मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › ऑगस्ट 2027 › 12 ऑगस्ट
कॅथलिक दिनदर्शिका
दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 12 ऑगस्ट 2027
गुरुवार · सामान्यकाळाचा 19वा आठवडा
सण आणि संत
सामान्यकाळाच्या 19व्या आठवड्याचा गुरुवार
ऐच्छिक स्मृतिदिन · उपासनेचा रंग: हिरवा
संत जेन फ्रान्सिस द शांताल, व्रतस्थ · ऐच्छिक स्मृतिदिन
दिवसाची वाचने
पहिले वाचन
7परमेश्वर देव यहोशवाला म्हणाला, “आज मी सर्व इस्राएलाच्या नजरेसमोर तुझी थोरवी वाढविण्यास सुरुवात करीन, म्हणजे मी जसा मोशेबरोबर होतो तसाच तुझ्याबरोबरही आहे हे त्यांना समजून येईल. 8कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांना आज्ञा कर की, ‘जेव्हा तुम्ही यार्देनेच्या पाण्याच्या कडेला पोहचाल तेव्हा यार्देन नदीत स्थिर उभे राहा.” 9मग यहोशवा इस्राएल लोकांस म्हणाला, “इकडे या! आणि देव परमेश्वर याची वचने ऐका! 10अशा प्रकारे तुम्हाला समजेल की, जिवंत देव तुमच्यामध्ये आहे, आणि कनानी, हित्ती, हिव्वी, परिज्जी, गिर्गाशी, अमोरी व यबूसी यांना तो तुमच्या समोरून घालवून देईल. 11संपूर्ण पृथ्वीचा जो प्रभू त्याच्या कराराचा कोश तुमच्यासमोर पलीकडे जाण्यासाठी यार्देनेत प्रवेश करीत आहे. 13संपूर्ण पृथ्वीचा जो प्रभू परमेश्वर याच्या कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांच्या पायांचे तळवे यार्देनेच्या पाण्याला लागताच वरून वाहत येणारे यार्देनेचे पाणी वाहण्याचे थांबून त्याचे दोन भाग होतील व त्याची रास उभी राहील.” 14लोक यार्देनेपलीकडे जाण्यासाठी आपल्या तंबूतून निघाले तेव्हा कराराचा कोश वाहणारे याजक लोकांपुढे चालले. 15कराराचा कोश वाहणारे यार्देनेपाशी येऊन पोहचले आणि कोश वाहणाऱ्या याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. (कापणीच्या हंगामाच्या दिवसात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असते.) 16तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बऱ्याच अंतरावर म्हणजे सारतानाजवळील आदाम नगरापाशी साठून राहिले व त्याची रास उभी झाली, आणि जे पाणी अराबाचा समुद्र म्हणजे क्षारसमुद्र याकडे वाहत जात होते ते अगदी हटले; मग ते सर्व लोक यरीहोसमोर पार उतरून गेले. 17परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवरून पार निघून गेले. अशा प्रकारे सर्व इस्राएल राष्ट्र यार्देनेपलीकडे गेले.
प्रतिसाद स्तोत्र
1जेव्हा इस्राएल मिसरातून, याकोबाचे घराणे त्या परकी लोकांतून निघाले, 2तेव्हा यहूदा त्याचे पवित्रस्थान झाला, इस्राएल त्याचे राज्य झाले. 3समुद्राने पाहिले आणि पळाला; यार्देन मागे हटली. 4पर्वतांनी मेंढ्यांसारख्या, टेकड्यांनी कोकरासारख्या उड्या मारल्या. 5हे समुद्रा, तू का पळून गेलास? यार्देने तू का मागे हटलीस? 6पर्वतांनो, तुम्ही मेंढ्यांसारख्या का उड्या मारता? लहान टेकड्यांनो, तुम्ही कोकरासारख्या का उड्या मारता?
शुभवर्तमान
21नंतर पेत्र येशूकडे आला आणि त्याने विचारले, “प्रभू, जर माझा भाऊ माझ्यावर अन्याय करीत राहिला तर मी त्यास किती वेळा क्षमा करावी? मी त्यास सात वेळा क्षमा करावी काय?” 22येशूने उत्तर दिले, “मी तुला सांगतो, फक्त सातच वेळा नाही तर उलट त्याने तुझ्यावर साताच्या सत्तरवेळा अन्याय केला तरी तू त्यास क्षमा करीत राहा.” 23म्हणूनच स्वर्गाच्या राज्याची तुलना एका राजाशी करता येईल. आपले जे चाकर आपले देणे लागत होते त्यांच्याकडून त्या राजाने पैसे परत घेण्याचे ठरवले. 24जेव्हा त्याने पैसे जमा करायला सुरूवात केली, तेव्हा एक देणेकरी ज्याच्याकडे लक्षावधी रुपयांचे कर्ज होते त्यास त्याच्याकडे आणण्यात आले. 25त्या देणेकऱ्याकडे राजाचे पैसे परत करण्यासाठी काहीच नव्हते, तेव्हा मालकाने आज्ञा केली की त्याला, त्याच्या पत्नीला, त्याच्या मुलांना आणि जे काही त्याच्याकडे आहे ते सर्व विकले जावे आणि जे पैसे येतील त्यातून कर्जाची परतफेड व्हावी. 26परंतु त्या चाकराने पाया पडून, गयावया करीत म्हटले, मला थोडी सवलत द्या. जे काही मी तुमचे देणे लागतो ते तुम्हास परत करीन. 27त्या मालकाला आपल्या चाकराचा कळवळा आला, म्हणून त्याने त्या चाकराचे सर्व कर्ज माफ केले आणि त्यास सोडले. 28नंतर त्याच चाकराचे काही शंभर चांदीचे नाणे देणे लागत असलेला दुसरा एक चाकर पहिल्या चाकराला भेटला. त्याने त्या दुसऱ्या चाकराचा गळा पकडला आणि तो त्यास म्हणाला, तू माझे जे काही पैसे देणे लागतोस ते सर्व आताच्या आता दे. 29परंतु दुसरा चाकर गुडघे टेकून गयावया करीत म्हणाला, मला थोडी सवलत द्या. जे काही पैसे मी तुम्हास देणे लागतो ते परत करीन. 30पण पहिल्या चाकराने दुसऱ्या चाकराला सांभाळून घेण्यास साफ नकार दिला. उलट तो गेला आणि त्याने त्यास तुरूंगात टाकले. तेथे त्यास त्याचे कर्ज फिटेपर्यंत रहावे लागणार होते. 31घडलेला हा प्रकार जेव्हा दुसऱ्या चाकरांनी पाहिला तेव्हा ते फार दुःखी झाले, तेव्हा ते गेले आणि त्यांनी जे सर्व घडले होते ते मालकाला सांगितले. 32तेव्हा पहिल्या चाकराच्या मालकाने त्यास बोलावले व तो त्यास म्हणाला, “दुष्टा, तू माझे कितीतरी देणे लागत होतास, परंतु मी तुझे देणे माफ करावे अशी विनंती तू मला केलीस तेव्हा मी तुझे सर्व कर्ज माफ केले. 33म्हणून तू तुझ्याबरोबरच्या चाकरालाही तशीच दया दाखवायची होतीस?” 34मालक फार संतापला, शिक्षा म्हणून मालकाने पहिल्या चाकराला तुरूंगात टाकले आणि त्याने सर्व कर्ज फेडीपर्यंत त्यास तुरूंगातून सोडले नाही. 35“जसे या राजाने केले तसेच माझा स्वर्गीय पिता तुमचे करील. तुम्ही आपल्या बंधूला मनापासून क्षमा केली नाही तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हास क्षमा करणार नाही.” 19:1येशूने या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर तो गालील प्रांतातून निघून गेला आणि यार्देन नदीच्या दुसऱ्या किनाऱ्याकडील यहूदीया प्रांतात गेला.
आजचे संत
- संत जेन फ्रान्सिस द शांताल, व्रतस्थ
सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क