Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › डिसेंबर 2026 › 19 डिसेंबर

कॅथलिक दिनदर्शिका

दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 19 डिसेंबर 2026

शनिवार · आगमनकाळाचा तिसरा आठवडा

सण आणि संत

19 डिसेंबर

आठवड्याचा दिवस · उपासनेचा रंग: जांभळा

दिवसाची वाचने

पहिले वाचन

शास्ते 13:2–7, 24–25

2तेव्हा सरा येथला दानांच्या कुळाचा कोणी मनुष्य होता; त्याचे नाव मानोहा होते, आणि त्याची स्त्री वांझ होती, यास्तव तिला लेकरू झाले नव्हते. 3तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रीला दर्शन दिले, आणि तिला म्हटले, “पाहा, तू गरोदर राहण्यास असमर्थ होतीस, म्हणून तू पुत्राला जन्म देऊ शकली नाहीस, परंतु आता तू गरोदर होऊन पुत्राला जन्म देशील. 4आता तू काळजीपूर्वक राहा मद्य किंवा मादक द्रव्य पिऊ नको, आणि जे नियमाप्रमाणे अशुद्ध जाहीर केले ते अन्न खाऊ नको. 5पाहा, तू गरोदर होशील आणि तू पुत्राला जन्म देशील आणि त्याचे केस कधीच कापू नकोस कारण तो मुलगा गर्भावस्थेपासूनच देवाचा नाजीर होईल. आणि तो इस्राएलाला पलिष्टयाच्या जाचातून सोडवण्याचा आरंभ करील.” 6तेव्हा त्या स्त्रीने जाऊन आपल्या पतीला असे सांगितले की, “देवाचा मनुष्य माझ्याजवळ आला, आणि त्याचे रूप देवाच्या दूताच्या रूपासारखे फार भयंकर होते. म्हणून, तो कोठला, हे मी त्यास विचारले नाही, आणि त्याने आपले नाव मला सांगितले नाही. 7परंतु तो मला म्हणाला, पाहा, तू गरोदर होशील, आणि तू पुत्राला जन्म देशील; तर आता तू दारू आणि मादक द्रव्य पिऊ नको आणि जे काही नियमाप्रमाणे अशुद्ध जाहीर केले आहे ते अन्न खाऊ नको; कारण तो बाळ तुझ्या गर्भावस्थेपासून त्याच्या मरणापर्यंत देवाचा नाजीर होईल. 24नंतर त्या स्त्रीला पुत्र झाला, आणि तिने त्याचे नाव शमशोन ठेवले; तो पुत्र वाढत गेला, या प्रकारे परमेश्वराने त्यास आशीर्वाद दिला. 25तेव्हा सरा व अष्टावोल यांच्या दरम्यान महने-दानाच्या छावणीत त्यास परमेश्वराचा आत्मा प्रेरणा करू लागला.

प्रतिसाद स्तोत्र

स्तोत्र 71:3–6, 16–17

3मला नेहमी आश्रय मिळावा म्हणून माझा तू खडक हो; तू मला तारावयास आज्ञा दिली आहे, कारण तू माझा खडक आणि दुर्ग आहेस. 4हे माझ्या देवा, तू मला दुष्टांच्या हातातून वाचव, अन्यायी आणि निष्ठूर मनुष्याच्या हातातून मला वाचव. 5कारण हे प्रभू, तू माझी आशा आहेस. मी लहान मूल होतो तेव्हापासूनच तू माझा भरवसा आहे. 6गर्भापासून तूच माझा आधार आहेस; माझ्या आईच्या उदरातून तूच मला बाहेर काढले; माझी स्तुती नेहमी तुझ्याविषयी असेल. 16प्रभू परमेश्वराच्या सामर्थ्यी कृत्याबरोबर मी त्यांच्याकडे जाईन; मी तुझ्या, केवळ तुझ्याच, नितिमत्वाचा उल्लेख करीन. 17हे देवा, तू माझ्या तरुणपणापासून मला शिकवीत आला आहेस; आतासुद्धा तुझी आश्चर्यजनक कृत्ये सांगत आहे.

शुभवर्तमान

लूक 1:5–25

5यहूदीया प्रांताचा राजा हेरोद याच्या दिवसात, जखऱ्या नावाचा कोणी याजक होता. तो अबीयाच्या याजक घराण्यातील असून त्याची पत्नी अहरोनाच्या वंशातील होती व तिचे नाव अलीशिबा होते. 6ते दोघेही देवापुढे नीतिमान होते आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधीत निर्दोषपणे चालत असत. 7परंतु त्यांना मूल नव्हते कारण अलीशिबा वांझ होती, शिवाय ते दोघेही फार म्हातारे झाले होते. 8मग असे झाले की, तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे त्याचे याजकाचे काम करत असता, 9याजकांच्या रीतीप्रमाणे परमेश्वराच्या भवनात धूप जाळण्यासाठी चिठ्ठ्या टाकून त्याची निवड करण्यात आली. 10आणि लोकांचा सगळा जमाव धूप जाळण्याच्या वेळेस बाहेर प्रार्थना करीत उभा होता. 11तेव्हा परमेश्वराचा दूत, धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. 12त्यास पाहून जखऱ्या भयभीत झाला. 13परंतु देवदूत त्यास म्हणाला, जखऱ्या भिऊ नको, कारण तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि तुझी पत्नी अलीशिबा हिच्याकडून तुला पुत्र होईल, तू त्याचे नाव योहान ठेव. 14तेव्हा तुला आनंद व उल्लास होईल आणि त्याच्या जन्माने पुष्कळ लोक हर्षित होतील. 15कारण तो परमेश्वराच्या दृष्टीने महान होईल आणि तो द्राक्षरस किंवा मद्य कधीच पिणार नाही व तो आईच्या गर्भात असतांनाच पवित्र आत्म्याने भरलेला असेल. 16तो इस्राएलाच्या संतानांतील अनेकांना, प्रभू त्यांचा देव याच्याकडे वळविण्यास कारणीभूत ठरेल. 17आणि देवासाठी सिद्ध झालेले असे लोक तयार करायला, वडिलांची अंतःकरणे मुलांकडे आणि आज्ञा न मानणार्‍यांना नीतिमानांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी तयार केलेली प्रजा उभी करावयाला तो एलीयाच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने त्यांच्यापुढे चालेल. 18मग जखऱ्या देवदूताला म्हणाला, “हे घडणारच असे मी कशावरुन समजू? कारण मी वृद्ध मनुष्य आहे आणि माझी पत्नीसुद्धा उतारवयात आहे.” 19देवदूताने त्यास उत्तर दिले, “मी देवाच्या पुढे उभा राहणारा गब्रीएल आहे आणि तुझ्याशी बोलायला व तुलाही सुवार्ता सांगायला मला पाठविण्यात आले आहे. 20पाहा, हे घडेपर्यंत तुला बोलता येणार नाही व तू मुका राहशील कारण माझे शब्द जे योग्यवेळी पूर्णपणे खरे ठरणार आहेत त्या माझ्या शब्दांवर तू विश्वास ठेवला नाहीस.” 21तेव्हा जखऱ्याची वाट पाहणाऱ्या लोकांस तो परमेश्वराच्या भवनात इतका वेळ का राहिला याचे आश्चर्य वाटले. 22तो बाहेर आल्यावर त्यास त्यांच्याबरोबर बोलता येईना. तेव्हा त्यांना जाणिव झाली की, परमेश्वराच्या भवनात त्याने दृष्टांत पाहिला आहे. तो त्यांना खुणा करत होता परंतु तो तसाच मुका राहीला. 23मग असे झाले की त्याच्या सेवेचा कालावधी पूर्ण झाल्यावर तो घरी परत गेला. 24त्या दिवसानंतर त्याची पत्नी अलीशिबा गरोदर राहिली व पाच महिने लपून राहिली, ती म्हणाली, 25लोकांमध्ये माझा होणारा अनादर दूर करण्यासाठी प्रभूने माझ्याकडे पाहिले तेव्हा त्याने माझ्यासाठी असे केले.

सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क