनंदित होता. 7म्हणजे, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्याहून मोलवान असलेल्या तुमच्या विश्वासाची परीक्षा, येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी, प्रशंसेला, गौरवाला व मानाला कारण व्हावी. 8तुम्ही त्यास बघितले नसताही तुम्ही त्याच्यावर प्रीती करता आणि त्यास पाहिले नसताही त्याच्यावर विश्वास ठेवून, तुम्ही अवर्णनीय, गौरवी आनंदाने उल्लसीत होता. 9कारण, तुमच्या विश्वासाचे प्रतिफळ, म्हणजे तुमच्या आत्म्याचे तारण तुम्ही मिळवत आहात. 10तुम्हास प्राप्त होणार्या कृपेविषयी ज्या संदेष्ट्यांनी संदेश सांगितले ते या तारणाविषयी विचार व शोध करीत होते. 11त्यांच्यामधील ख्रिस्ताचा आत्मा जेव्हा ख्रिस्ताच्या दुःखांविषयी व त्यानंतरच्या त्याच्या जिवंत उठण्याच्या गौरवी गोष्टींविषयी पूर्वीच सांगितले होते, तेव्हा त्याने कोणता किंवा कोणत्या प्रकारचा काळ दर्शवला याचा ते विचार करीत होते. 12त्यांना प्रकट झाले होते की, स्वर्गातून खाली पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, तुम्हास शुभवर्तमान सांगणार्यांनी आता ज्या गोष्टी तुम्हास सांगितल्या, त्यामध्ये ते स्वतःची नाही, पण तुमची सेवा करीत होते. त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची इच्छा देवदूतांना आहे. 13म्हणून तुम्ही आपल्या मनाची कंबर कसून सावध रहा आणि येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी तुमच्यावर जी कृपा होणार आहे तिच्यावर पूर्ण आशा ठेवा. 14तुम्ही आज्ञांकित मुले होऊन, तुमच्या पूर्वीच्या अज्ञानातील वासनांप्रमाणे स्वतःला वळण लावू नका. 15परंतु तुम्हास ज्याने पाचारण केले तो जसा पवित्र आहे तसे तुम्ही आपल्या सर्व वागण्यात पवित्र व्हा. 16कारण असे जे पवित्र शास्त्रात लिहिले आहे की, “तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे.” 17आणि पक्षपात न करता, जो प्रत्येक मनुष्याचा कामाप्रमाणे न्याय करतो त्यास तुम्ही जर पिता म्हणून हाक मारता, तर तुमच्या प्रवासाच्या काळात तुम्ही भय धरून वागले पाहिजे. 18कारण तुम्हास माहीत आहे की, तुमच्या पूर्वजांनी लावून दिलेल्या निरर्थक आचरणातून चांदीसोन्यासारख्या नाशवंत गोष्टीद्वारे, तुमची सुटका केली गेली नाही. 19निष्कलंक व निर्दोष कोकरा झालेल्या ख्रिस्ताच्या मोलवान रक्ताद्वारे तुम्ही मुक्त झाला आहात. 20खरोखर, जगाच्या स्थापने अगोदर, तो पूर्वीपासून नेमलेला होता. पण या शेवटच्या काळात तो तुमच्यासाठी प्रकट झाला, 21आणि त्याच्याद्वारे तुम्ही देवावर विश्वास ठेवला; कारण देवावर तुमचा विश्वास व तुमची आशा असावी म्हणून त्यास मृतांतून उठवून गौरव दिला. 22तुम्ही जर आत्म्याच्याद्वारे, सत्याचे आज्ञापालन करून, निष्कपट बंधुप्रेमासाठी आपले जीव शुद्ध केले आहे, तर तुम्ही आस्थेने एकमेकांवर मनापासून प्रीती करा. 23कारण तुम्ही नाशवंत बीजाकडून नाही पण अविनाशी बीजाकडून, म्हणजे देवाच्या, जिवंत टिकणार्या वचनाच्याद्वारे तुमचा पुन्हा जन्म पावलेले आहात. 24कारण पवित्रशास्त्रात असे लिहिले आहे, “सर्व मानवजाती गवतासारखी आहे व तिचे सर्व वैभव गवताच्या फुलासारखे आहे गवत वाळते व त्याचे फूल गळते. 25परंतु परमेश्वराचे वचन सर्वकाळ टिकते.” तुम्हास त्याच वचनाचे शुभवर्तमान तुम्हास सांगण्यात आले ते तेच आहे. 2:1म्हणून तुम्ही सर्व दुष्टपणा, सर्व कपट, ढोंग, हेवा व सर्व दुर्भाषणे दूर ठेवून, 2परमेश्वर कृपाळू आहे, असा तुम्ही अनुभव घेतला आहे तर तुम्ही त्याद्वारे तारणासाठी तुमची वाढ व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे आध्यात्मिक निऱ्या दुधाची इच्छा धरा. 4मनुष्यांनी नाकारलेल्या पण देवाने निवडलेल्या मोलवान अशा जिवंत दगडाकडे तुम्ही येत असता, 5तुम्हीही जिवंत दगडांप्रमाणे, आत्मिक भवन असे, रचले जात आहात देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ, येशू ख्रिस्ताद्वारे, अर्पण करण्यासाठी एक पवित्र याजकगण असे उभारले जात आहात. 6म्हणून शास्त्रलेखातही असे आहे की, “पाहा, मी एक निवडलेला व मोलवान असलेला, कोनशिला सियोनात ठेवतो आणि जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो फजीत होणार नाही.”
संध्याप्रार्थना: वाचन
21कारण ह्यासाठीच तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख सोसले आहे; आणि तुम्ही त्याच्या पावलांवरून मागोमाग जावे म्हणून त्याने तुमच्यासाठी कित्ता ठेवला आहे. 22त्याने पाप केले नाही व त्याच्या मुखात काही कपट आढळले नाही. 23त्याची हेटाळणी होत असता त्याने फिरून हेटाळले नाही, आणि सोशीत असता त्याने धमकावले नाही; पण देव जो नीतीने न्याय करतो त्याच्या हातात त्याने स्वतःस सोपवले. 24त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून वधस्तंभावर नेली, ह्यासाठी की, आपण पापाला मरून नीतिमत्त्वाला जिवंत रहावे; त्यास बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. 25कारण तुम्ही मेंढरांसारखे बहकत होता; पण जो तुमच्या जीवांचा मेंढपाळ व रक्षक आहे, त्याच्याकडे आता परत आला आहात. 3:1आणि तुम्ही विवाहित स्त्रियांनो, आपल्या पतीच्या अधीन रहा; म्हणजे कोणी वचनाला अमान्य असेल, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मळ वर्तन पाहून ते वचनांवाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे कारण ते तुमचे शुद्ध, आदराचे आचरण पाहतील. 3तुमची शोभा ही केस गुंफणे, सोन्याची दागिने घालणे आणि उंची वस्त्रे वापरणे ह्यांची बाहेरची शोभा असू नये; 4पण अंतःकरणात गुप्त राहणार्या मानवी स्वभावात, म्हणजे देवाच्या दृष्टीने बहुमोल असलेल्या, सौम्य आणि शांत आत्म्याच्या अविनाशी भूषणात ती असावी. 5कारण देवावर आशा ठेवणार्या, प्राचीन काळच्या, पवित्र स्त्रियांनीही अशाप्रकारे आपल्या पतीच्या अधीन राहून स्वतःला शोभवत असत. 6उदाहरणार्थ, सारेनेही अब्राहामाला धनी म्हणून त्याच्या आज्ञा पाळल्या. तुम्ही चांगले करीत असाल आणि कोणत्याही भयाला भीत नसाल तर तुम्ही तिच्या मुली झाला आहात. 7पतींनो, तुम्हीही आपल्या पत्नीला अधिक नाजूक पात्राप्रमाणे, आपल्या ज्ञानानुसार, मान द्या आणि जीवनाच्या कृपेचे जोडीचे वारीस म्हणून एकत्र रहा, म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येवू नये. 8शेवटी सर्वजण एकमनाचे व्हा आणि एकभावाचे होऊन बंधुप्रेम बाळगणारे, कनवाळू व प्रेमळ मनाचे व्हा. 9तर वाईटाबद्दल वाईट आणि निंदेबद्दल निंदा, अशी परतफेड करू नका, पण आशीर्वाद द्या कारण ह्यासाठीच तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; म्हणजे तुम्हास आशीर्वाद हे वतन मिळावे.
संध्याप्रार्थना: वाचन
1म्हणून ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले आणि तुम्हीही त्याच्या वृत्तीची शस्त्रसामग्री परिधान करा कारण ज्याने देहात सोसले आहे तो पापापासून दूर झाला आहे. 2म्हणून अशा मनुष्याने आपल्या देहातील पुढील आयुष्य, मनुष्यांच्या वासनांसाठी नाही, पण देवाच्या इच्छेसाठी जगावे. 3कारण परराष्ट्रीयांच्या इच्छेप्रमाणे करण्यास गेलेला काळ पुरे झाला. तेव्हा तुम्ही कामातुरपणात, वासनांत, दारूबाजीत, दंगलीत, तसेच बदफैली व अमंगळ मूर्तीपूजेत आपल्या मार्गाने गेलात. 4अशा बेतालपणाच्या स्वैराचरणात आता तुम्ही त्यांच्याबरोबर घुसत नाही, ह्याचे त्यांना नवल वाटून ते तुमची निंदा करतात. 5तरीही, देव जो जिवंतांचा व मृतांचा न्याय करण्यास तयार आहे त्यास ते आपला हिशोब देतील. 6कारण, याकरिता, मृतांनादेखील शुभवर्तमान सांगण्यात आले होते; म्हणजे जरी मनुष्यांप्रमाणे त्यांचा देहात न्याय झाला तरी त्यांनी देवाप्रमाणे आत्म्यात जिवंत रहावे. 7पण सर्व गोष्टींचा शेवट जवळ आला आहे म्हणून समंजस मनाचे व्हा आणि प्रार्थनेसाठी सावध रहा; 8आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही की आपल्यात वाढती प्रीती ठेवा, कारण प्रीतीने पापांची रास झाकली जाते. 9काही कुरकुर न करता तुम्ही सर्वजण एकमेकांचा पाहुणचार करणारे व्हा. 10तुम्ही देवाच्या बहुविध कृपेचे चांगले कारभारी या नात्याने, प्रत्येकास मिळालेल्या कृपादानाने एकमेकांची सेवा करा. 11जो भाषण करतो त्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे व जो सेवा करतो त्याने आपण आपली सेवा देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत अशी करावी. म्हणजे, येशू ख्रिस्ताद्वारे, सर्व गोष्टींत देवाचे गौरव करावे, त्यास गौरव व पराक्रम ही युगानुयुग असोत. आमेन.
प्रातःप्रार्थनेचे चौथे शुभवर्तमान
1आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्या स्त्रिया अगदी पहाटेस कबरेकडे आल्या आणि त्यांनी स्वतः तयार केलेले सुगंधी मसाले आणले. 2त्यांना धोंड कबरेवरुन लोटलेला आढळला. 3त्या आत गेल्या, परंतु त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. 4यामुळे त्या अवाक झाल्या असतानाच, अचानक लखलखीत कपडे घातलेले दोन पुरूष त्यांच्या बाजूला उभे राहिले. 5तेव्हा अतिशय भयभीत होऊन त्यांनी आपले चेहरे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, जो जिवंत आहे त्याचा शोध तुम्ही मरण पावलेल्यांमध्ये का करता? 6तो येथे नाही; तो उठला आहे! तो गालील प्रांतात असताना त्याने तुम्हास काय सांगितले याची आठवण करा. 7ते असे की, “मनुष्याच्या पुत्राला धरुन पापी लोकांच्या हाती द्यावे, त्यास वधस्तंभावर खिळावे आणि तिसऱ्या दिवशी त्याने उठावे.” 8नंतर स्त्रियांना येशूच्या शब्दाची आठवण झाली. 9त्या कबरेपासून परतल्या आणि त्यांनी या सर्व गोष्टींचे वर्तमान अकरा प्रेषितांना व इतर सर्वांना सांगितले. 10त्या स्त्रिया मग्दालीया नगराची मरीया, योहान्ना आणि याकोबाची आई मरीया या होत्या. त्या आणि इतर स्त्रियांसुद्धा ज्या त्यांच्याबरोबर होत्या, प्रेषितांना या गोष्टी सांगत होत्या. 11पण प्रेषितांना त्यांचे सांगणे मूर्खपणाचे वाटले आणि त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. 12पण पेत्र उठला आणि कबरेकडे पळाला. त्याने खाली वाकून पाहिले पण त्यास तागाच्या गुंडाळण्याच्या वस्त्राशिवाय काही आढळले नाही. जे घडले त्याविषयी तो स्वतःशीच आश्चर्य करीत दूर गेला.
प्रेषितांचे पत्र (संत मत्तय यांच्यासाठी)
9कारण मला वाटते की देवाने आम्हास मरण्यासाठी शिक्षा दिलेल्या अशा लोकांसारखे शेवटचे प्रेषित केले कारण आम्ही जगाला, देवदूतांना तसेच मनुष्यांना जणू तमाशा असे झालो आहोत. 10आम्ही ख्रिस्तासाठी मूर्ख, तर तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे आहात! आम्ही अशक्त आहोत, पण तुम्ही बलवान आहात! तुम्ही आदरणीय आहात, पण आम्ही तुच्छ आहोत! 11अगदी या क्षणापर्यंत आम्ही भुकेले आणि तहानलेले, उघडे आहोत, अमानुषपणे मारलेले, आम्ही बेघर असे आहोत. 12आणि आम्ही श्रम करतो, आम्ही स्वतःच्या हातांनी काम करतो, आमची निंदा होत असता आम्ही आशीर्वाद देतो. 13जेव्हा आमची निंदा होते, तेव्हा आम्ही आशीर्वाद देतो. जेव्हा आमचा छळ होतो तेव्हा आम्ही सहन करतो. जेव्हा आमची निंदा होते, आम्ही दयाळूपणे त्यांच्याशी बोलतो, या क्षणापर्यंत आम्ही जगासाठी गाळ आणि कचरा असे झालो आहोत. 14मी तुम्हास हे लाजविण्यासाठी लिहित नाही, तर उलट मी तुम्हास माझ्या प्रिय लेकरांप्रमाणे चांगल्या गोष्टींची जाणीव करून देत आहे. 15कारण जरी तुम्हास ख्रिस्तामध्ये दहा हजार गुरू असले तरी पुष्कळ वडील नाहीत कारण ख्रिस्त येशूमध्ये शुभवर्तमानाच्या योगे मी तुम्हास जन्म दिला आहे. 16यास्तव मी तुम्हास बोध करतो की माझे अनुकरण करा.
प्रेषितांचे पत्र
8कारण एकेकाळी तुम्ही पूर्णपणे अंधारात होता पण आता तुम्ही प्रभूच्या प्रकाशात आहात. तर आता प्रकाशात चालणाऱ्या लेकरांसारखे व्हा. 9कारण प्रकाशाची फळे चांगुलपणा, नीतिमत्त्व आणि सत्यात दिसून येतात. 10प्रभूला कशाने संतोष होईल हे पारखून घ्या. 11आणि अंधाराची जी निष्फळ कार्ये आहेत त्याचे भागीदार होऊ नका. त्याऐवजी, ती उघडकीस आणा. 12कारण ज्या गुप्त गोष्टी त्यांनी केल्या आहेत, त्याविषयीचे वर्णन करणेदेखील लज्जास्पद आहे. 13सर्वकाही प्रकाशाद्वारे उघड होते. 14कारण त्या सर्वावर तो प्रकाश चमकतो म्हणून असे म्हणले आहे “हे झोपलेल्या जागा हो, आणि मरण पावलेल्यातून ऊठ, आणि ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल.” 15म्हणून, तुम्ही कसे जगता, याविषयी काळजीपूर्वक असा. मूर्ख लोकांसारखे होऊ नका, तर शहाण्या लोकांसारखे व्हा. 16वेळेचा चांगला उपयोग करा कारण ज्या दिवसात तुम्ही राहत आहात ते वाईट आहेत. 17म्हणून मूर्खासारखे वागू नका, तर उलट परमेश्वराची इच्छा काय आहे ते समजून घ्या. 18आणि द्राक्षरस पिऊन झिंगल्यासारखे राहू नका; त्यामुळे तो नाशाकडे जातो, परंतु उलट पवित्र आत्म्याने पूर्णपणे भरले जा, 19सर्व प्रकारची स्तोत्रे, गीते आणि आत्मिक गीतांनी त्याची स्तुती करा. एकमेकाबरोबर सुसंवाद साधा, गीत गा आणि आपल्या अंतःकरणाने परमेश्वराची स्तुती करा.
शुभवर्तमान (संत मत्तय यांच्यासाठी)
9मग येशू तेथून पुढे निघाला असता, तेव्हा त्याने मत्तय नावाच्या मनुष्यास, जकात गोळा करतात त्या नाक्यावर बसलेले पाहिले. तेव्हा येशू त्यास म्हणाला, “माझ्यामागे ये.” तेव्हा तो उठला आणि त्याच्यामागे गेला. 10येशू मत्तयाच्या घरी जेवत असता, पुष्कळ जकातदार व पापी तेथे आले आणि येशू व त्याचे शिष्य यांच्याबरोबर जेवायला बसले. 11जेव्हा परूशांनी ते पाहिले तेव्हा त्यांनी येशूच्या शिष्यांना विचारले, “तुमचा गुरू जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर का जेवतो?” 12येशूने त्यांना हे बोलताना ऐकले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “वैद्याची गरज जे निरोगी आहेत त्यांना नाही, तर जे आजारी आहेत त्यांना आहे. 13मी तुम्हास सांगतो, जा आणि याचा अर्थ काय ते शिका; मला दया हवी आहे आणि यज्ञ नको, कारण मी नीतिमानांना नव्हे, तर पाप्यांना पश्चात्तापासाठी बोलावण्यास आलो आहे.”
शुभवर्तमान
25नंतर एक नियमशास्त्राचा शिक्षक उभा राहिला आणि त्याने येशूची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला, तो म्हणाला, “गुरुजी, अनंतकाळचे जीवन मिळण्यासाठी मी काय केले पाहीजे?” 26तेव्हा येशू त्यास म्हणाला, “नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तू त्यामध्ये काय वाचतोस?” 27तो म्हणाला, “तू तुझा देव प्रभू याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण आत्म्याने, पूर्ण शक्तीने प्रीती कर.” व स्वतःवर जशी प्रीती करतोस तशी तू आपल्या शेजाऱ्यावरही प्रीती कर. 28तेव्हा येशू त्यास म्हणाला, “तू बरोबर उत्तर दिलेस, हेच कर म्हणजे तू जगशील.” 29पण आपण योग्य प्रश्न विचारला आहे हे इतरांना दाखवून देण्यासाठी त्याने येशूला विचारले, “मग माझा शेजारी कोण?” 30येशूने उत्तर दिले, “एक मनुष्य यरूशलेम शहराहून यरीहोस निघाला होता आणि तो लुटारुंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्यास मारले व त्यास अर्धमेला टाकून ते निघून गेले. 31तेव्हा त्याचवेळी एक याजक त्या रस्त्याने जात होता. याजकाने त्यास पाहिले, पण तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला. 32त्याच रस्त्याने एक लेवी त्याठिकाणी आला. लेव्याने त्यास पाहिले व तो सुद्धा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला. 33मग एक शोमरोनी त्याच रस्त्याने प्रवास करीत असता तो होता तेथे आला त्या मनुष्यास पाहून त्यास त्याचा कळवळा आला 34तो त्याच्याजवळ आला त्याच्या जखमांवर तेल व द्राक्षरस ओतून त्या बांधल्या आणि त्यास आपल्या गाढवावर बसवून त्यास उतारशाळेत आणले व त्याची देखभाल केली. 35दुसऱ्या दिवशी त्याने दोन चांदीचे नाणे काढले आणि उतारशाळेच्या मालकाला दिले व म्हणाला, ‘याची चांगली देखभाल कर म्हणजे यापेक्षा जे तू अधिक खर्च करशील ते मी परत आल्यावर तुला देईन.’ 36लुटारुंच्या तावडीत जो मनुष्य सापडला होता, त्याचा त्या तिघांपैकी कोण खरा शेजारी होता असे तुला वाटते?” 37तो नियमशास्त्राचा शिक्षक म्हणाला, “ज्याने त्याच्यावर दया केली तो.” तेव्हा येशू त्यास म्हणाला, “जा आणि तूही तसेच कर.”
तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 16 नोव्हेंबर म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 29 नोव्हेंबर. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क