Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › जानेवारी 2027 › 25 जानेवारी

कॅथलिक दिनदर्शिका

दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 25 जानेवारी 2027

सोमवार · सामान्यकाळाचा तिसरा आठवडा

सण आणि संत

प्रेषित संत पौल याचे मनपरिवर्तन

सण · उपासनेचा रंग: पांढरा

दिवसाची वाचने

पहिले वाचन

प्रेषि 22:3–16

किंवा: प्रेषि 9:1–22

3मी यहूदी आहे, माझा जन्म किलकीयातील तार्स नगरांत झाला आणि मी या शहरांत गमलियेलच्या चरणांजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाडवडीलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळाले आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहात तसा मीही होतो. 4पुरूष व स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालू देहान्त शिक्षा देऊन सुद्धा मी ‘या मार्गाचा’ पाठलाग केला. 5त्याविषयी महायाजक व सगळा वडिलवर्गही माझा साक्षी आहे; मी त्यांच्यापासून बंधुजनांस पत्रे घेऊन दिमिष्कास चाललो होतो; ह्यासाठी की, जे तेथे होते त्यांनाही बांधून यरूशलेम शहरात शासन करावयास आणावे. 6मग असे झाले की, जाता जाता मी दिमिष्क शहराजवळ पोहचलो तेव्हा सुमारे दुपारच्या वेळेस आकाशातून माझ्याभोवती एकाएकी मोठा प्रकाश चमकला. 7तेव्हा मी जमिनीवर पडलो आणि “शौला, शौला, माझा छळ का करितोस?” अशी वाणी माझ्याबरोबर मी बोलताना ऐकली. 8मी विचारले, प्रभूजी, तू कोण आहेस? त्याने मला म्हटले, “ज्या नासोरी येशूचा तू छळ करितोस तोच मी आहे.” 9तेव्हा माझ्याबरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला खरा, परंतु माझ्याबरोबर बोलणाऱ्याची वाणी त्यांनी ऐकली नाही. 10मग मी म्हणालो, प्रभूजी मी काय करावे? प्रभूने मला म्हटले, “उठून दिमिष्कात जा; मग तू जे काही करावे म्हणून ठरविण्यात आले आहे, त्या सर्वांविषयी तुला तेथे सांगण्यात येईल.” 11त्या प्रकाशाच्या तेजामुळे मला दिसेनासे झाले; म्हणून माझ्या सोबत्यांनी माझा हात धरून मला दिमिष्कात नेले. 12मग हनन्या नावाचा कोणीएक मनुष्य होता, तो नियमशास्त्राप्रमाणे नीतिमान होता आणि तेथे राहणारे सर्व यहूदी त्याच्याविषयी चांगले बोलत असत. 13तो माझ्याकडे आला व जवळ उभा राहून मला म्हणाला, शौल भाऊ, इकडे पहा, तत्क्षणीच मी त्याच्याकडे वर पाहिले. 14मग तो म्हणाला आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्यासंबधाने ठरवले आहे की, त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावे; आणि त्या नीतिमान पुरुषाला पहावे व त्याच्या तोंडाची वाणी ऐकावी. 15कारण जे तू पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तू सर्व लोकांपुढे त्याचा साक्षी होशील. 16तर आता उशीर का करितोस? ऊठ, त्याच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पापांचे क्षालन कर.

प्रतिसाद स्तोत्र

स्तोत्र 117:1–2

1अहो सर्व राष्ट्रांनो, परमेश्वराची स्तुती करा; अहो सर्व लोकांनो त्याची स्तुती करा. 2कारण त्याचा विश्वासाचा करार आमच्यादृष्टीने महान आहे, आणि त्याची विश्वसनियता सर्वकाळ आहे. परमेश्वराची स्तुती करा.

शुभवर्तमान

मार्क 16:15–18

15तो त्यांना म्हणाला, “सर्व जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. 16जो कोणी विश्वास ठेवतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, परंतु जो विश्वास ठेवत नाही तो शिक्षेस पात्र होईल. 17परंतु जे विश्वास ठेवतील त्यांच्याबरोबर ही चिन्हे असतील, ते माझ्या नावाने भूते काढतील, ते नव्या नव्या भाषा बोलतील. 18ते आपल्या हातांनी साप उचलतील आणि ते कोणतेही प्राणघातक पदार्थ प्याले तरी ते त्यांना कदापि बाधणार नाही. ते आजाऱ्यांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील.”

आजचे संत

सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क