मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › सप्टेंबर 2027 › 14 सप्टेंबर
कॅथलिक दिनदर्शिका
दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 14 सप्टेंबर 2027
मंगळवार · सामान्यकाळाचा 24वा आठवडा
सण आणि संत
पवित्र क्रूसाचे उन्नयन
सण · उपासनेचा रंग: लाल
दिवसाची वाचने
पहिले वाचन
किंवा: फिलि 2:6–11
4इस्राएल लोकांनी होर पर्वत सोडला व ते तांबड्या समुद्राकडे जाणाऱ्या रस्त्याला लागले. अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी असे केले. परंतु लोक अधीर झाले. 5त्यांनी मोशेविरूद्ध व देवाविरूद्ध तक्रार करायला सुरुवात केली. लोक म्हणाले, तू आम्हास या रानात मरण्यासाठी मिसर देशातून बाहेर का आणलेस? इथे भाकरी नाही, पाणी नाही आणि या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत. 6तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये विषारी साप सोडले. साप लोकांस चावले आणि बरेच इस्राएल लोक मरण पावले. 7लोक मोशेकडे आले आणि म्हणाले, आम्ही तुझ्याविरूद्ध आणि परमेश्वराविरूद्ध बोललो तेव्हा आम्ही पाप केले हे आम्हास माहीत आहे. तू परमेश्वराची प्रार्थना कर. हे साप आमच्या मधून काढून टाक. तेव्हा मोशेने लोकांसाठी परमेश्वराची प्रार्थना केली. 8परमेश्वर मोशेला म्हणाला, एक पितळेचा साप कर आणि तो खांबावर ठेव. साप चावल्यानंतर जर एखाद्याने खांबावरच्या पितळेच्या सापाकडे पाहिले तर तो मनुष्य मरणार नाही. 9मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली त्याने पितळेचा साप बनवला व तो खांबावर ठेवला. नंतर जेव्हा जेव्हा एखाद्या साप चावलेल्या मनुष्याने त्या खांबावरच्या पितळेच्या सापाकडे पाहिले तेव्हा तो जिवंत राहिला.
प्रतिसाद स्तोत्र
1आसाफाचे स्तोत्र अहो माझ्या लोकांनो, माझी शिकवण ऐका, माझ्या तोंडच्या वचनाकडे लक्ष द्या. 2मी शहाणपणाचे गीत गाईन; मी पूर्वकाळच्या गुप्त गोष्टीबद्दल सांगेन. 34जेव्हा कधी देवाने त्यांना पीडिले, तेव्हा त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरवात केली. उत्सुकतेने ते त्याच्याकडे वळले. 35देव आमचा खडक आहे, आणि परात्पर देव आमचा सोडवणारा याची आठवण त्यांना झाली. 36पण त्यांनी आपल्या मुखाने त्याची खोटी स्तुती केली आणि आपल्या जीभेने त्याच्याजवळ लबाडी केली. 37कारण त्यांचे मन त्यांच्याठायी स्थिर नव्हते, आणि ते त्याच्या कराराशी एकनिष्ठ नव्हते. 38परंतु तो दयाळू असल्यामुळे त्यांच्या अपराधांची क्षमा करतो आणि त्याने त्यांचा नाश केला नाही. होय, तो अनेक वेळा आपला राग आवरून धरतो, आणि आपला सर्व राग भडकू देत नाही.
शुभवर्तमान
13स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. 14जसा मोशेने अरण्यात पितळेचा सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, 15यासाठी की, जो कोणी विश्वास ठेवतो त्यास त्याच्याठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. 16कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्यास सार्वकालिक जीवन मिळावे. 17कारण देवाने पुत्राला जगात पाठवले ते जगाचा न्याय करायला नाही, पण त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले.
सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क