मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › ऑक्टोबर 2027 › 24 ऑक्टोबर
ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 11 ऑक्टोबर (जुनी पद्धत)
ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 24 ऑक्टोबर 2027
रविवार · स्वर 1
सण आणि संत
पेन्टेकॉस्टनंतरचा 18वा रविवार
सातव्या विश्वव्यापी परिषदेचे पिता
उपवास
उपवास नाही
हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.
दिवसाची वाचने
संध्याप्रार्थना: वाचन
14जेव्हा अब्रामाने ऐकले की, त्याच्या नातेवाइकांना शत्रूंनी पकडून नेले आहे तेव्हा त्याने आपल्या घरी जन्मलेली, लढाईचे शिक्षण घेतलेली तीनशे अठरा माणसे घेऊन सरळ दान नगरापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला. 15त्याने रात्री त्याचे लोक त्यांच्याविरुद्ध विभागले आणि त्यांच्यावर हल्ला केला आणि दिमिष्काच्या डावीकडे होबापर्यंत त्यांचा पाठलाग केला. 16अब्रामाने सगळी मालमत्ता आणि त्याचा नातेवाइक लोट आणि त्याच्या वस्तू, त्याचप्रमाणे स्त्रिया आणि इतर लोक यांना परत आणले. 17मग कदार्लागोमर व त्याच्याबरोबरचे राजे यांचा पराभव केल्यावर अब्राम परत आला तेव्हा सदोमाचा राजा शावेच्या खोऱ्यात त्यास भेटायला बाहेर आला. या खोऱ्याला राजाचे खोरे असे म्हणतात. 18देवाचा याजक असलेला शालेमाचा राजा मलकीसदेक भाकर व द्राक्षरस घेऊन अब्रामाला भेटण्यास आला. हा परात्पर देवाचा याजक होता. 19त्याने अब्रामाला आशीर्वाद देऊन म्हटले, “अब्रामा, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता परात्पर देव तुला आशीर्वाद देवो. 20परात्पर देव ज्याने तुझे शत्रू तुझ्या हाती दिले तो धन्यवादित असो.” तेव्हा अब्रामाने त्यास सर्वाचा दहावा भाग दिला.
संध्याप्रार्थना: वाचन
8पाहा हा प्रदेश मी तुम्हास देऊ करत आहे जा आणि त्यावर ताबा मिळवा अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना व त्यांच्यानंतर त्यांच्या वंशजांना हा प्रदेश देण्याचे परमेश्वराने वचन दिले होते. 9तेव्हा मी तुम्हास म्हणालो होतो की “मी एकटा तुमचा सांभाळ करू शकणार नाही. 10आणि आता तर तुमची संख्या कितीतरी वाढली आहे परमेश्वर देवाच्या कृपेने ती वाढून आकाशातील ताऱ्यांइतकी झाली आहे. 11तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर, ह्याच्या कृपेने आणखी वाढून आताच्या हजारपट होवो आणि त्याने कबूल केल्याप्रमाणे त्याचा आशीर्वाद तुम्हास मिळो. 15म्हणून मी त्या ज्ञानी व अनुभवी व्यक्तींना तुमचे प्रमुख म्हणून नेमले. हजारांच्या समूहावर एक अधिकारी, शंभरांवर एक, पन्नासांवर, दहावर तसेच घराण्यावर अशा या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. 16या न्यायाधीशांना मी त्यावेळी सांगितले की तुमच्या भाऊबंदांतील वाद नीट ऐकून घ्या. निवाडा करताना पक्षपात करू नका मग तो वाद दोन भावांमधला असो की एखादा मनुष्य व त्याचा भाऊबंद व उपरी यांच्यातील असो. नीतिने न्याय करा. 17न्याय करताना कोणालाही कमी लेखू नका. लहान मोठ्यांचे सारखे ऐकून घ्या. कोणाचे तोंड पाहून घाबरू नका; कारण न्याय करणे देवाचे काम आहे. एखादे प्रकरण तुम्हास विशेष अवघड वाटले तर ते माझ्याकडे आणा. मी त्याचा निवाडा करीन.
संध्याप्रार्थना: वाचन
14सर्वकाही तुमचा देव परमेश्वर ह्याचे आहे. आकाश, आकाशापलीकडचे आकाश, पृथ्वी व पृथ्वीवरचे सर्वकाही परमेश्वर देवाचे आहे. 15परमेश्वराचे तुमच्या पूर्वजांवर फार प्रेम होते. त्या प्रेमाखातीर त्याने इतरांना वगळून तुम्हास आपले मानले. आजही वस्तूस्थिती तिच आहे. 16तेव्हा हट्टीपणा सोडा, आपली अंत:करणे परमेश्वरास द्या. 17कारण परमेश्वर तुमचा देव आहे, तो देवांचा देव व प्रभूंचा प्रभू आहे. तो महान व भययोग्य परमेश्वर आहे. तो विस्मयकारी आहे. त्यास सर्वजण सारखेच आहेत. तो पक्षपात करत नाही की लाच घेत नाही. 18अनाथांना, विधवांना इतकेच काय शहरात आलेल्या परकीयानांही अन्नवस्त्र पुरवून आपले प्रेम दाखवतो. 19म्हणून तुम्ही परक्यांशी प्रेमाने वागले पाहिजे. कारण मिसर देशात तुम्हीही उपरेच होतात. 20तुम्ही फक्त तुमचा देव परमेश्वर याचेच भय धरा व त्याचीच सेवा करा, त्याच्याबद्दल आदर बाळगा. त्यास धरुन राहा, शपथ वाहाताना त्याच्याच नावाने शपथ घ्या. 21फक्त परमेश्वराची स्तुती करा. तो तुमचा देव आहे. त्याने केलेले चमत्कार आणि भयानक थोर कृत्ये तुम्ही प्रत्यक्ष पाहिली आहेत.
प्रातःप्रार्थनेचे सातवे शुभवर्तमान
1आठवड्याच्या पहिल्या दिवशी, पहाटेस अंधारातच, मग्दालीया नगराची मरीया कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढली आहे असे तिने पाहिले. 2तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूची प्रीती होती त्या दुसर्या शिष्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, “त्यांनी प्रभूला कबरेतून काढून नेले आणि त्यास कोठे ठेवले हे आम्हास माहीत नाही.” 3म्हणून पेत्र व तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरेकडे जावयास निघाले. 4तेव्हा ते दोघे जण बरोबर धावत गेले; पण तो दुसरा शिष्य पेत्राच्या पुढे धावत गेला व कबरेजवळ प्रथम पोहचला. 5त्याने ओणवून आत डोकावले आणि त्यास तागाची वस्त्रे पडलेली दिसली. पण तो आत गेला नाही. 6शिमोन पेत्रहि त्याच्यामागून येऊन पोहचला व तो कबरेत शिरला; 7आणि तागाची वस्त्रे पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो त्या तागाच्या वस्त्रांजवळ नव्हे, तर वेगळा एकीकडे गुंडाळून ठेवलेला होता. 8तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेवला. 9कारण त्याने मरण पावलेल्यातून पुन्हा उठावे हे अवश्य आहे, हा शास्त्रलेख त्यांना अजून कळला नव्हता. 10मग ते शिष्य पुन्हा आपल्या घरी गेले.
प्रेषितांचे पत्र
6हे लक्षात ठेवा जो हात राखून पेरतो तो त्याच प्रमाणात कापणी करील आणि जो उदार हाताने पेरील तो त्याच प्रमाणात कापणी करील. 7प्रत्येक मनुष्याने आपल्या मनात जे ठरवले असेल त्याप्रमाणे त्याने द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये कारण ‘संतोषाने देणारा देवाला’ आवडतो. 8तुमच्याजवळ सर्व गोष्टींत सदा, सर्व पुरवठा रहावा आणि प्रत्येक चांगल्या कामात तुम्ही संपन्न व्हावे म्हणून देव तुम्हास सर्व प्रकारची कृपा पुरवण्यास समर्थ आहे. 9असे पवित्र शास्त्रात लिहिले आहे; “तो गरीबांना उदारहस्ते देतो, त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ राहते.” 10आता जो पेरणार्याला बीज व खाण्यासाठी भाकर पुरवतो तो तुमच्यासाठी बीज पुरवील आणि बहुगुणित करील व तुमच्या नीतिमत्त्वाचे फळ वाढवील. 11म्हणजे तुम्ही सर्व उदारतेसाठी प्रत्येक गोष्टीत संपन्न व्हाल व ती उदारता आमच्याद्वारे देवाचे उपकारस्मरण अधिक होण्यास कारणीभूत होईल.
प्रेषितांचे पत्र (पित्यांसाठी)
7ज्यांनी तुम्हास देवाचे वचन दिले त्या पुढाऱ्यांची आठवण ठेवा. त्यांच्या जीवनातील आचार पाहा व त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा. 8येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. 9विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका कारण ज्यांकडून आचणाऱ्यांना लाभ नाही अशा अन्नाच्या विधीने नव्हे, तर देवाच्या कृपेने आपली अंतःकरण स्थिर केलेले असणे चांगले. 10ज्या वेदीवरील अन्न खाण्याचा किंवा सहभागी होण्याचा अधिकार मंडपात सेवा करणाऱ्यांनाही नाही, अशी वेदी आपल्याकडे आहे. 11यहूदी मुख्य याजक प्राण्यांचे रक्त परमपवित्रस्थानात पापाचे अर्पण म्हणून घेऊन जातात. परंतु केवळ प्राण्यांची शरीरे छावणीच्या बाहेर नेऊन जाळतात. 12म्हणून येशूने सुद्धा स्वतःच्या रक्ताने लोकांस पवित्र करावे यासाठी नगराच्या वेशीबाहेर मरण सोसले, 13म्हणून आपण छावणीच्या बाहेर जाऊ आणि येशूच्या अपमानाचे वाटेकरी होऊ. 14कारण स्थायिक असे नगर आपल्याला येथे नाही तरी भविष्यकाळात येणारे जे नगर आहे त्याच्याकडे आपण पाहत आहोत. 15म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या “ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण येशूद्वारे देवाला नित्य अर्पण करावा.” 16आणि इतरांसाठी चांगले ते करण्यास आणि दानधर्म करण्यास विसरू नका कारण अशा अर्पणाने देवाला संतोष होतो.
शुभवर्तमान
11आणि दुसऱ्या दिवशी असे झाले की, तो नाईन नावाच्या नगराकडे जात होता आणि त्याचे पुष्कळ शिष्य व मोठा समुदाय हे त्याच्याबरोबर जात होते. 12जसा तो गावाच्या वेशीजवळ आला तेव्हा पाहा कोणाएका मरण पावलेल्या मनुष्यास बाहेर घेऊन जात होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता व ती विधवा होती; आणि गावातील बरेच लोक तिच्याबरोबर होते. 13तेव्हा तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला “रडू नकोस” 14मग जवळ जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला; तेव्हा खांदेकरी स्थिर उभे राहीले आणि तो म्हणाला, “मुला, मी तुला सांगतो, उठ!” 15आणि तो मरण पावलेला उठून बसला व बोलू लागला; मग येशूने त्यास त्याच्या आईजवळ दिले. 16तेव्हा सर्वांना भय वाटले आणि ते देवाला गौरव करीत म्हणाले, “आमच्यामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे”
शुभवर्तमान (पित्यांसाठी)
1“या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे पित्या, वेळ आली आहे; पुत्राने तुझे गौरव करावे म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर. 2जे तू त्यास दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू त्यास सर्व मनुष्यांमात्रावर अधिकार दिला आहेस. 3सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच, खरा देव त्या तुला आणि ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे. 4जे तू काम मला करावयाला दिलेस ते पूर्ण करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे. 5तर आता, हे माझ्या पित्या, हे जग होण्याआधी तुझ्याबरोबर मला जे गौरव होते त्याच्यायोगे तू आपणा स्वतःबरोबर माझे गौरव कर. 6जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रकट केले. ते तुझे होते आणि ते तू मला दिलेस आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. 7आता त्यांना समजले आहे की, तू ज्या गोष्टी मला दिल्यास त्या सर्व तुझ्यापासून आहेत. 8कारण तू मला जी वचने दिलीस ती मी त्यांना दिली आहेत; ती त्यांनी स्वीकारली, मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले आणि तू मला पाठवले. असा त्यांनी विश्वास ठेवला. 9त्यांच्यासाठी मी विनंती करतो, मी जगासाठी विनंती करीत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी मी विनंती करतो, कारण ते तुझे आहेत. 10जे माझे ते सर्व तुझे आहे आणि जे तुझे ते सर्व माझे आहे आणि त्यांच्याठायी माझे गौरव झाले आहे. 11आणि आता, यापुढे मी जगात नाही; पण ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र पित्या, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे. 12जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावात मी त्यांना राखले; मी त्यांचा सांभाळ केला आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचा नाश झाला नाही. हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले. 13पण आता मी तुझ्याकडे येत आहे आणि माझा आनंद त्यांच्याठायी परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात या गोष्टी बोलतो.
तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 11 ऑक्टोबर म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 24 ऑक्टोबर. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क