मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › ऑक्टोबर 2027 › 19 ऑक्टोबर
ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 6 ऑक्टोबर (जुनी पद्धत)
ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 19 ऑक्टोबर 2027
मंगळवार · पेन्टेकॉस्टनंतरचा 18वा आठवडा · स्वर 8
सण आणि संत
Holy and Glorious Apostle Thomas (1st C)
उपवास
उपवास नाही
हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.
दिवसाची वाचने
प्रेषितांचे पत्र (प्रेषित थोमा यांच्यासाठी)
9कारण मला वाटते की देवाने आम्हास मरण्यासाठी शिक्षा दिलेल्या अशा लोकांसारखे शेवटचे प्रेषित केले कारण आम्ही जगाला, देवदूतांना तसेच मनुष्यांना जणू तमाशा असे झालो आहोत. 10आम्ही ख्रिस्तासाठी मूर्ख, तर तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे आहात! आम्ही अशक्त आहोत, पण तुम्ही बलवान आहात! तुम्ही आदरणीय आहात, पण आम्ही तुच्छ आहोत! 11अगदी या क्षणापर्यंत आम्ही भुकेले आणि तहानलेले, उघडे आहोत, अमानुषपणे मारलेले, आम्ही बेघर असे आहोत. 12आणि आम्ही श्रम करतो, आम्ही स्वतःच्या हातांनी काम करतो, आमची निंदा होत असता आम्ही आशीर्वाद देतो. 13जेव्हा आमची निंदा होते, तेव्हा आम्ही आशीर्वाद देतो. जेव्हा आमचा छळ होतो तेव्हा आम्ही सहन करतो. जेव्हा आमची निंदा होते, आम्ही दयाळूपणे त्यांच्याशी बोलतो, या क्षणापर्यंत आम्ही जगासाठी गाळ आणि कचरा असे झालो आहोत. 14मी तुम्हास हे लाजविण्यासाठी लिहित नाही, तर उलट मी तुम्हास माझ्या प्रिय लेकरांप्रमाणे चांगल्या गोष्टींची जाणीव करून देत आहे. 15कारण जरी तुम्हास ख्रिस्तामध्ये दहा हजार गुरू असले तरी पुष्कळ वडील नाहीत कारण ख्रिस्त येशूमध्ये शुभवर्तमानाच्या योगे मी तुम्हास जन्म दिला आहे. 16यास्तव मी तुम्हास बोध करतो की माझे अनुकरण करा.
शुभवर्तमान
37“दुसऱ्यांचा न्याय करू नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही. दुसऱ्यांना दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हास दोषी ठरवले जाणार नाही. दुसऱ्यांची क्षमा करा म्हणजे तुमचीही क्षमा केली जाईल. 38द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल. चांगले माप दाबून, हालवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हास परत मापून देण्यात येईल.” 39त्याने त्यांना एक दाखला सांगितला, “एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला मार्ग दाखवू शकेल काय? ते दोघेही खड्डयात पडणार नाहीत काय? 40कोणताही शिष्य त्याच्या गुरुपेक्षा थोर नाही. पण प्रत्येक शिष्य जेव्हा पूर्ण शिकतो तेव्हा तो गुरुसारखाच होतो. 41स्वतःच्या डोळ्यातील मुसळ ध्यानात न आणता तू आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस? 42अथवा तू आपल्या डोळ्यातले मुसळ न पाहता आपल्या भावाला कसे म्हणशील की, भाऊ, तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे? अरे ढोंग्या, प्रथम तुझ्या डोळ्यातील मुसळ काढ मगच तुला तुझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढताना चांगले दिसेल.” 43कोणतेही चांगले झाड नाही की जे वाईट फळ देते किंवा कोणतेही वाईट झाड नाही की जे चांगले फळ देते. 44कारण प्रत्येक झाड हे त्याच्या फळावरुन ओळखले जाते. लोक काटेरी झुडुपातून अंजीरे गोळा करीत नाहीत तसेच काटेरी झुडुपातून ते द्राक्षे गोळा करीत नाहीत. 45चांगला मनुष्य त्याच्या अंतःकरणात ज्या चांगल्या गोष्टी साठवलेल्या असतात त्याच काढतो आणि दुष्ट मनुष्य त्याच्या अंतःकरणात जे वाईट आहे तेच बाहेर काढतो कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार.
प्रेषितांचे पत्र
20आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात देव जो आपला पिता आहे त्याचे सर्व गोष्टीबद्दल नेहमी उपकार माना. 21ख्रिस्ताच्या भयात राहून एकमेकांचा आदर करून स्वतःला नम्रपणे त्याच्या अधीन करा. 22पत्नींनो, जशा तुम्ही प्रभूच्या अधीन होता, तशा आपल्या पतीच्या अधीन असा. 23कारण ख्रिस्त जसा मंडळीचे मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक आहे आणि ख्रिस्त विश्वास ठेवणाऱ्या शरीराचा तारणारा आहे. 24ज्याप्रमाणे मंडळी ख्रिस्ताला शरण जाते, त्याचप्रमाणे पत्नीने प्रत्येक बाबतीत आपल्या पतीच्या अधीन असावे. 25पतीनो, ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीवर प्रीती करतो, तशी तुम्ही आपल्या पत्नीवर निस्वार्थी प्रीती करा. त्याने तिच्यासाठी स्वतःला दिले, 26यासाठी की, त्याने तिला देवाच्या वचनरुपी पाण्याने धुऊन स्वच्छ करून पवित्र करावे.
शुभवर्तमान (प्रेषित थोमा यांच्यासाठी)
19त्या दिवशी, म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी, शिष्य जेथे जमले होते तेथील दरवाजे यहूद्यांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आत आला व मध्यभागी उभा राहून म्हणाला, “तुम्हास शांती असो.” 20आणि हे बोलल्यावर त्याने त्यांना आपले हात आणि कूस दाखवली; आणि शिष्यांनी प्रभूला बघितले तेव्हा ते आनंदित झाले 21तेव्हा येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “तुम्हास शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीहि तुम्हास पाठवतो.” 22एवढे बोलल्यावर त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि तो त्यांना म्हणाला, “पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. 23ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत.” 24येशू आला तेव्हा, बारांतील एक, ज्याला दिदुम म्हणत तो थोमा त्यांच्याबरोबर नव्हता. 25म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्यास सांगितले, “आम्ही प्रभूला पाहिले.” तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मी त्याच्या हातात खिळ्यांची खूण बघितल्याशिवाय, खिळ्यांच्या जागी माझे बोट घातल्याशिवाय आणि त्याच्या कुशीत माझा हात घातल्याशिवाय मी विश्वास ठेवणारच नाही.” 26आणि पुन्हा, आठ दिवसानी, त्याचे शिष्य घरात होते आणि थोमा त्यांच्याबरोबर होता; आणि दरवाजे बंद असताना येशू आला व मध्यभागी उभा राहिला आणि म्हणाला, “तुम्हास शांती असो.” 27मग तो थोमाला म्हणाला, “तुझे बोट पुढे कर आणि माझे हात बघ; तुझा हात पुढे कर आणि माझ्या कुशीत घाल; आणि विश्वासहीन होऊ नकोस पण विश्वास ठेवणारा हो.” 28आणि थोमाने त्यास म्हटले, “माझा प्रभू आणि माझा देव!” 29येशूने त्यास म्हटले, “तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्यावांचून विश्वास ठेवणारे आहे ते धन्य!” 30आणि या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांसमोर केली. 31पण ही ह्यासाठी लिहिली आहेत की, येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे, असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि तुम्ही विश्वास ठेवल्याने तुम्हास त्याच्या नावात जीवन मिळावे.
तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 6 ऑक्टोबर म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 19 ऑक्टोबर. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क