Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › सप्टेंबर 2027 › 23 सप्टेंबर

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 10 सप्टेंबर (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 23 सप्टेंबर 2027

गुरुवार · पेन्टेकॉस्टनंतरचा 14वा आठवडा · स्वर 4

सण आणि संत

Afterfeast of the Nativity of the Theotokos

उपवास

उपवास नाही

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

प्रेषितांचे पत्र

गल 1:1–10, 20–2:5

1गलती प्रांतातील मंडळ्यांस; मनुष्यांकडून किंवा मनुष्यांच्याद्वारे नव्हे, तर येशू ख्रिस्ताच्याद्वारे आणि ज्याने त्यास मरण पावलेल्यातून उठवले तो देवपिता, ह्याच्याद्वारे झालेला प्रेषित पौल, याच्याकडून आणि माझ्या सोबतीचे सर्व बंधूकडून, 3देव जो पिता व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हास कृपा व शांती असो. 4आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे, या आताच्या दुष्ट युगातून आपल्याला सोडवण्यास, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पापांबद्दल, स्वतःला दिले. 5देवपित्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. 6मला आश्चर्य वाटते की, ज्याने तुम्हास ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून, इतक्या लवकर, तुम्ही दुसर्‍या शुभवर्तमानाकडे वळला आहात. 7दुसरे कोणतेही शुभवर्तमान नाही; पण तुम्हास घोटाळ्यात पाडणारे आणि ख्रिस्ताचे शुभवर्तमान विपरीत करण्याची इच्छा असणारे असे कित्येक आहेत. 8तर जे शुभवर्तमान आम्ही तुम्हास सांगितले त्याच्याहून निराळे शुभवर्तमान जर आम्ही सांगितले किंवा स्वर्गातील आलेल्या देवदूतानेही सांगितले, तरी तो शापित असो. 9आम्ही अगोदर सांगितले आहे तसेच आता मी पुन्हा सांगतो की, कोणी तुम्हास, जे तुम्ही स्वीकारले त्याच्यापेक्षा, निराळे शुभवर्तमान कोणी तुम्हास सांगितल्यास तो शापित असो. 10मी आता मनुष्याची किंवा मी देवाची मनधरणी करावयास पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करावयास पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतोषवीत असतो, तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. 20मी जे तुम्हास लिहित आहे, ते पाहा, देवासमोर, मी खोटे बोलत नाही. 21त्यानंतर मी सिरीया व किलिकिया प्रांतांत आलो 22आणि ख्रिस्तात असलेल्या, यहूदीया प्रांतातील मंडळ्यांना मी अपरिचित होतो. 23त्यांच्या ऐकण्यात एवढेच येत असे की, ‘पूर्वी आमचा छळ करणारा ज्या विश्वासाचा मागे नाश करीत होता त्याची तो आता सुवार्ता सांगत आहे.’ 24आणि ते माझ्याविषयी देवाचे गौरव करू लागले. 2:1नंतर, चौदा वर्षांनी मी पुन्हा, बर्णबाबरोबर, यरूशलेम शहरास वर गेलो, मी आपल्याबरोबर तीतालाही नेले. 2मला प्रकटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो आणि जे शुभवर्तमान मी परराष्ट्रीयात गाजवत असतो, ती मी त्यांच्यापुढे मांडले; पण जे विशेष मानलेले होते त्यांना एकांती मांडले; नाही तर, मी व्यर्थ धावतो किंवा धावलो, असे कदाचित् झाले असते. 3पण माझ्याबरोबर असलेला तीत हा ग्रीक असल्यामुळे, त्यालाही सुंता करून घेण्यास भाग पाडण्यात आले नाही. 4आणि गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूमुळे देखील भाग पाडण्यात आले नाही; ते आम्हास दास्यात घालण्याकरता, ख्रिस्त येशूमध्ये जी मोकळीक आपल्याला आहे ते हेरण्यास, चोरून आत आले होते. 5शुभवर्तमानाचे सत्य तुमच्याकडे रहावे म्हणून आम्ही त्यांना घटकाभरही वश होऊन त्यांच्या अधीन झालो नाही.

शुभवर्तमान

मार्क 5:1–20

1मग येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे, गरसेकरांच्या प्रदेशात आले. 2तो तारवातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य कबरांतून निघून त्यास भेटला. 3तो कबरांमध्ये राहत असे व त्यास साखळदंडाने आणखी बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते. 4कारण त्यास पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडांनी बांधले असताही, त्याने साखळदंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते आणि त्यास ताब्यात ठेवण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते. 5तो नेहमी रात्रंदिवस कबरांमध्ये व डोंगरांमध्ये राहून ओरडत असे व टोकदार दगडांनी आपले अंग ठेचून घेत असे. 6येशूला दुरून पाहताच, तो धावत आला व त्याच्या पाया पडला. 7आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस.” 8कारण येशू त्यास म्हणत होता, “अरे अशुद्ध आत्म्या, या मनुष्यातून निघ.” 9त्याने त्यास विचारले, “तुझे नाव काय?” त्याने उत्तर दिले, “माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत. 10आणि आम्हास या देशातून घालवू नकोस” अशी तो त्यास आग्रहाने विनंती करत होता. 11तेथे डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. 12तेव्हा अशुद्ध आत्म्यांनी त्यास विनंती केली की, “आम्ही त्या डुकरांत शिरावे, म्हणून त्यांच्याकडे आम्हास लावून दे.” 13मग त्याने त्यास परवानगी दिली. तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकारात शिरले आणि तो सुमारे दोन हजार डुकरांचा कळप तडक धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला व पाण्यात गुदमरून मरण पावला. 14डुकरे राखणारे पळाले व त्यांनी गावात व शेतमळ्यांत हे वर्तमान सांगितले, तेव्हा काय झाले हे पाहण्यास लोक आले. 15ते येशूजवळ आल्यावर तो भूतग्रस्त, म्हणजे ज्यात सैन्य होते तो, कपडे घातलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांना भीती वाटली. 16ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी भूतग्रस्ताला काय झाले ते व डुकरांविषयीची हकीकत इतरांना सांगितली. 17तेव्हा आपण आमच्या प्रांतातून निघून जावे असे ते त्यास विनवू लागले. 18मग तो तारवात जात असता, पूर्वी भूतग्रस्त असलेला मनुष्य त्यास विनंती करू लागला की, मलाही तुमच्या सोबत घ्या. 19परंतु त्याने त्यास आपल्या सोबत येऊ दिले नाही, तर त्यास म्हटले, “तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा आणि प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग.” 20तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठी कामे त्याच्यासाठी केली होती ती दकापलीस येथे जाहीर करू लागला. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले.

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 10 सप्टेंबर म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 23 सप्टेंबर. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क