Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › सप्टेंबर 2027 › 14 सप्टेंबर

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 1 सप्टेंबर (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 14 सप्टेंबर 2027

मंगळवार · पेन्टेकॉस्टनंतरचा 13वा आठवडा · स्वर 3

सण आणि संत

Beginning of the Indiction (that is, the New Year)

उपवास

उपवास नाही

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

संध्याप्रार्थना: वाचन

यश 61:1–9

1प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आहे, कारण त्याने मला अभिषेक केला आहे. ह्यासाठी की दिनांस सुवार्ता सांगावी आणि भग्नहृदयाच्या लोकांस बरे करावे. पाडाव केलेल्यास मुक्तता आणि बंदिवानांस मोकळीक गाजवून सांगावी. 2परमेश्वराच्या कृपासमयाचे वर्ष व त्याच्या प्रतिकाराचा दिवस घोषणा करून सांगायला, आणि शोक करणाऱ्या सर्वांना सांत्वन करायला त्याने मला पाठवले आहे. 3सियोनेच्या शोक करणाऱ्यांस राखेच्या ऐवजी शोभा, शोकाच्या ठिकाणी आनंदाचे तेल, खिन्न आत्म्याच्या ठिकाणी प्रशंसेचे वस्र नेमून द्यायला त्याने मला पाठवले आहे. आणि त्याचा महिमा व्हावा म्हणून त्यांना न्यायीपणाची वृक्षे, परमेश्वराने लावलेले असे म्हणतील. 4“ते प्राचीन ओसाड स्थले पुन्हा बांधतील, ते पूर्वी नाश झालेले पुनर्संचयित करतील, ते फार पूर्वीची मोडलेली नगरे, फार वर्षांपूर्वी नाश पावलेली शहरे नव्यासारखी करतील.” 5परदेशी उभे राहून तुमचे कळप चारतील आणि परदेशीयांची मुले तुमच्या शेतांत आणि द्राक्षमळ्यांत काम करतील. 6तुला “परमेश्वराचा याजक” आमच्या देवाचा सेवक असे म्हणतील. जगातील सर्व राष्ट्रांची संपत्ती तुम्ही भोगाल आणि ती मिळाल्याबद्दल तुम्हास अभिमान वाटेल. 7“तुझ्या अपमाना ऐवजी तुला दुप्पट मिळेल, आणि तुझ्या अप्रतिष्ठेच्या ऐवजी ते आपल्या विभागाविषयी आनंद करतील, म्हणून ते आपल्या भूमीत दुप्पट भाग पावतील, सर्वकाळचा आनंद त्याना प्राप्त होईल.” 8कारण मी परमेश्वर न्यायावर प्रीती करतो, आणि मी दरोडेखोर आणि हिंसक अन्यायाचा तिरस्कार वाटतो. मी विश्वासाने त्यांचे प्रतिफळ त्यांना देईन, आणि मी माझ्या लोकांबरोबर सर्वकाळचा करार करीन. 9त्यांचे वंशज सर्व राष्ट्रांत आणि लोकांमध्ये त्यांचे संतान ओळखले जातील. त्यांना पाहणारे सर्व ते कबूल करतील की, “परमेश्वराने ज्या लोकांस आशीर्वादीत केले आहे, ते हेच आहेत.”

संध्याप्रार्थना: वाचन

लेवी 26:3–12, 14–17, 19–20, 22, 33, 23–25

3तुम्ही आठवण ठेवून माझ्या नियमाप्रमाणे चालावे व माझ्या आज्ञा पाळाव्या, 4तुम्ही असे कराल तर मी तुमच्यासाठी योग्य वेळी पाऊस पाडीन; जमीन आपले पीक देईल व मळ्यातील झाडे आपापली फळे देतील. 5तुम्ही द्राक्षांच्या हंगामापर्यंत धान्याची मळणी करीत रहाल आणि पेरणीच्या दिवसापर्यंत द्राक्षांची तोडणी करीत रहाल. मग खाण्याकरिता तुम्हाजवळ भरपूर अन्न असेल, आणि तुम्ही आपल्या देशात सुरक्षित रहाल. 6मी तुमच्या देशाला शांतता देईन; तुम्ही शांतीने झोपी जाल; तुम्हास कोणाची भीती वाटणार नाही, मी हिंस्र पशूंना तुमच्या देशाबाहेर ठेवीन आणि तुमच्या देशावर कोणी सैन्य चाल करून येणार नाही. 7तुम्ही तुमच्या शत्रूंचा पाठलाग कराल व त्यांचा पराभव कराल. तुम्ही तुमच्या तलवारींनी त्यांचा वध कराल. 8तुमच्यातील पाच जण शंभरांना व शंभरजण दहा हजारांना पळवून लावतील. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव कराल, व तुमच्या तलवारीने त्यांना ठार माराल. 9मग मी तुमच्याकडे वळेन व तुम्हास भरपूर संतती देईन आणि तुमच्याशी केलेला माझा करार पक्का करीन; 10तुम्हास मुबलक धान्य मिळेल व ते वर्षभर पुरुन उरेल. तुम्हास नवीन धान्य आल्यावर जुने बाहेर काढावे लागेल म्हणजे नवीन धान्य ठेवावयास जागा मिळेल. 11मी तुम्हामध्ये माझी वस्ती करीन; आणि मी तुमचा तिरस्कार करणार नाही. 12मी तुमच्यामध्ये चालेन आणि तुमचा देव होईन, आणि तुम्ही माझे लोक व्हाल. 14परंतु जर तुम्ही माझे ऐकले नाही व या सर्व आज्ञा पाळल्या नाहीत; 15तुम्ही जर माझे विधि मानण्यास नकार दिला व माझ्या आज्ञा पाळण्याचे तुच्छ मानले, आणि माझ्या सर्व आज्ञा अमान्य करून माझा करार मोडला. 16जर तुम्ही तसे कराल तर मग तुम्हावर भयंकर संकटे येतील असे मी करीन; क्षयरोग व ताप ह्यानी मी तुम्हास पीडीन; ती तुमची दृष्टी नष्ट करतील, व तुमचा जीव घेतील; तुम्ही बियाणे पेराल पण तुम्हास यश मिळणार नाही तुम्हास पीक मिळणार नाही आणि तुमचे शत्रू तुमचे धान्य खाऊन टाकतील. 17मी माझे मुख तुमच्याविरुध्द करीन, म्हणून तुमचे शत्रू तुमचा पराभव करतील; जे लोक तुमचा द्वेष करीतात ते तुमच्यावर अधिकार गाजवतील, आणि कोणी तुमचा पाठलाग करत नसतानाही तुम्ही पळाल. 19मी तुमच्या बळाचा गर्व मोडून टाकीन; तुमचे आकाश लोखंडासारखे व तुमची जमीन पितळेसारखी करीन. 20तुम्ही खूप कष्ट कराल पण त्याचा काही उपयोग होणार नाही; कारण तुमची जमीन पीक देणार नाही व तुमची झाडे फळे देणार नाहीत. 22मी तुमच्यावर हिंस्त्र पशू पाठवीन आणि ते तुमच्या मुलांबाळांना उचलून घेऊन जातील; ते तुमच्या गुराढोरांचा नाश करतील; आणि तुमची संख्या कमी करतील. त्यामुळे तुमचे रस्ते ओस पडतील. 33परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी माझी तलवार उपसून तुमच्या पाठीस लागेन. तुमच्या देशाचा नाश होईल आणि तुमची शहरे ओसाड पडतील. 23एवढे करुनही तुम्ही माझ्या शिक्षणाचा स्वीकार केला नाही परंतु माझ्या विरुध्द चालत राहिलात, 24तर मी ही तुमच्याविरुध्द होईन आणि, मीच तुमच्या पापाबद्दल तुम्हास सातपट ताडण करीन. 25मी तुमच्यावर तलवार आणीन ती करार मोडल्याचा बदला घेईल. तुम्ही आपआपल्या नगरांत जमा व्हाल, तेव्हा मी तेथे तुमच्यावर आजार पाठवीन, आणि तुम्ही तुमच्या शत्रुच्या बळामुळे पराभुत व्हाल.

संध्याप्रार्थना: वाचन

या भाषांतरात नाही

प्रेषितांचे पत्र (चर्चच्या नव्या वर्षासाठी)

1 तीम 2:1–7

1तर सर्वांत प्रथम मी हा बोध करतो की, मागण्या, प्रार्थना, विनंत्या व आभारप्रदर्शन सर्व लोकांसाठी कराव्या. 2आणि विशेषतः राजांकरता आणि जे मोठे अधिकारी आहेत त्या सर्वांकरीता प्रार्थना करा, यासाठी की आपण पूर्ण सुभक्तीत व गंभीरपणात शांतीचे व स्थिरपणाचे असे जीवन जगावे. 3कारण हे आपल्या तारणाऱ्या देवाच्या दृष्टीने चांगले व स्वीकार करण्यास योग्य आहे, 4त्याची इच्छा आहे की सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांनी खरेपणाच्या पूर्ण ज्ञानास पोहचावे. 5कारण एकच देव आहे आणि देव व मनुष्य यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. 6त्याने सर्वांच्या खंडणीकरिता स्वतःला दिले. याविषयीची साक्ष योग्यवेळी देणे आहे. 7आणि या साक्षीचा प्रसार करण्यासाठी मला घोषणा करणारा आणि प्रेषित मी खरे सांगतो; खोटे सांगत नाही, असा परराष्ट्रीय लोकांमध्ये विश्वास आणि सत्याचा शिक्षक म्हणून नेमलेला आहे.

प्रेषितांचे पत्र (संत शिमोन यांच्यासाठी)

कल 3:12–16

12तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करूणायुक्त हृदय, दया, सौम्यता, लीनता व सहनशीलता धारण करा. 13एकमेकांचे सहन करा आणि कोणाचे कोणाशी भांडण असल्यास एकमेकांची क्षमा करा; प्रभूने तुमची क्षमा केली तशी एकमेकांची क्षमा करा. 14पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर धारण करा. 15ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरिता एक शरीर असे पाचारण्यांत आले आहे; आणि तुम्ही कृतज्ञ असा. 16ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो. तुम्ही सर्व ज्ञानीपणाने एकमेकांस शिकवा व बोध करा; आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आत्मिक गीते कृपेच्या प्रेरणेने गा.

शुभवर्तमान (चर्चच्या नव्या वर्षासाठी)

लूक 4:16–22

16मग जेथे तो लहानाचा मोठा झाला होता त्या नासरेथांत तो आला आणि शब्बाथ दिवशी त्यांच्या प्रथेप्रमाणे सभास्थानात जाऊन ग्रंथ वाचण्यासाठी उभा राहिला, 17आणि यशया संदेष्ट्याचा ग्रंथपट त्यास देण्यात आला. त्याने ते पुस्तक उघडले आणि जो भाग शोधून काढला, त्याठिकाणी असे लिहिले आहे, 18“प्रभूचा आत्मा मजवर आला आहे, कारण, गरिबांना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. कैदी म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आणि आंधळ्यांना दृष्टी पुन्हा मिळावी, ज्यांच्यावर जुलूम झाला आहे त्यांची सुटका करण्यासाठी 19आणि प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी त्याने मला पाठवले आहे.” 20मग त्याने ग्रंथपट बंद करून सभास्थानाच्या सेवकाला परत करून तो खाली बसला. सभास्थानातील प्रत्येकजण त्याच्याकडे रोखून पाहत होता. 21त्याने त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली की, “तुमच्या ऐकण्यामुळे आज हा शास्त्रलेख पूर्ण झाला आहे.” 22तेव्हा सर्व लोक त्याच्याविषयी साक्ष देऊ लागले आणि त्याच्या मुखातून येणाऱ्या कृपेच्या शब्दांबद्दल ते आश्चर्यचकित झाले आणि ते म्हणाले, हा योसेफाचाच मुलगा नव्हे काय?

शुभवर्तमान (संत शिमोन यांच्यासाठी)

मत्त 11:27–30

27माझ्या पित्याने मला सर्वकाही दिले आहे आणि पित्यावाचून कोणी पुत्राला ओळखीत नाही आणि पुत्रावाचून ज्याला प्रकट करायची पुत्राची इच्छा आहे त्याच्याशिवाय कोणीही पित्याला ओळखीत नाही. 28अहो जे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही मजकडे या आणि मी तुम्हास विसावा देईन. 29मी अंतःकरणाने लीन व नम्र आहे, म्हणून माझे जू आपणावर घ्या, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. 30कारण माझे जू सोपे आहे आणि माझे ओझे हलके आहे.”

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 1 सप्टेंबर म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 14 सप्टेंबर. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क