IRV · अध्याय 47 / 52
यिर्मया 47
1यिर्मया संदेष्ट्याला परमेश्वराकडून पलिष्ट्यांबाबत जे वचन आले ते हे आहे. फारोने गज्जावर हल्ला करण्यापूर्वी हे वचन त्याच्याकडे आले.
2परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, उत्तरेला पुराचे पाणी चढत आहे. ते तुडूंब भरून वाहणाऱ्या नदीप्रमाणे होत आहे! मग देश व त्यातील सर्वकाही, नगरे आणि त्यातील रहिवासी यांना ते बुडवून टाकतील. म्हणून प्रत्येकजण मदतीसाठी आक्रोश करतील, आणि त्या देशात राहणारे सर्व विलाप करतील.
3त्यांच्या बलवान घोड्यांच्या टापांच्या आवाजामुळे, त्यांच्या रथांचा गडगडाट व त्यांच्या चाकांचा खडखडाट, आपल्या स्वतःच्या अशक्तपणामुळे वडील आपल्या मुलांना ते मदत करु शकणार नाहीत.
4कारण सर्व पलिष्ट्यांच्या नाशाची वेळ आली आहे, सोर आणि सीदोन यांतून वाचलेला प्रत्येक जो कोणी त्यांचे सहाय्य करणारा त्याचा नाश होईल. कारण परमेश्वर पलिष्ट्यांचा म्हणजे कफतोराच्या द्विपातील वाचलेल्यांचाही नाश करणार आहे.
5गज्जाला टक्कल पडले आहे. त्यांच्या खोऱ्यातील उरलेले अष्कलोनाचे लोक शांत झाले आहेत. तुम्ही कोठवर शोकाने आपल्या स्वत:ला जखमा करून घेणार?
6हे परमेश्वराच्या तलवारी, तू किती वेळपर्यंत शांत राहणार? तू परत आपल्या म्यानात जा. थांब आणि शांत रहा.
7तू शांत कशी राहू शकशील, कारण परमेश्वराने तुला आज्ञा दिली आहे. त्याने अष्कलोनाविरूद्ध व समुद्रकिनाऱ्याविरूद्ध हल्ला करण्यास तिला नेमले आहे.”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRV, 2019) · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. (मजकूर बदललेला नाही; तळटीपा आणि शीर्षके वगळली आहेत) · eBible.org