Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › डिसेंबर 2027 › 19 डिसेंबर

कॅथलिक दिनदर्शिका

दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 19 डिसेंबर 2027

रविवार · आगमनकाळाचा चौथा आठवडा

सण आणि संत

आगमनकाळाचा चौथा रविवार

रविवार · उपासनेचा रंग: जांभळा

दिवसाची वाचने

पहिले वाचन

मीखा 5:2–5

2पण हे, बेथलहेम एफ्राथा. जरी तू यहूदातील सर्व कुळांत सर्वात लहान आहेस. तरी तुझ्यातून माझ्यासाठी इस्राएलात अधिकारी व्हायला एकजण निघेल. त्याचा प्रारंभ पुरातन काळापासून, प्राचीन काळापासून आहे. 3यास्तव प्रसूतीवेदना पावणारी प्रसवेपर्यंत तो त्यांना सोडून देईल, आणि मग त्याचे उरलेले भाऊ इस्राएलाच्या लोकांकडे परत येतील. 4तो उभा राहून परमेश्वराच्या सामर्थ्याने, परमेश्वर त्याचा देव याच्या नावाच्या प्रतापाने, आपला कळप चारील, आणि ते वस्ती करतील; कारण आता तो पृथ्वीच्या शेवटापर्यंत महान होत जाईल. 5आणि तो पुरुष आंम्हास शांती असा होईल. अश्शूर जेव्हा आमच्या देशात येईल व ते आमच्या राजवाड्यात चालतील, तेव्हा आम्ही सात मेंढपाळ आणि आठ मुख्य त्याच्याविरुध्द उभे राहू.

प्रतिसाद स्तोत्र

स्तोत्र 80:1–2, 14–15, 17–18

1आसाफाचे स्तोत्र हे इस्राएलाच्या मेंढपाळा, जो तू योसेफाला कळपाप्रमाणे चालवितोस तो तू लक्ष दे. जो तू करुबांच्यावर बसतोस, आम्हावर प्रकाश पाड. 2एफ्राइम आणि बन्यामीन व मनश्शे यांच्यासमोर तू आपल्या सामर्थ्याने खळबळ उडव; ये व आम्हास वाचव. 14हे सेनाधीश देवा, तू मागे फिर; स्वर्गातून खाली बघ आणि लक्ष पुरव आणि या द्राक्षवेलीची काळजी घे. 15हे मूळ तू आपल्या उजव्या हाताने लाविले आहे, जो कोंब तू आपणासाठी सबळ केला आहे त्याचे रक्षण कर. 17तुझ्या उजव्या हाताला असलेल्या मनुष्यावर, तू आपल्यासाठी बलवान केलेल्या मानवपुत्रावर तुझा हात राहो; 18मग आम्ही तुझ्यापासून मागे फिरणार नाही; तू आम्हास जिवंत कर आणि आम्ही तुझ्या नावाचा धावा करू.

दुसरे वाचन

इब्री 10:5–10

5म्हणून ख्रिस्त जेव्हा या जगात आला, तेव्हा तो देवाला म्हणाला, “तुला यज्ञ व अर्पणे याची इच्छा नव्हती, त्याऐवजी तू माझ्यासाठी शरीर तयार केले. 6होमार्पणांनी व पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला आनंद वाटला नाही. 7ह्यावरून मी म्हणालो, हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.” 8वर उल्लेखल्याप्रमाणे तो म्हणाला, “यज्ञ, अन्नार्पणे, होमार्पणे व पापाबद्दलची अर्पणे, ह्यांची इच्छा तुला नव्हती व त्यामध्ये तुला संतोष नव्हता.” (जरी नियमशास्त्रानुसार ही अर्पणे करण्यात येतात.) 9मग तो म्हणाला, “हा मी आहे! तुझी इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे.” दुसरे स्थापावे म्हणून तो पहिले काढून टाकतो. 10देवाच्या इच्छेनुसार येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देह अर्पणाद्वारे आपण पवित्र करण्यात आलो आहोत.

शुभवर्तमान

लूक 1:39–45

39त्या दिवसात मरीया उठली आणि घाईने यहूदीया प्रांताच्या डोंगराळ भागातील एका नगरात गेली. 40तिने जखऱ्याच्या घरात प्रवेश केला आणि अलीशिबेला अभिवादन केले. 41जसे मरीयेचे अभिवादन अलीशिबेने ऐकले तिच्या उदरातील बाळाने उडी मारली आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने भरली. 42ती उंच स्वर काढून मोठ्याने म्हणाली, “स्त्रियांमध्ये तू धन्यवादित आहेस आणि तुझ्या पोटचे फळ धन्य आहे. 43माझ्या प्रभूच्या मातेने मजकडे यावे हा मान मला कोठून?” 44जेव्हा तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडली, तेव्हा माझ्या उदरातील बाळाने आनंदाने उडी मारली 45जिने विश्वास ठेवला ती धन्य आहे, कारण ज्या गोष्टी प्रभूने तिला सांगितल्या त्याची पूर्णता होईल?

सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र C, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष II.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क