Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › राजे आणि इतिहास शेजारी शेजारी › हिज्कीयापासून योशीयापर्यंत

राजे आणि इतिहास शेजारी शेजारी · हिज्कीयापासून योशीयापर्यंत

योशीया आणि नियमशास्त्राचे पुस्तक

2 राजे 22:1–20 · 2 इति 34:1–28

2 राजे

2 राजे 22:1–20

1योशीया राज्य करु लागला तेव्हा आठ वर्षांचा होता. त्याने यरूशलेमामध्ये एकतीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव यदीदा. ती बसकाथमधील अदाया याची मुलगी.

2योशीयाचे वर्तन परमेश्वराच्या दृष्टीने नीट ते तो करीत असे. आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणे तो चालला. परमेश्वराच्या शिकवणुकी प्रमाणेच वागला. देवाला जसे पाहिजे तेच त्याने केले.

3मशुल्लामचा मुलगा असल्या याचा मुलगा शाफान चिटणीस, याला योशीया राजाने कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी परमेश्वराच्या मंदिरात पाठवले आणि सांगितले.

4“तिथे तू महायाजक हिल्कीया याच्याकडे जा. द्वारपालांनी लोकांकडून गोळा केलेले पैसे या याजकाकडे जमा व्हायला हवेत. हा परमेश्वराच्या मंदिरात जमा झालेला पैसा आहे.

5परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखेरख करणाऱ्यांना याजकांनी यातील पैसे द्यावेत. मंदिराची दुरुस्ती करणाऱ्या कारागिरांना देण्यासाठी या पैशाचा विनियोग व्हावा.

6सुतार, गवंडी, पाथरवट यांना तसेच लाकूड घेणे, चिरे घडवणे यासाठी पैसे द्यावेत.

7पण त्यांना दिलेल्या पैशाचा हिशोब मागू नये कारण ही मंडळी विश्वसनीय आहे.”

8महायाजक चिटणीस शाफान याला म्हणाला, “मला परमेश्वराच्या मंदिरात नियमशास्त्राचे पुस्तक सापडले आहे.” मग ते पुस्तक याजक हिल्कीयाने शाफानला दिले. शाफानने ते वाचले.

9शाफानने परत येऊन राजाला सर्व वर्तमान सांगितले. तो म्हणाला, “तुझ्या सेवकांनी मंदिरातील सर्व पैसा एकत्र करून तो परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखरेख करणाऱ्यांना त्यांनी दिला आहे.”

10पुढे शाफान राजाला म्हणाला, “याजक हिल्कीया याने हे पुस्तकही मला दिले.” शाफानने ते राजाला वाचून दाखवले.

11नियमशास्त्रातील वचने ऐकून राजाने अति दु:ख प्रदर्शित करण्यासाठी आपली वस्त्रे फाडली.

12मग राजाने याजक हिल्कीया, शाफानचा मुलगा अहीकाम, मिखायाचा मुलगा अखबोर, शाफान चिटणीस आणि सेवक असाया यांना आज्ञा केली की,

13“आता जाऊन परमेश्वराचा कौल घ्या. मी, आपले लोक आणि सर्व यहूदा यांच्या वतीने त्यास या पुस्तकातील वचनांविषयी विचारा. परमेश्वराचा आपल्यावर कोप झाला आहे. कारण आपल्या पूर्वंजांनी या पुस्तकातील वचनांचा भंग केला आहे. आपल्यासाठी लिहून ठेवलेल्या सर्व गोष्टी त्यांनी आचरणात आणल्या नाहीत.

14मग हिल्कीया याजक, अहीकाम, अखबोर, शाफान, असाया हे सर्व हुल्दा या संदेष्ट्रीकडे गेले. हरहसचा मुलगा तिकवा याचा मुलगा शल्लूम याची ती पत्नी. शल्लूम याजकांच्या कपड्यांचे खाते सांभाळी, हुल्दा यरूशलेमामध्ये दुसऱ्या भागात राहत होती. हे सर्वजण तिच्याकडे गेले आणि तिच्याशी बोलले.”

15तेव्हा हुल्दा त्यांना म्हणाली, इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो: तुम्हास माझ्याकडे ज्याने पाठवले त्यास सांगा,

16“परमेश्वराचे म्हणणे आहे की, हा प्रदेश आणि तेथे राहणारे लोक यांच्यावर आता मी अरिष्ट आणणार आहे. यहूदाच्या राजाने त्या पुस्तकात वाचली तीच संकटे येतील.”

17यहूदाच्या लोकांनी माझा त्याग केला. इतर दैवतांपुढे त्यांनी धूप जाळला. त्यांनी मला संताप आणला, त्यांनी अनेक मूर्तींही केल्या. म्हणून या प्रदेशावर माझा राग आहे. न विझवता येणाऱ्या अग्नीसारखा माझा संताप असेल.

18“यहूदाचा राजा योशीया याने तुम्हास परमेश्वराचा कौल घ्यायला पाठवले. योशीयाला हे सांगा: ‘इस्राएलाचा देव परमेश्वराची वचने तू ऐकलीस. हा प्रदेश आणि येथील लोक यांच्याविषयी मी सांगितले ते ऐकलेस.

19तू मृदू मनाचा आहेस. या गोष्टी ऐकून तुला दु:ख झाले. यरूशलेमेवर अरिष्ट येईल असे मी म्हणालो तेव्हा शोकाने तू वस्त्रे फाडलीस आणि रडलास. म्हणून मीही तुझे ऐकले आहे.” हे परमेश्वराचे शब्द आहेत.

20“ती तुझी तुझ्या पूर्वजांशी भेट करून देईन. तुला मरण येईल आणि तू सुखाने कबरीत पडशील. यरूशलेमेवर येणारे अरिष्ट तुला आपल्या डोळ्यांनी पाहावे लागणार नाही.” मग याजक हिल्कीया, अहीकाम, अखबोर, शाफान, असाया यांनी हा संदेश राजाला सांगितला.

2 इतिहास

2 इति 34:1–28

1योशीया, राजा झाला तेव्हा आठ वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेमध्ये एकतीस वर्षे राज्य केले.

2त्याने वर्तन योग्य प्रकारचे होते परमेश्वराची त्याच्याकडून जशी अपेक्षा होती तसेच तो वागला आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणे त्याने सत्कृत्ये केली. सन्मार्गावरुन तो ढळला नाही.

3आपल्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षीच तो आपला पूर्वज दावीद याच्या परमेश्वराच्या भजनी लागला. योशीयाने लहान वयातच हा मार्ग पत्करला आणि कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी यहूदा आणि यरूशलेमेला शुद्ध केले, उंचस्थाने, अशेरा देवीचे खांब, कोरीव आणि ओतीव मूर्ती यांची मोडतोड केली.

4लोकांनी त्याच्या समोरच बआलदेवतांच्या मूर्ती फोडून टाकल्या. वरच्या भागात असलेल्या धूप जाळण्याच्या वेद्या योशीयाने उद्ध्वस्त केल्या. अशेराच्या मूर्ती ओतीव आणि कोरीव मूर्तीचाही त्याने पार चुराडा करून टाकला आणि हे चूर्ण, ज्या लोकांनी बआल देवतांसाठी यज्ञ केले त्यांच्या कबरीवर पसरले.

5बआल देवतांची पूजा करणाऱ्या याजकांच्या अस्थी देखील त्याने त्यांच्याच वेद्यांवर जाळून टाकल्या. अशाप्रकारे त्याने यहूदा आणि यरूशलेमला शुद्ध केले.

6मनश्शे, एफ्राइम, शिमोन, नफताली येथपर्यंतच्या शहरांतून आणि त्यांच्या आसपासच्या पडीक जागेत त्याने हेच केले.

7त्याने वेद्या मोडून टाकल्या, अशेरा खांबांची मोडतोड करून चूर्ण केले धूपाच्या वेद्या उखडणे ही इस्राएलभरची मोहीम उरकल्यावर योशीया यरूशलेमेला परतला.

8योशीयाने राज्याची सूत्रे हाती घेतल्याच्या अठराव्या वर्षी शाफान, मासेया, आणि योवाह यांना परमेश्वर देवाचे मंदिर दुरुस्तीसाठी पाठवले. शाफानच्या पित्याचे नाव असल्या, मासेया हा नगराचा कारभारी होता आणि योवाहाचे पिता योवाहाज. योवाह हा बखरकार होता. यहूदा आणि मंदिर यांच्या शुद्धीकरणासाठी मंदिराच्या डागडुजीचे हे काम योशीयाने अंगावर घेतले.

9ही माणसे हिल्कीया या मुख्य याजकाकडे गेली. मनश्शे, एफ्राइम आणि उर्वरित सर्व इस्राएलातून लोकांनी देवाच्या मंदिरासाठी दिलेला पैसा लेवी द्वारपालांनी जमा केला होता. सर्व यहूदा प्रांत, बन्यामिनचा प्रदेश आणि यरूशलेमेतून देखील त्यांनी पैसे जमा केले होते. ही रक्कम हिल्कीयाकडे त्यांनी सुपूर्त केली.

10मग, परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामावर देखरेख करणाऱ्यांना लेवींनी हे पैसे दिले आणि परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी कामगारांना दिले.

11तासलेले चिरे, लाकूड यांच्या खरेदीसाठी गवंडी, सुतार या लोकांस पैसे देण्यात आले. मंदिराच्या दुरुस्तीसाठी आणि कडीपाटासाठी लाकूड लागले. यहूदाचा राजांनी यापूर्वी मंदिराची योग्य देखभाल न केल्यामुळे मंदिराच्या इमारती जीर्ण झाल्या होत्या.

12कामगारांनी मन लावून काम केले. यहथ व ओबद्या हे मरारी कुळातील लेवी देखरेख करत होते. कहाथी वंशातील जखऱ्या आणि मशुल्लाम हे ही देखरेखीच्या कामावर होते. वाद्ये वाजवण्यात निपुण असलेले लेवीसुध्दा होते.

13ते कारागिरांवर आणि मजुरांवर देखरेख करत होते. चिटणीस, कारभारी आणि द्वारपाल म्हणून काही लेवी काम करत होते.

14परमेश्वराच्या मंदिरातील पैसा लेवी बाहेर आणत असताना हिल्कीया या याजकाला मोशेद्वारे आलेला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला.

15हिल्कीयाने शाफान चिटणीसास असे सांगितले कि, “परमेश्वराच्या मंदिरात मला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” मग हिल्कीयाने शाफानाला तो ग्रंथ दिला.

16शाफानने तो योशीयाकडे आणला. राजाला तो म्हणाला, “तुझे सेवक तुझ्या आज्ञेप्रमाणे वागत आहेत.

17परमेश्वराच्या मंदिरातील पैसा घेऊन त्यातून ते देखरेख करणाऱ्यांना आणि मजुरांना वेतन देत आहेत”

18शाफान पुढे राजाला म्हणाला, “याजक हिल्कीयाने मला हे पुस्तक दिले आहे.” शाफानने मग राजाला पुस्तकातील मजकूर वाचून दाखवला.

19तो नियमशास्त्रग्रंथ ऐकत असता राजा योशीयाने आपले कपडे फाडले.

20आणि हिल्कीया, शाफानचा पुत्र अहीकाम, मीखाचा पुत्र अब्दोन, चिटणीस शाफान आणि आपला सेवक असाया यांना योशीयाने आज्ञा केली की.

21“माझ्या आणि इस्राएल व यहूदा येथे आता शिल्लक असलेल्या लोकांच्या वतीने परमेश्वरास जाऊन विचारा. या पुस्तकातील वचनांविषयी त्यास विचारा. आपल्या पूर्वजांनी परमेश्वराचे म्हणणे न जुमानल्यामुळे परमेश्वराचा आपल्यावर कोप झाला आहे. आपल्या पूर्वजांचे वर्तन या पुस्तकातील वचनांना अनुसरुन नव्हते.”

22हिल्कीया आणि राजाचे सेवक हुल्दा नावाच्या संदेष्टीकडे गेले. हुल्दा ही शल्लूमची पत्नीशल्लूम ताकहतचा आणि ताकहत इस्त्राचा पुत्र. इस्त्रा राजाच्या वस्त्रागाराचा प्रमुख होता. हुल्दा यरूशलेमेच्या नवीन भागात राहत होती. हिल्कीया आणि राजाचे सेवकांनी तिला सर्व जे घडले ते सांगितले.

23हुल्दा त्यांना म्हणाली, “इस्राएलाचा परमेश्वर देव याचे म्हणणे असे आहे.” राजा योशीयाला म्हणावे:

24परमेश्वर म्हणतो, “या प्रदेशावर आणि इथे राहणाऱ्या लोकांवर मी कोप आणणार आहे.” यहूदाच्या राजाला जे पुस्तक वाचून दाखवण्यात आले. त्यातील मजकुरात आहेत ती सर्व संकटे त्यांच्यावर ओढवतील.

25माझ्याकडे पाठ फिरवून इतर देवतांपुढे त्यांनी धूप जाळला म्हणून मी असे करणार आहे. आपल्या दुष्कृत्यांमुळे लोकांनी मला सतंप्त केले आहे. या क्रोधाचा अंगार त्यांच्यावर बरसेल आणि तो शांत होणार नाही.

26पण यहूदाचा राजा योशीया याला सांग, त्यानेच तुला माझ्याकडे पाठवले आहे की तू नुकतेच जे ऐकलेस त्याविषयी इस्राएलाचा परमेश्वर देव म्हणतो:

27योशीयाने, पश्चातापाने देवासमोर विनम्र झाला. खेदाने आपले कपडे फाडलेस. तू रडलास. तू मृदू अंत:करणाचा असल्यामुळे

28तुझ्या पूर्वजांकडे मी तुला नेईन. तुला शांत मरण येईल. या प्रदेशावर आणि लोकांवर जी संकटे कोसळतील ती तुला पाहायला लागणार नाहीत. हिल्कीया आणि राजाचे सेवक यासर्वांनी हा निरोप राजाला येऊन सांगितला.

खूण केलेले: प्रत्येक वृत्तांतात असलेले शब्द, तुम्ही वाचता त्या भाषांतरात. सर्वात वारंवार येणारे शब्द (“आणि”, “तो”) खूण केलेले नाहीत; दुसऱ्या रूपातील शब्दाची खूण कदाचित होणार नाही.

स्रोत: OpenBible.info, CC BY 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क