मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › जुलै 2027 › 29 जुलै
कॅथलिक दिनदर्शिका
दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 29 जुलै 2027
गुरुवार · सामान्यकाळाचा 17वा आठवडा
सण आणि संत
सामान्यकाळाच्या 17व्या आठवड्याचा गुरुवार
स्मृतिदिन · उपासनेचा रंग: पांढरा
संत मार्था, मरीया आणि लाजर · स्मृतिदिन
दिवसाची वाचने
पहिले वाचन
16मोशेने परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्वकाही तसे केले. 17दुसऱ्या वर्षातील पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र निवासमंडपाची उभारणी झाली. 18परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मोशेने पवित्र निवासमंडप उभा केला; प्रथम त्याने उथळ्या बसवून घेतल्या, मग त्याने त्यांच्यावर फळ्या लावल्या. अडसर लावले व त्यांचे खांब उभे केले; 19त्यानंतर निवासमंडपावरचा तंबू केला, मग वरच्या तंबूवर त्याने आच्छादन घातले; परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने हे सर्व केले. 20मोशेने साक्षपट घेऊन कोशात ठेवला व कोशाला दांडे लावून त्याच्यावर दयासन ठेवले. 21त्याने तो कोश निवासमंडपात आणला आणि योग्य ठिकाणी अंतरपट लावून साक्षपटाचा कोश झाकला; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले. 34दर्शनमंडपावर मेघाने छाया केली व पवित्र निवासमंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला. 35दर्शनमंडपावर मेघ राहिला व परमेश्वराच्या तेजाने निवासमंडप भरून गेला म्हणून मोशेला आत जाता येईना. 36पवित्र निवास मंडपावरील मेघ वर जाई तेव्हा इस्राएल लोक आपला पुढील प्रवास सुरू करीत; 37परंतु तो मेघ निवासमंडपावर असेपर्यंत लोक तेथून हलत नसत; तो वर जाईपर्यंत ते तेथेच थांबत. 38परमेश्वराचा मेघ दिवसा निवासमंडपावर राही आणि रात्री त्यामध्ये अग्नी असे त्यामुळे सर्व इस्राएल लोकांस आपल्या प्रवासात तो दिसत असे.
प्रतिसाद स्तोत्र
2माझ्या जिवाला परमेश्वराच्या अंगणाची खूप आतुरता लागली, असून तो अतिउत्सुकही झाला आहे; माझा जीव व देह जिवंत देवाला आरोळी मारीत आहे. 3हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला आपले घर आणि निळवीला आपली पिल्ले ठेवण्यासाठी कोटे सापडले आहे. 4जे तुझ्या घरात राहतात ते आशीर्वादित आहेत; ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. 5ज्या मनुष्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे, ज्याच्या मनात सीयोनेचे राजमार्ग आहेत तो आशीर्वादित आहे. 7ते सामर्थ्यापासून सामर्थ्यात जातात; त्यातील प्रत्येकजणाला सियोनेत देवाचे दर्शन लाभते. 10तुझ्या अंगणातला एक दिवस इतर ठिकाणातल्या हजार दिवसांपेक्षा उत्तम आहे; दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे हे मला चांगले आहे.
शुभवर्तमान
किंवा: लूक 10:38–42
19आणि यहूदी लोकांपैकी पुष्कळजण मार्था व मरीया यांच्याकडे त्यांच्या भावाबद्दल त्यांचे सांत्वन करण्यास आले होते. 20म्हणून येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्यास जाऊन भेटली, पण मरीया घरांतच बसून राहिली. 21तेव्हा मार्था येशूला म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मरण पावला नसता. 22तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल, हे मला ठाऊक आहे.” 23येशूने तिला म्हटले, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.” 24मार्था त्यास म्हणाली, “तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानसमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे.” 25येशूने तिला म्हटले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरण पावला असला तरी जगेल. 26आणि जिवंत असलेला प्रत्येकजण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही, यावर तू विश्वास ठेवतेस काय?” 27ती त्यास म्हणाली, “होय, प्रभूजी, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात असा विश्वास मी धरला आहे.”
आजचे संत
- संत मार्था, मरीया आणि लाजर
सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क