Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › फेब्रुवारी 2027 › 14 फेब्रुवारी

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 1 फेब्रुवारी (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 14 फेब्रुवारी 2027

रविवार · स्वर 4

सण आणि संत

जक्कयाचा रविवार

उपवास

उपवास नाही

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

प्रातःप्रार्थनेचे चौथे शुभवर्तमान

लूक 24:1–12

1आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्या स्त्रिया अगदी पहाटेस कबरेकडे आल्या आणि त्यांनी स्वतः तयार केलेले सुगंधी मसाले आणले. 2त्यांना धोंड कबरेवरुन लोटलेला आढळला. 3त्या आत गेल्या, परंतु त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. 4यामुळे त्या अवाक झाल्या असतानाच, अचानक लखलखीत कपडे घातलेले दोन पुरूष त्यांच्या बाजूला उभे राहिले. 5तेव्हा अतिशय भयभीत होऊन त्यांनी आपले चेहरे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, जो जिवंत आहे त्याचा शोध तुम्ही मरण पावलेल्यांमध्ये का करता? 6तो येथे नाही; तो उठला आहे! तो गालील प्रांतात असताना त्याने तुम्हास काय सांगितले याची आठवण करा. 7ते असे की, “मनुष्याच्या पुत्राला धरुन पापी लोकांच्या हाती द्यावे, त्यास वधस्तंभावर खिळावे आणि तिसऱ्या दिवशी त्याने उठावे.” 8नंतर स्त्रियांना येशूच्या शब्दाची आठवण झाली. 9त्या कबरेपासून परतल्या आणि त्यांनी या सर्व गोष्टींचे वर्तमान अकरा प्रेषितांना व इतर सर्वांना सांगितले. 10त्या स्त्रिया मग्दालीया नगराची मरीया, योहान्ना आणि याकोबाची आई मरीया या होत्या. त्या आणि इतर स्त्रियांसुद्धा ज्या त्यांच्याबरोबर होत्या, प्रेषितांना या गोष्टी सांगत होत्या. 11पण प्रेषितांना त्यांचे सांगणे मूर्खपणाचे वाटले आणि त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. 12पण पेत्र उठला आणि कबरेकडे पळाला. त्याने खाली वाकून पाहिले पण त्यास तागाच्या गुंडाळण्याच्या वस्त्राशिवाय काही आढळले नाही. जे घडले त्याविषयी तो स्वतःशीच आश्चर्य करीत दूर गेला.

प्रेषितांचे पत्र

1 तीम 4:9–15

9हे वचन विश्वसनीय आहे जे सर्वदा स्वीकारावयास योग्य आहे. 10याकरिता आम्ही श्रम व खटपट करतो कारण जो सर्व लोकांचा व विशेषेकरून विश्वास ठेवणाऱ्यांचा तारणारा, त्या जिवंत देवावर आम्ही आशा ठेवली आहे. 11या गोष्टी आज्ञारूपाने सांग आणि शिकव. 12कोणीही तुझे तरुणपण तुच्छ मानू नये, तर बोलण्यात, वर्तणुकीत, प्रीतीत, (आत्म्यात) विश्वासात, शुद्धपणांत, विश्वास ठेवणाऱ्यांचा आदर्श हो. 13मी येईपर्यंत वाचणे, बोध करणे व शिकवणे, याकडे लक्ष्य लाव. 14तुझ्यावर वडीलवर्ग हात ठेवण्याचा वेळेस संदेशाच्या द्वारे देण्यात आलेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नको. 15या सर्व गोष्टींकडे पूर्ण लक्ष दे, त्यामध्ये पूर्ण गढून जा. यासाठी की तुझी प्रगती सर्व लोकांस दिसून यावी.

प्रेषितांचे पत्र (संत त्रिफॉन यांच्यासाठी)

रोम 8:28–39

28कारण आपण हे जाणतो की, जे देवावर प्रीती करतात, जे त्याच्या योजनेप्रमाणे बोलावलेले आहेत त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून, त्यांच्या चांगल्यासाठी, सहकार्य करतात. 29कारण त्यास ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते ते आपल्या पुत्राच्या प्रतिरूपात प्रकट व्हावेत म्हणून त्याने त्यांना पूर्वनियोजितही केले. म्हणजे त्याने अनेक बंधुंमध्ये ज्येष्ठ व्हावे. 30आणि त्याने ज्यांना पूर्वनियोजित केले त्यांना त्याने पाचारणही केले आणि त्याने ज्यांना पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले आणि त्याने ज्यांना नीतिमान ठरवले त्यांचे त्याने गौरवही केले. 31मग या गोष्टींविषयी आपण काय म्हणावे? जर देव आपल्या बाजूला आहे, तर मग आपल्या विरुद्ध कोण? 32आणि ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला राखले नाही, पण आपल्या सर्वांसाठी त्यास दिले, तो आपल्याला त्याच्याबरोबर सर्व गोष्टीही का देणार नाही? 33देवाच्या निवडलेल्यांवर दोषारोप कोण आणील? देव नीतिमान ठरविणारा आहे. 34दंडाज्ञा ठरविणारा कोण आहे? जो ख्रिस्त येशू मरण पावला, हो, जो मरण पावलेल्यातून उठवला गेला व देवाच्या उजवीकडे बसला आहे, तो तर आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे. 35ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आपल्याला वेगळे करील? संकट किंवा दुःख, पाठलाग, भूक किंवा नग्नता, आपत्ती किंवा तलवार करील काय? 36कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘तुझ्याकरता आम्ही दिवसभर मारले जात आहोत, आम्ही वधाच्या मेंढराप्रमाणे गणलेले आहोत.’ 37पण ज्याने आपल्यावर प्रीती केली, त्याच्याद्वारे या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो. 38कारण माझी खात्री आहे की, मरण किंवा जीवन, देवदूत किंवा सत्ता, आताच्या गोष्टी किंवा येणार्‍या गोष्टी किंवा बले, 39किंवा उंची किंवा खोली किंवा दुसरी कोणतीही निर्मिती आपला प्रभू ख्रिस्त येशू ह्याच्याठायी असलेल्या देवाच्या प्रीतीपासून आपल्याला वेगळे करू शकणार नाही.

शुभवर्तमान

लूक 19:1–10

1येशूने यरीहोत प्रवेश केला आणि त्यामधून जात होता. 2तेव्हा पाहा, जक्कय नावाचा कोणीएक मनुष्य होता, तो मुख्य जकातदार असून खूप श्रीमंत होता. 3येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. 4तेव्हा तो सर्वांच्या पुढे पळत गेला आणि येशूला पाहण्यासाठी एका उंबराच्या झाडावर चढला कारण तो त्याच रस्त्याने पुढे जाणार होता. 5मग येशू त्याठिकाणी येताच दृष्टी वर करून त्यास म्हणाला, “जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे.” 6तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत-स्वागत केले. 7हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की, “पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे.” 8तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभूजी, पाहा, मी आपले अर्धे धन गरिबांस देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असले तर ते चौपट परत करतो.” 9येशू त्यास म्हणाला, “आज या घराचे तारण झाले आहे कारण हा मनुष्यसुद्धा अब्राहामाचा मुलगा आहे. 10कारण मनुष्याचा पुत्र जे हरवलेले ते शोधण्यास आणि तारण्यास आला आहे.”

शुभवर्तमान (संत त्रिफॉन यांच्यासाठी)

लूक 10:19–21

19पाहा, मी तुम्हास साप आणि विंचू यांना तुडविण्याचा व शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिला आहे आणि कशानेच तुम्हास अपाय होणार नाही. 20तथापि तुम्हास दुष्ट आत्मे वश होतात याचा आनंद मानू नका तर तुमची नावे स्वर्गात लिहिली आहेत याचा आनंद माना.” 21त्या क्षणी तो पवित्र आत्म्यात आनंदीत झाला आणि म्हणाला, “हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू मी तुझी स्तुती करतो, कारण तू या गोष्टी ज्ञानी आणि बुद्धीमान लोकांपासून लपवून ठेवून त्या लहान बालकांस प्रकट केल्या आहेस. होय, पित्या कारण तुला जे योग्य वाटले ते तू केलेस.

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 1 फेब्रुवारी म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 14 फेब्रुवारी. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क