मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › ऑगस्ट 2027 › 17 ऑगस्ट
कॅथलिक दिनदर्शिका
दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 17 ऑगस्ट 2027
मंगळवार · सामान्यकाळाचा 20वा आठवडा
सण आणि संत
सामान्यकाळाच्या 20व्या आठवड्याचा मंगळवार
आठवड्याचा दिवस · उपासनेचा रंग: हिरवा
दिवसाची वाचने
पहिले वाचन
11आणखी परमेश्वराचा दूत येऊन अबियेजेरी योवाश याच्या अफ्रा येथील एला झाडाखाली बसला; तेव्हा त्याचा पुत्र गिदोन मिद्यांन्यापासून गहू लपवावा म्हणून द्राक्षकुंडात गव्हाची मळणी करत होता. 12आणि परमेश्वराचा दूत त्यास दर्शन देऊन त्यास बोलला, “हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे.” 13तेव्हा गिदोन त्यास बोलला, “हे माझ्या प्रभू, जर परमेश्वर आमच्याबरोबर आहे तर हे सर्व आमच्या बाबतीत का घडले? परमेश्वराने आम्हांला मिसरातून बाहेर आणले आणि त्याच्या अद्भुत कृत्यांबद्दल आमचे पूर्वज आम्हाजवळ सांगत आले, परमेश्वराने आम्हांला मिसरातून वर आणले की नाही? आता तर परमेश्वराने आमचा त्याग करून आम्हांला मिद्यान्यांच्या हाती दिले आहे.” 14मग परमेश्वराने त्याच्याकडे बघितले आणि म्हटले, “तू आपल्या या बळाने जा, आणि इस्राएलांना मिद्यान्यांच्या ताब्यातून सोडव; मी तुला पाठवले आहे की नाही?” 15गिदोन त्यास बोलला, “हे माझ्या प्रभू, मी इस्राएलला कसा सोडवणार? पाहा, मनश्शेत माझे घराणे कमजोर आहे, आणि मी आपल्या पित्याच्या घरात कमी महत्त्वाचा आहे.” 16परमेश्वर त्यास बोलला, “खरोखर मी तुझ्याबरोबर राहीन, जसे एका मनुष्यास मारावे तसे तू एकजात सर्व मिद्यान्यांना ठार करशील.” 17गिदोन त्यास बोलला, “तुझी कृपादृष्टी माझ्यावर असली तर तूच माझ्याशी बोलत आहेस याविषयी मला काही चिन्ह दाखव. 18मी तुला विनंती करतो, मी तुझ्याकडे येईपर्यंत तू येथून जाऊ नको; म्हणजे मी आपली भेट आणून तुझ्यापुढे ठेवीन.” तेव्हा तो बोलला, “तू परत येईपर्यंत मी येथेच थांबतो.” 19गिदोनाने जाऊन एक करडू व एफाभर सपिठाच्या बेखमीर भाकरी तयार केल्या; त्याने मांस टोपलीत घातला आणि रस्सा पातेल्यात घातला, मग त्याच्याजवळ एला झाडाखाली नेऊन ते सादर केले. 20तेव्हा देवाच्या दूताने त्यास सांगितले, “तू मांस व बेखमीर भाकरी या खडकावर आणून ठेव, आणि त्यावर रस्सा ओत.” मग गिदोनाने तसे केले. 21तेव्हा परमेश्वराच्या दूताने आपल्या हातातल्या काठीच्या टोकाने मांसास व बेखमीर भाकरीला स्पर्श केला; मग खडकातून अग्नी निघाला आणि त्याने ते मांस व बेखमीर भाकरी भस्म केल्या; परमेश्वराचा दूतही निघून गेला आणि यापुढे गिदोन त्यास पाहू शकला नाही. 22तेव्हा गिदोनाला समजले की तो परमेश्वराचा दूत होता; गिदोन म्हणाला, हाय हाय, “हे प्रभू देवा! कारण मी परमेश्वराचा दूत समोरासमोर, पाहिला आहे!” 23परमेश्वर त्यास म्हणाला, “तुला शांती असो! भिऊ नको, तू मरणार नाहीस.” 24तेव्हा गिदोनाने तेथे परमेश्वरासाठी वेदी बांधली, त्याचे नाव परमेश्वर शांती आहे, असे ठेवले; ती आजपर्यंत अबियेजेऱ्यांच्या अफ्रा येथे अजून आहे.
प्रतिसाद स्तोत्र
8परमेश्वर देव काय म्हणेल ते मी ऐकून घेईन. कारण तो आपल्या लोकांशी व विश्वासू अनुयायींशी शांती करेल, तरी मात्र त्यांनी मूर्खाच्या मार्गाकडे पुन्हा वळू नये. 10दया व सत्य एकत्र मिळाली आहेत; निती आणि शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे. 11पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे, आणि स्वर्गातून नितिमत्व खाली पाहत आहे. 12जे उत्तम ते परमेश्वर देईल, आणि आमची भूमी आपले पिक देईल. 13त्याच्यासमोर नितीमत्व चालेल, आणि त्याच्या पावलांसाठी मार्ग तयार करील.
शुभवर्तमान
23तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, धनवान मनुष्यास स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणे फार कठीण जाईल. 24मी तुम्हास सांगतो की, धनवानाचा स्वर्गाच्या राज्यांत प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे जास्त सोपे आहे.” 25जेव्हा शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार आश्चर्यचकित झाले. त्यांनी येशूला विचारले, “मग कोणाचे तारण होईल?” 26येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले आणि तो म्हणाला, “मनुष्यांना हे अशक्य आहे, पण देवासाठी सर्व गोष्टी शक्य आहेत.” 27पेत्र येशूला म्हणाला, “पाहा, आम्ही सर्वकाही सोडले आणि तुमच्यामागे आलो आहोत; मग आम्हास काय मिळेल?” 28येशू म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, नव्या युगात जेव्हा मनुष्याचा पुत्र त्याच्या गौरवी राजासनावर बसेल तेव्हा तुम्ही जे सर्व माझ्यामागे आलात ते सर्व बारा राजासनावर बसाल आणि इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय कराल. 29ज्याने ज्याने माझ्यामागे येण्याकरता आपले घर, भाऊ, बहीण, आईवडील, मुले, शेतीवाडी सोडली असेल तर त्यास त्यापेक्षा कितीतरी जास्तपटीने लाभ होईल व त्यास सार्वकालिक जीवन मिळेल. 30पण पुष्कळसे जे आता पहिले आहेत ते शेवटचे होतील आणि जे शेवटचे आहेत ते पहिले होतील.”
सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क