बायबल › स्तोत्रसंहिता › 12
IRV · अध्याय 12 / 150
स्तोत्रसंहिता 12
1मुख्य गायकासाठी; शमीनीथ नावाच्या सुरावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, साहाय्य कर! कारण भक्तिमान नाहीसा झाला आहे. विश्वासू गायब झाला आहे.
2प्रत्येक जन आपल्या शेजाऱ्यास पोकळ शब्द बोलतो, प्रत्येक खुशामती करणाऱ्या ओठांनी आणि दुटप्पी हृदयाने बोलतो.
3परमेश्वर सर्व खुशामत करणारे ओठ आणि मोठ्या गोष्टी करणारी जीभ कापून टाको.
4हे ते आहेत जे असे म्हणतात, “आम्ही आपल्या जीभेने विजयी होऊ, जेव्हा आमचे ओठ बोलतील, तेव्हा आमच्यावर धनी कोण होणार?”
5परंतु परमेश्वर म्हणतो, “गरिबांच्या विरोधात हिंसाचार केल्यामुळे, गरजवंतांच्या कण्हण्यामुळे, मी आता उठतो; ज्या सुरक्षीतपणाची तो वाट पाहतो, ते मी त्यास देईन.”
6परमेश्वराची वचने शुध्द वचने आहेत, पृथ्वीवर भट्टीत घालून गाळलेल्या, सात वेळा गाळलेल्या चांदी सारखी ती शुद्ध आहेत.
7हे परमेश्वरा, तुच त्यांना सांभाळशील, या पिढीपासून तू त्यांना सर्वकाळ राखशील.
8मनुष्यांच्या संतानांमध्ये निचपणाला थोरवी मिळते तेव्हा दुष्ट चोहोंकडे हिंडत राहतात.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRV, 2019) · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. (मजकूर बदललेला नाही; तळटीपा आणि शीर्षके वगळली आहेत) · eBible.org