Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › शुभवर्तमाने शेजारी शेजारी › गालीलात

शुभवर्तमाने शेजारी शेजारी · गालीलात

पहिल्या शिष्यांना पाचारण

मत्त 4:18–22 · मार्क 1:16–20 · लूक 5:1–11

मत्तय

मत्त 4:18–22

18नंतर तो गालीलच्या सरोवराजवळून जात असता, पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या दोघांना त्याने जाळे टाकतांना पाहिले कारण ते मासे पकडणारे होते.

19येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या, म्हणजे मी तुम्हास माणसे धरणारे करीन.”

20मग ते लगेचच जाळे सोडून देऊन त्याच्यामागे चालू लागले.

21येशू तेथून पुढे चालत जात असता त्याने दुसरे दोघे भाऊ; जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान यांना त्यांचे वडील जब्दी याच्याबरोबर होडीत पाहीले. ते जाळे नीट करत होते. त्याने त्यांना बोलावले,

22तेव्हा ते दोघेही लगेचच आपली होडी व आपले वडील यांना सोडून त्याच्यामागे गेले.

मार्क

मार्क 1:16–20

16येशू गालीलच्या सरोवराजवळून जात असता त्यास शिमोन व शिमोनाचा भाऊ अंद्रिया हे सरोवरात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते.

17येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हास माणसे धरणारे करीन.”

18मग ते लगेचच जाळी सोडून त्याच्यामागे चालू लागले.

19तेथून काहीसे पुढे गेल्यावर येशूला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळे नीट करताना दिसले.

20त्याने लगेच त्यांना हाक मारून बोलावले; मग ते त्यांचा पिता जब्दी व नोकरचाकर यांना तारवात सोडून त्याच्यामागे गेले.

लूक

लूक 5:1–11

1मग असे झाले की, तो गनेसरेत सरोवराच्या काठी उभा असता लोक देवाचे वचन ऐकण्यासाठी येशूभोवती गर्दी करू लागले,

2तेव्हा त्याने सरोवरात दोन होड्या पाहिल्या, पण होडीतील मासे पकडणारे बाहेर होते व त्यांची जाळी धूत होते.

3त्यातील एका होडीत येशू गेला जी शिमोनाची होती आणि त्याने किनाऱ्यापासून थोडे दूर नेण्यास सांगितले. नंतर तो होडीत बसला व लोकांस शिक्षण देऊ लागला.

4त्याने बोलणे संपविल्यावर तो शिमोनाला म्हणाला, “होडी खोल पाण्यात घेऊन चल आणि मासे पकडण्यासाठी तुझे जाळे खाली सोड.”

5शिमोनाने उत्तर दिले, “साहेब, संपूर्ण रात्र आम्ही खूप कष्ट घेतले पण काहीच मासे पकडू शकलो नाही. तरी तुझ्या शब्दावरून मी जाळी खाली सोडतो.”

6मग त्यांनी तसे केल्यावर त्यांच्या जाळ्यात माश्यांचा मोठा घोळका सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली

7तेव्हा त्यांनी दुसऱ्या होडीतील आपल्या सहकाऱ्यांना मदत करण्यासाठी बोलावले. ते आले आणि त्या दोन्ही होड्या माश्यांनी इतक्या भरल्या की, त्या बुडू लागल्या.

8हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, “प्रभू, माझ्यापासून दूर जा कारण मी पापी मनुष्य आहे.”

9कारण त्यांनी धरलेल्या माश्यांचा घोळका पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले होते.

10तसेच शिमोनाचे भागीदार जब्दीचे पुत्र याकोब व योहान हेही त्यांच्याप्रमाणे आश्चर्यचकित झाले. मग येशू शिमोनाला म्हणाला, “भिऊ नको, कारण येथून पुढे तू माणसे धरणारा होशील.”

11मग तारवे किनाऱ्याला लावल्यावर त्यांनी सर्वकाही सोडले आणि त्याच्यामागे गेले.

खूण केलेले: प्रत्येक वृत्तांतात असलेले शब्द, तुम्ही वाचता त्या भाषांतरात. सर्वात वारंवार येणारे शब्द (“आणि”, “तो”) खूण केलेले नाहीत; दुसऱ्या रूपातील शब्दाची खूण कदाचित होणार नाही.

स्रोत: OpenBible.info, CC BY 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क