मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › जानेवारी 2027 › 24 जानेवारी
कॅथलिक दिनदर्शिका
दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 24 जानेवारी 2027
रविवार · सामान्यकाळाचा तिसरा आठवडा
सण आणि संत
सामान्यकाळाचा तिसरा रविवार
रविवार · उपासनेचा रंग: हिरवा
दिवसाची वाचने
पहिले वाचन
1परमेश्वराचे वचन दुसऱ्यांदा योनाकडे आले, 2“ऊठ, त्या मोठ्या निनवे शहरास जा, आणि जो संदेश मी तुला सांगेन त्याची घोषणा कर.” 3मग परमेश्वराच्या वचनाप्रमाणे योना उठून निनवेस गेला. निनवे हे फार मोठे शहर होते. ते सर्व चालत फिरण्यास तीन दिवस लागत होते. 4योना शहरातून एक दिवसाची वाट चालत असता त्याने घोषणा करून म्हटले, “अजून चाळीस दिवस आहेत, मग निनवेचा नाश होईल.” 5तेव्हा निनवेतल्या लोकांनी देवावर विश्वास ठेवला, उपास जाहीर केला, आणि मोठ्यापासून लहानापर्यंत सर्वांनी गोणताट नेसले. 10तर ते आपल्या कुमार्गापासून फिरले आहेत, अशी त्यांची कृत्ये देवाने पाहिली आणि ज्या संकटाविषयी देव बोलला होता की, “मी त्यांच्यावर ते आणीन,” त्याविषयी त्याने आपले मन बदलले व त्याने तसे केले नाही.
प्रतिसाद स्तोत्र
4हे परमेश्वरा तुझे मार्ग मला कळव, मला तुझे मार्ग शिकव. 5तू आपल्या सत्यात मला मार्ग दाखव आणि मला शिकव. कारण तू माझा तारणारा देव आहेस मी रोज तुझी वाट पाहतो. 6हे परमेश्वरा, तुझ्या दयाळू कृत्यांची आणि प्रेमदयेची आठवण कर. 7हे परमेश्वरा, माझे तरुणपणाचे पाप आणि माझा बंडखोरपणा आठवू नको. तू आपल्या प्रेमदयेला अनुसरून आपल्या चांगुलपणामुळे माझी आठवण कर. 8परमेश्वर चांगला आणि प्रामाणिक आहे. यास्तव तो पाप्यांस मार्ग शिकवतो. 9तो नम्र जणांस न्यायाने मार्गदर्शन करतो. आणि दीनांना आपला मार्ग शिकवीतो.
दुसरे वाचन
29पण बंधूंनो मी हे सांगतो की, हा काळ थोडका आहे. आता, ज्यांना स्त्रिया आहेत त्यांना स्त्रिया नसल्यासारखे त्यांनी जगावे; 30जे रडतात त्यांनी रडत नसल्यासारखे, जे आनंद करतात त्यांनी आनंद करीत नसल्यासारखे आणि जे विकत घेतात त्यांनी ते आपले स्वतःचे नसल्यासारखे रहावे. 31जे या जगाचा उपयोग करतात त्यांनी दुरुपयोग न करणारे व्हावे; कारण या जगाचे स्वरूप लयास जात आहे.
शुभवर्तमान
14योहानाला अटक झाल्यानंतर, येशू गालील प्रांतास आला व देवाकडून आलेली सुवार्ता त्याने गाजवली. 15तो म्हणाला, “आता योग्य वेळ आली आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे, पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा.” 16येशू गालीलच्या सरोवराजवळून जात असता त्यास शिमोन व शिमोनाचा भाऊ अंद्रिया हे सरोवरात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते. 17येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हास माणसे धरणारे करीन.” 18मग ते लगेचच जाळी सोडून त्याच्यामागे चालू लागले. 19तेथून काहीसे पुढे गेल्यावर येशूला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळे नीट करताना दिसले. 20त्याने लगेच त्यांना हाक मारून बोलावले; मग ते त्यांचा पिता जब्दी व नोकरचाकर यांना तारवात सोडून त्याच्यामागे गेले.
आजचे संत
- संत फ्रान्सिस द सेल्स, बिशप आणि चर्चचे धर्माचार्य
सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क