Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › नोव्हेंबर 2026 › 25 नोव्हेंबर

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 12 नोव्हेंबर (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 25 नोव्हेंबर 2026

बुधवार · पेन्टेकॉस्टनंतरचा 26वा आठवडा · स्वर 8

सण आणि संत

Saint John the Merciful, Patriarch of Alexandria († c. 616–620)

उपवासाचा दिवस

उपवास: तेलासह

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

प्रेषितांचे पत्र

1 तीम 1:18–20; 2:8–15

18तीमथ्या, माझ्या मुला, मी तुला तुझ्याविषयी पूर्वीच सांगण्यात आलेल्या संदेशानुसार ही आज्ञा सोपवत आहे. यासाठी की तू त्यांच्याद्वारे चांगली लढाई करावी. 19आणि विश्वास व चांगला विवेकभाव धर. कित्येकांनी हा झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरुपी तारू फुटले. 20त्यामध्ये हूमनाय आणि आलेक्सांद्र आहेत त्यांना मी सैतानाच्या स्वाधीन केले आहे यासाठी की, निंदा न करण्यास शिकावे. 2:8म्हणून माझी अशी इच्छा आहे की सर्व ठिकाणी पुरुषांनी राग व भांडण सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी. 9त्याचप्रमाणे, माझी अशी इच्छा आहे की, स्त्रियांनी स्वतःला केस गुंफणे, सोने किंवा मोती किंवा महाग कपडे यांनी नव्हे तर सभ्य वेशाने विनयाने व मर्यादेने सुशोभित करावे. 10तसेच देवासाठी समर्पित जीवन जगणाऱ्या स्त्रियांना जसे शोभते, तसे स्वतःला चांगल्या कृत्यांनी सुशोभित करावे. 11स्त्रीने शांतपणे व पूर्ण अधीनतेने शिकावे. 12मी स्त्रीला शिकविण्याची परवानगी देत नाही किंवा पुरुषावर अधिकार गाजवण्यास परवानगी देत नाही. त्याऐवजी तिने शांत रहावे. 13कारण प्रथम आदाम निर्माण करण्यात आला त्यानंतर हव्वा. 14आणि आदाम फसवला गेला नाही तर स्त्री फसवली गेली आणि ती पापात पडली. 15तथापि मुलांना जन्म देण्याच्या वेळेस तिचे रक्षण होईल, ती मर्यादेने विश्वास, प्रीती व पवित्रपण यांमध्ये राहिल्यास हे होईल.

प्रेषितांचे पत्र (गुरुवारसाठी)

1 तीम 3:1–13

1हे वचन विश्वसनीय आहेः जर कोणी अध्यक्ष सर्वांगीण काळजीवाहक होण्याची इच्छा धरतो तर तो चांगल्या कामाची इच्छा धरतो. 2तर अध्यक्ष हा निर्दोष, एका पत्नीचा पती, मिताचारी, सावधान, मर्यादशील, पाहुणचार करणारा, शिकवण्यात निपुण, असा असावा. 3तो मद्य पिणारा किंवा मारका (किंवा घाणेरड्या लाभाची आवड धरणारा) नसावा तर तो सौम्य, न भांडणारा, पैशाचा लोभ न धरणारा. 4आपल्या स्वतःच्या घरावर चांगल्या प्रकारचा अधिकार चालवणारा, पूर्ण गंभीरपणे आपल्या मुलांना स्वाधीन राखणारा असा तो असावा. 5जर एखाद्याला स्वतःच्या कुटुंबाची देखभाल करता येत नसेल तर तो देवाच्या मंडळीची काळजी कशी घेईल? 6तो या कार्यात नवशिका नसावा म्हणजे तो गर्वाने फुगून सैतानाच्या दंडात पडू नये. 7त्याचे बाहेरच्या लोकांमध्ये चांगले नाव असावे. यासाठी की त्याच्यावर टीका होऊ नये व त्याने सैतानाच्या जाळ्यात सापडू नये. 8त्याचप्रमाणे सेवकही प्रतिष्ठित असावेत, ते दुतोंडी किंवा मद्यपान करणारे नसावेत आणि अनीतिने पैसे मिळवून श्रीमंत होण्याची त्यांना आवड नसावी. 9देवाने जे आम्हास प्रकट केले आहे ते आमच्या विश्वासाचे सखोल सत्य त्यांनी शुद्ध विवेकाने धरून ठेवावे. 10वडीलांप्रमाणे यांचीसुद्धा प्रथम परीक्षा व्हावी, मग निर्दोष ठरल्यास, त्यांनी सेवकपण करावे. 11त्याचप्रमाणे, स्त्रियांनीही गंभीर असावे, त्या चहाडखोर नसाव्यात. तर सभ्य व प्रत्येक बाबतीत विश्वसनीय असाव्यात. 12प्रत्येक सेवक एका पत्नीचा पती असावा आणि त्यांनी त्यांच्या मुलांची व कुटुंबाची चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी. 13कारण ज्यांनी सेवकपण चांगले केले, ते आपणास चांगली पदवी आणि ख्रिस्त येशूवरील विश्वासांत फार धैर्य मिळवतात.

शुभवर्तमान

लूक 12:48–59

48परंतु ज्याला माहीती नव्हते म्हणून त्याने मालकाला न आवडणारे असे कृत्य जर नोकराने केले असेल तर त्यास कमी मार बसेल. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याकडून पुष्कळाची अपेक्षा केली जाईल. ज्यांच्याजवळ जास्त ठेवले आहे त्यांच्याकडून जास्त मागितले जाईल.” 49“मी पृथ्वीवर आग लावण्यास आलो आणि जर ती अगोदरच पेटलेली असेल तर मग मला आणखी काय पाहीजे? 50मला बाप्तिस्मा घ्यावयाचा आहे आणि तो होईपर्यंत मी किती अस्वस्थ आहे! 51मी पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करण्यास आलो आहे, असे तुम्हास वाटते का? नाही, मी तुम्हास सांगतो, मी तुमच्यात फूट पाडण्यासाठी आलो आहे. 52मी असे म्हणतो कारण आतापासून घरातील पाच जणात एकमेकांविरुद्ध फूट पडेल. तिघे दोघांविरुद्ध व दोघे तिघांविरुद्ध अशी फूट पडेल. 53त्यांच्यात पित्याविरुद्ध मुलगा व मुलाविरुद्ध पिता अशी फूट पडेल, आईविरुद्ध मुलगी व मुलीविरुद्ध आई अशी फूट पडेल, सासूविरुद्ध सून व सुनेविरुद्ध सासू अशी त्यांच्यात फूट पडेल. 54तो लोकसमुदायाला म्हणाला, जेव्हा पश्चिमेकडून ढग येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेच म्हणता की, पाऊस पडेल आणि तसेच घडते. 55जेव्हा दक्षिणेकडचा वारा वाहतो, तेव्हा तुम्ही म्हणता उकाडा होईल आणि तसेच घडते. 56अहो ढोंग्यांनो! तुम्हास पृथ्वीवरील व आकाशातील चिन्हांची लक्षणे पारखता येतात, पण सध्याच्या काळाचा अर्थ तुम्हास का काढता येत नाही काय? 57आणि तुम्ही तुमच्यासाठी काय योग्य आहे ते तुम्ही स्वतःचे स्वतःच का ठरवीत नाही? 58तुम्ही तुमच्या वाद्याबरोबर न्यायालयात जात असता वाटेतच त्यांच्याशी समेट करा नाही तर तो तुम्हास न्यायाधीशासमोर नेईल आणि न्यायाधीश तुम्हास दंडाधिकाऱ्याच्या स्वाधीन करील आणि अधिकारी तुम्हास तुरुंगात टाकील. 59मी तुम्हास सांगतो, अगदी शेवटली दमडी न दमडी फेडीपर्यंत तुम्ही तेथून सुटणारच नाही.”

शुभवर्तमान (गुरुवारसाठी)

लूक 13:1–9

1त्यावेळी येशूला तेथे उपस्थित लोकांनी, पिलाताने गालील प्रांतातील मनुष्यांचे रक्त त्यांच्याच यज्ञपशूंच्या रक्तात कसे मिसळले होते, त्याविषयी सांगितले, 2त्याने त्यांना उत्तर दिले, “या गालीलकरांनी हे जे दुःख भोगले त्यावरुन ते इतर गालीलकरांपेक्षा जास्त पापी होते, असे तुम्हास वाटते का? 3मी तुम्हास सांगतो की असे नाही, जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर ते जसे मरण पावले तसे तुम्हीही मराल. 4किंवा ज्यांच्यावर शिलोहाचा बुरुज पडला व त्याखाली दबून मारले गेलेले ते अठराजण यरूशलेम शहरात राहणाऱ्या इतर सर्व लोकांपेक्षा अधिक पापी होते असे तुम्हास वाटते का? 5नाही, मी तुम्हास सांगतो जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्ही सर्वजण त्यांच्यासारखे मराल.” 6नंतर येशूने हा दाखला सांगितला, “एका मनुष्याने त्याच्या द्राक्षमळ्यात अंजिराचे झाड लावले होते, त्यावर काही फळ असेल म्हणून तो ते पाहावयास आला परंतु त्यास काहीही आढळले नाही. 7म्हणून तो माळ्याला म्हणाला, पाहा, या अंजिराच्या झाडावर फळ पाहण्यासाठी मी गेल्या तीन वर्षांपासून येत आहे, परंतु मला त्यावर काही आढळत नाही. ते तोडून टाक. उगाच त्याने जागा तरी का अडवावी? 8माळ्याने उत्तर दिले, मालक, हे एवढे एक वर्षभर ते राहू द्या. म्हणजे मी त्याच्याभोवती खणून त्यास खत घालीन. 9मग येत्या वर्षात फळ आले तर छानच! जर आले नाही तर मग आपण ते तोडून टाकावे.”

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 12 नोव्हेंबर म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 25 नोव्हेंबर. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क