Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › जुलै 2027 › 19 जुलै

कॅथलिक दिनदर्शिका

दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 19 जुलै 2027

सोमवार · सामान्यकाळाचा 16वा आठवडा

सण आणि संत

सामान्यकाळाच्या 16व्या आठवड्याचा सोमवार

आठवड्याचा दिवस · उपासनेचा रंग: हिरवा

दिवसाची वाचने

पहिले वाचन

निर्ग 14:5–18

5इस्राएल लोक निसटून गेल्याचे मिसराच्या राजाला समजले तेव्हा तो व त्याचे अधिकारी यांचे विचार बदलले व आपण हे काय केले असे त्यांना वाटले. फारो म्हणाला, “आपण इस्राएली लोकांस आपल्या दास्यातून पळून का जाऊ दिले?” 6तेव्हा फारोने आपला रथ तयार करण्यास सांगितले आणि आपल्या लोकांस घेऊन तो निघाला. 7त्याने सहाशे उत्तम योद्धे व मिसरातील सर्व रथ त्यांवरील सरदारांसोबत आपल्याबरोबर घेतले. 8इस्राएल लोक तर मिसरहून मोठ्या अवसानाने चालले होते, परंतु परमेश्वराने फारो राजाचे मन कठीण केले. 9फारोच्या लष्करात पुष्कळ घोडेस्वार व रथ होते. मिसरी सैन्याने त्यांचा पाठलाग केला व इस्त्राएल लोकांनी लाल समुद्र व बआल-सफोनाच्या दरम्यान पीहहीरोथ येथे तळ दिला होता तेथे त्यांना गाठले. 10फारो व मिसरी सैन्य आपणाकडे येताना इस्राएल लोकांनी पाहिले, तेव्हा ते अतिशय घाबरले; आणि मदतीसाठी ते परमेश्वराचा धावा करू लागले. 11ते मोशेला म्हणाले, “आम्हांला मिसरात काय कबरा नव्हत्या म्हणून येथे रानात मरावयास आणले? आम्हांला तू मिसरातून बाहेर का काढले? 12मिसरमध्ये आम्ही तुला नव्हतो का म्हणत की आम्ही आहो ते ठीक आहो, आम्ही मिसरामध्ये गुलाम म्हणून राहिलो असतो तर बरे झाले असते. येथे रानात मरून जावे त्यापेक्षा मिसऱ्यांचे दास्य पत्करले.” 13परंतु मोशेने उत्तर दिले, “भिऊ नका! स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे तारण करील ते पाहा. आजच्या दिवसानंतर हे मिसराचे लोक तुम्हास पुन्हा कधीही दिसणार नाहीत. 14परमेश्वर तुमच्याकरता त्यांच्याशी लढेल, तुम्ही शांत उभे राहा.” 15मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “माझा धावा करीत काय बसलास? इस्राएल लोकांस सांग की पुढे चला. 16तू आपली काठी उचल आणि आपला हात समुद्रावर उगारून तो दुभाग म्हणजे इस्राएल लोक भर समुद्रात कोरड्या भूमीवरून चालतील. 17आणि पाहा, मी स्वतः मिसऱ्यांची मने कठीण करीन आणि ते तुमचा पाठलाग करतील. आणि फारो व त्याचे सर्व सैन्य, स्वार व रथ यांचा पराभव केल्याने माझा महिमा प्रगट होईल. 18फारो व त्याचे रथ व त्यांचे स्वार यांचा पराभव केल्याने माझा महिमा प्रगट झाला म्हणजे मी परमेश्वर आहे हे मिसरी लोकांस कळेल.”

प्रतिसाद स्तोत्र

निर्ग 15:1–6

1नंतर मोशे व इस्राएल लोक यांनी परमेश्वरास हे गीत गाईले. ते म्हणाले, “मी परमेश्वरास गीत गाईन कारण तो विजयाने प्रतापी झाला आहे; घोडा व स्वार यांना त्याने समुद्रात उलथून टाकले आहे. 2परमेश्वर माझे सामर्थ्य व माझे गीत आहे. तो माझे तारण झाला आहे. मी त्याची स्तुतीस्तोत्रे गाईन; परमेश्वर माझा देव आहे; तो माझ्या पूर्वजांचा देव आहे; मी त्याचे गौरव करीन. 3परमेश्वर महान योद्धा आहे; त्याचे नाव परमेश्वर आहे. 4त्याने फारोचे रथ व स्वार यांना समुद्रात फेकून दिले; त्याचे निवडक अधिकारी तांबड्या समुद्रात बुडाले आहेत. 5खोल पाण्याने त्यांना बुडविले; ते खोल पाण्यात दगडाप्रमाणे तळापर्यंत बुडाले. 6हे परमेश्वरा, तुझा उजवा हात आश्चर्यकारकरीत्या बलशाली आहे; त्या हाताने तू शत्रूंचा चुराडा करून टाकलास.

शुभवर्तमान

मत्त 12:38–42

38काही नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी यांच्यापैकी काहीजणांनी येशूला म्हटले, “गुरुजी, तुमच्या हातून एखादे चिन्ह पहावे अशी आमची इच्छा आहे.” 39येशूने उत्तर दिले, “जे लोक देवाशी अप्रामाणिक आहेत, पापी आहेत असे लोक पुराव्यासाठी चमत्कार पाहू इच्छितात. पण योना संदेष्ट्याशिवाय दुसरे चिन्ह तुम्हास मिळणार नाही. 40कारण योना जसा तीन दिवस व तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. 41जेव्हा तुमच्या पिढीचा न्याय होईल, तेव्हा निनवे शहराचे लोक उभे राहतील, तुमच्याविरुध्द साक्ष देतील आणि तुम्हास दोष देतील कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला आणि आता तर तुमच्यामध्ये योनापेक्षा महान असा कोणीएक येथे आहे. 42न्यायाच्या दिवशी दक्षिणेकडील देशाची राणी या पिढीबरोबर उभी राहून हिला दोषी ठरवील कारण शलमोनाचे ज्ञान ऐकायला ती पृथ्वीच्या शेवटापासून आली आणि शलमोनापेक्षा महान असा कोणी येथे आहे.”

सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क