Bible Explorer अ‍ॅप मिळवा

बायबल › स्तोत्रसंहिता › 28

IRV · अध्याय 28 / 150

स्तोत्रसंहिता 28

1दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, माझ्या खडका, मी तुलाच आरोळी करतो. मला दुर्लक्षित करू नको. जर तू मला उत्तर दिले नाहीस तर जे थडग्यात जातात त्यांसारखा मी होईन.

2जेव्हा मी तुला मदतीसाठी हाक मारतो, जेव्हा मी आपले हात तुझ्या पवित्र ठिकाणाकडे उंचावतो, तेव्हा माझी विनवणी ऐक.

3जे अन्याय करतात त्या दुष्टांबरोबर मला फरफटू नकोस. जे त्यांच्या शेजाऱ्यांसोबत शांतीने बोलतात, परंतु त्यांच्या हृदयात मात्र वाईट असते.

4त्यांच्या कृतीप्रमाणे आणि त्यांच्या दुष्टकृत्यांच्या प्रमाणे त्यांची परत फेड कर.

5कारण त्यांना परमेश्वराचे मार्ग किंवा त्याच्या हातची कृत्ये समजत नाहीत. तो त्यांना मोडेल आणि पुन्हा बांधणार नाही.

6परमेश्वराची स्तुती असो, कारण त्याने माझ्या विनवणीचा आवाज ऐकला.

7परमेश्वर माझे सामर्थ्य आणि माझी ढाल आहे. माझे हृदय त्याच्यावर विश्वास ठेवते आणि मला मदत करण्यात आली आहे. यास्तव माझे हृदय मोठा हर्ष करते. आणि मी त्याची स्तुती गीत गाऊन करीन.

8परमेश्वर त्याच्या लोकांसाठी बल असा आहे, आणि तो त्याच्या अभिषिक्ताला तारणाचा आश्रय आहे.

9तुझ्या लोकांस वाचव आणि तुझ्या वतनाला आशीर्वाद दे. त्यांचा मेंढपाळ हो आणि त्यांना सर्वकाळ वाट दाखव व त्यांना सदैव क्षमा कर, त्यांना उचलून घे.

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRV, 2019) · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. (मजकूर बदललेला नाही; तळटीपा आणि शीर्षके वगळली आहेत) · eBible.org