मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › सप्टेंबर 2027 › 5 सप्टेंबर
ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 23 ऑगस्ट (जुनी पद्धत)
ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 5 सप्टेंबर 2027
रविवार · स्वर 2
सण आणि संत
पेन्टेकॉस्टनंतरचा 11वा रविवार
उपवास
उपवास नाही
हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.
दिवसाची वाचने
प्रातःप्रार्थनेचे 11वे शुभवर्तमान
15मग त्यांची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणतो, “माझी कोकरे चार.” 16तो पुन्हा दुसऱ्यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणाला, “माझी मेंढरे राख.” 17तो तिसर्यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” पेत्र दुःखी होऊन त्यास म्हणाला, “प्रभू, तुला सर्व माहीत आहे, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” येशू त्यास म्हणतो, “माझी मेंढरे चार.” 18“मी तुला खरे खरे सांगतो, तू जेव्हा तरुण होतास तेव्हा आपली कंबर बांधून तुझी इच्छा असेल तिकडे जात होतास; पण तू म्हातारा होशील तेव्हा हात पुढे करशील, दुसरा तुझी कंबर बांधील आणि तुझी इच्छा नसेल तिकडे तुला नेईल.” 19तो कोणत्या मरणाने देवाचे गौरव करणार होता हे प्रकट करायला तो हे बोलला आणि हे बोलल्यावर तो त्यास म्हणतो, “माझ्यामागे ये.” 20तेव्हा पेत्र मागे वळला आणि पाहतो की, ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती जो भोजनाच्या वेळी त्याच्या छातीशी टेकला असता मागे लवून ‘प्रभू, तुला धरून देणारा तो कोण आहे?’ असे म्हणाला होता, त्यास त्याने मागे चालतांना पाहिले. 21म्हणून, त्यास बघून, पेत्र येशूला म्हणाला, “प्रभू, ह्याचे काय?” 22येशूने त्यास म्हटले, “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर त्याचे तुला काय? तू माझ्यामागे ये.” 23तेव्हा बांधवांत हे बोलणे पसरले की, तो शिष्य मरणार नाही. पण येशू त्यास म्हणाला नव्हता की, तो मरणार नाही, पण “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर तुला काय?” 24जो या गोष्टींची साक्ष देतो व ज्याने या गोष्टी लिहिल्या आहेत तोच हा शिष्य आहे; आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हास माहीत आहे. 25आणि ह्याशिवाय येशूने केलेली पुष्कळ कृत्ये आहेत; ती एकएक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात देखील मावणार नाहीत असे मला वाटते.
प्रेषितांचे पत्र
2जरी मी इतरांकरता प्रेषित नसलो, तरी निःसंशय मी तुमच्याकरता आहे कारण तुम्ही प्रभूमध्ये माझ्या प्रेषितपणाचा शिक्का आहात. 3माझी चौकशी करणार्यांना हे माझे प्रत्युत्तर आहे: 4आम्हास खाण्यापिण्याचा अधिकार नाही काय? 5इतर प्रेषित, प्रभूचे भाऊ किंवा केफा, हे करतात त्याप्रमाणे आम्हास कोणी विश्वासी बहीण पत्नी करून घेऊन, बरोबर नेण्याचा अधिकार नाही काय? 6किंवा केवळ मला आणि बर्णबाला काम न करण्याचा अधिकार नाही काय? 7स्वतःच्या खर्चाने सैनिक म्हणून सेवा करणारा असा कोण आहे? कोण द्राक्षमळा लावतो आणि त्याचे फळ खात नाही? किंवा कोण कळप राखतो आणि कळपाच्या दुधातून पीत नाही? 8मी या गोष्टी लोकरीतीस अनुसरून सांगतो काय? नियमशास्त्र हेच सांगत नाही काय? 9कारण, मोशेच्या नियमशास्त्रात लिहिले आहे की, ‘मळणी करीत असलेल्या बैलाला मुसके घालू नको.’ देव केवळ बैलांची काळजी करतो काय? 10किंवा सर्वस्वी आपल्याकरता तो हे म्हणतो? हे निःसंशय आपल्याकरता लिहिले आहे म्हणजे जो नांगरतो त्याने आशेने नांगरावे आणि जो मळणी करतो त्याने आपण वाटेकरी होऊ या आशेने करावी. 11आम्ही तुमच्यात जर आत्मिक गोष्टी पेरल्या आहेत, तर आम्ही तुमच्या दैहिक गोष्टींची कापणी केल्यास त्यामध्ये मोठे काय आहे? 12जर दुसरे तुमच्यावरील या अधिकाराचे वाटेकरी होतात, तर आम्ही विशेषेकरून का होऊ नये? आणि तरी आम्ही या अधिकाराचा उपयोग केला नाही, पण ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला आम्ही अडखळण करू नये म्हणून, आम्ही सर्व गोष्टी सहन करतो.
प्रेषितांचे पत्र (देवजननीसाठी)
5अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्याठायीही असो. 6तो देवाच्या स्वरूपाचा असूनही, त्याने आपण देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, 7तर स्वतःला रिकामे केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले, 8आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने स्वतःला लीन केले आणि त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. 9ह्यामुळे देवाने त्यास सर्वांहून उंच केले आहे आणि सर्व नावांहून श्रेष्ठ नाव ते त्यास दिले आहे. 10ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, 11आणि हे देवपिताच्या गौरवासाठी प्रत्येक जीभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.
शुभवर्तमान
23म्हणूनच स्वर्गाच्या राज्याची तुलना एका राजाशी करता येईल. आपले जे चाकर आपले देणे लागत होते त्यांच्याकडून त्या राजाने पैसे परत घेण्याचे ठरवले. 24जेव्हा त्याने पैसे जमा करायला सुरूवात केली, तेव्हा एक देणेकरी ज्याच्याकडे लक्षावधी रुपयांचे कर्ज होते त्यास त्याच्याकडे आणण्यात आले. 25त्या देणेकऱ्याकडे राजाचे पैसे परत करण्यासाठी काहीच नव्हते, तेव्हा मालकाने आज्ञा केली की त्याला, त्याच्या पत्नीला, त्याच्या मुलांना आणि जे काही त्याच्याकडे आहे ते सर्व विकले जावे आणि जे पैसे येतील त्यातून कर्जाची परतफेड व्हावी. 26परंतु त्या चाकराने पाया पडून, गयावया करीत म्हटले, मला थोडी सवलत द्या. जे काही मी तुमचे देणे लागतो ते तुम्हास परत करीन. 27त्या मालकाला आपल्या चाकराचा कळवळा आला, म्हणून त्याने त्या चाकराचे सर्व कर्ज माफ केले आणि त्यास सोडले. 28नंतर त्याच चाकराचे काही शंभर चांदीचे नाणे देणे लागत असलेला दुसरा एक चाकर पहिल्या चाकराला भेटला. त्याने त्या दुसऱ्या चाकराचा गळा पकडला आणि तो त्यास म्हणाला, तू माझे जे काही पैसे देणे लागतोस ते सर्व आताच्या आता दे. 29परंतु दुसरा चाकर गुडघे टेकून गयावया करीत म्हणाला, मला थोडी सवलत द्या. जे काही पैसे मी तुम्हास देणे लागतो ते परत करीन. 30पण पहिल्या चाकराने दुसऱ्या चाकराला सांभाळून घेण्यास साफ नकार दिला. उलट तो गेला आणि त्याने त्यास तुरूंगात टाकले. तेथे त्यास त्याचे कर्ज फिटेपर्यंत रहावे लागणार होते. 31घडलेला हा प्रकार जेव्हा दुसऱ्या चाकरांनी पाहिला तेव्हा ते फार दुःखी झाले, तेव्हा ते गेले आणि त्यांनी जे सर्व घडले होते ते मालकाला सांगितले. 32तेव्हा पहिल्या चाकराच्या मालकाने त्यास बोलावले व तो त्यास म्हणाला, “दुष्टा, तू माझे कितीतरी देणे लागत होतास, परंतु मी तुझे देणे माफ करावे अशी विनंती तू मला केलीस तेव्हा मी तुझे सर्व कर्ज माफ केले. 33म्हणून तू तुझ्याबरोबरच्या चाकरालाही तशीच दया दाखवायची होतीस?” 34मालक फार संतापला, शिक्षा म्हणून मालकाने पहिल्या चाकराला तुरूंगात टाकले आणि त्याने सर्व कर्ज फेडीपर्यंत त्यास तुरूंगातून सोडले नाही. 35“जसे या राजाने केले तसेच माझा स्वर्गीय पिता तुमचे करील. तुम्ही आपल्या बंधूला मनापासून क्षमा केली नाही तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हास क्षमा करणार नाही.”
शुभवर्तमान (देवजननीसाठी)
38मग येशू आणि त्याचे शिष्य त्याच्या मार्गाने जात असता, तो एका गावात आला. तेथे मार्था नावाच्या स्त्रीने त्याचे स्वागत करून आदरातिथ्य केले. 39तिला मरीया नावाची एक बहीण होती, ती प्रभूच्या पायाजवळ बसली व तो काय बोलतो हे ऐकत राहिली. 40पण मार्थेची अति कामामुळे तारांबळ झाली. ती येशूकडे आली आणि म्हणाली, “प्रभू, माझ्या बहिणीने सर्व काम माझ्यावर टाकले याची तुला काळजी नाही काय? तेव्हा मला मदत करायला तिला सांग.” 41प्रभूने उत्तर दिले, “मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टीविषयी दगदग करतेस. 42पण एकच गोष्ट आवश्यक आहे. हे मी सांगतो आणि मरीयेने तिच्यासाठी चांगला वाटा निवडला आहे. तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.” 11:27तो या गोष्टी बोलला तेव्हा असे घडले की, गर्दीतील एक स्त्री मोठ्याने ओरडून त्यास म्हणाली, “धन्य ते गर्भाशय, ज्याने तुझा भार वाहिला व धन्य ती स्तने जी तू चोखलीस.” 28परंतु तो म्हणाला, “जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात तेच खरे धन्य आहेत!”
तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 23 ऑगस्ट म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 5 सप्टेंबर. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क