Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › ऑगस्ट 2027 › 26 ऑगस्ट

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 13 ऑगस्ट (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 26 ऑगस्ट 2027

गुरुवार · पेन्टेकॉस्टनंतरचा 10वा आठवडा · स्वर 8

सण आणि संत

Apodosis of the Transfiguration of the Lord

मरीयेच्या निद्रेचा उपवास

उपवास: तेलाशिवाय शिजवलेले अन्न

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

संध्याप्रार्थना: वाचन

नीति 10; नीति 3; नीति 8 (निवडलेली वचने)

संध्याप्रार्थना: वाचन

नीति 10:31–11:12

31नीतिमानाच्या मुखातून ज्ञानाचे फळ निघते, पण कपटी जीभ कापली जाईल. 32नीतिमानाला जे काही स्वीकारणीय ते त्यांच्या ओठास कळते, पण दुष्टाच्या मुखास, जे कुटिल बोलणे आहे ते समजते. 11:1यथार्थ नसलेल्या तराजूचा परमेश्वरास वीट आहे, पण तंतोतंत वजनात त्यास आनंद आहे. 2जेव्हा गर्व येतो नंतर अप्रतिष्ठा येते, पण विनम्रते बरोबर ज्ञान येते. 3सरळांचा सात्विकपणा त्यांना मार्गदर्शन करतो, पण विश्वासघातक्यांचा वाकडा मार्ग त्यांचा नाश करतो. 4क्रोधाच्या दिवशी संपत्ती निरुपयोगी आहे, परंतु नीतिमत्ता तुम्हास मरणापासून वाचवते. 5निर्दोष व्यक्तीची सात्विक वागणूक त्याचे मार्ग सरळ करते, परंतु दुर्जन आपल्या दुष्टतेने पतन पावतो. 6जे देवाला प्रसन्न करतात त्यांचा सात्विकपणा त्यांना सुरक्षित ठेविल, पण फसवणारा आपल्या दुष्कृतीनेच सापळ्यात अडकतो. 7जेव्हा दुष्ट मनुष्य मरतो, त्याची आशा नष्ट होते; आणि त्याचा भरवसा त्याच्या शक्तीत होता तो निष्फळ होतो. 8नीतिमान संकटापासून दूर राहतो; आणि त्याच्याऐवजी ती दुष्टांवर येतात. 9अधर्मी आपल्या तोंडाने शेजाऱ्याचा नाश करतो, पण नीतिमान आपल्या ज्ञानाने सुरक्षित राहतो. 10जेव्हा नीतिमानाची उन्नती होते तेव्हा नगर आनंदित होते; जेव्हा दुष्टांचा नाश होतो तेव्हा तेथे आनंदाचा जयघोष होतो. 11जो कोणी आपल्या चांगल्या दानांनी देवाला संतोषवितो, तेव्हा नगर मोठे होते; दुष्टांच्या तोंडामुळे नगर उद्ध्वस्त होते. 12जो मनुष्य आपल्या मित्राला तुच्छ लेखतो तो बुद्धिहीन आहे, परंतु समजदार मनुष्य शांत राहतो.

संध्याप्रार्थना: वाचन

या भाषांतरात नाही

प्रातःप्रार्थना: शुभवर्तमान

योहा 10:9–16

9मी द्वार आहे; माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याचे तारण होईल; तो आत येईल आणि बाहेर जाईल आणि त्यास खावयास मिळेल. 10चोर तर, तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. 11मी उत्तम मेंढपाळ आहे; उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला जीव देतो. 12जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे आणि ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत, तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो; आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून धरतो त्यांची दाणादाण करतो. 13मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे आणि त्यास मेंढरांची काळजी नाही. 14मी उत्तम मेंढपाळ आहे; आणि, जसा पिता मला ओळखतो आणि मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो आणि जे माझे आहेत ते मला ओळखतात; आणि मी मेंढरांसाठी आपला जीव देतो. 16या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत; तीही मला आणली पाहिजेत आणि ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल.

प्रेषितांचे पत्र

2 करिं 1:1–7

1देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल आणि बंधू तीमथ्य ह्यांजकडून; करिंथ शहरातील देवाच्या मंडळीस व सर्व अखया प्रांतातील सर्व पवित्र जणांस सलाम, 2देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हास कृपा व शांती असो. 3आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता, जो दयाळू पिता व सर्व सांत्वन करणारा देव तो धन्यवादित असो. 4तो आमच्या सर्व संकटात आमचे सांत्वन करतो; यासाठी की, ज्या सांत्वनाने आमचे स्वतःचे देवाकडून सांत्वन होते. त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे. 5कारण ख्रिस्ताची दुःखे जशी आमच्यावर पुष्कळ येतात तसे ख्रिस्ताकडून आमचे सांत्वनही पुष्कळ होते. 6आणि आम्हावर संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे म्हणून येते आणि आम्हास सांत्वन मिळते ते तुमचे सांत्वन व्हावे म्हणून मिळते; म्हणजे असे की, जी दुःखे आम्ही सोशीत आहोत, ती धीराने सहन करण्यास तुम्हास सामर्थ्य मिळते. 7आणि तुमच्याविषयीची आमची आशा बळकट आहे कारण आम्ही हे जाणतो की, तुम्ही दुःखांचे भागीदार आहात तसेच सांत्वनाचेही भागीदार आहात.

प्रेषितांचे पत्र (संत तिखोन यांच्यासाठी)

इब्री 7:26–8:2

26म्हणून अगदी असाच महायाजक आपल्याला असणे योग्य होते. तो पवित्र, निष्कपट आणि निष्कलंक आहे; दोषविरहित आणि शुद्ध आहे, तो पाप्यांपासून वेगळा केलेला आहे. त्यास आकाशाहूनही उंच केलेले आहे. 27जे मुख्य याजक पहिल्यांदा त्यांच्या स्वतःच्या पापांसाठी व मग लोकांच्या पापांसाठी जसे अर्पण करतात तसे त्यास करण्याची गरज नाही. त्याने जेव्हा स्वतःला अर्पण केले त्याचवेळी एकदाच व कायमचेच अर्पण केले आहे. 28कारण नियमशास्त्र मानवी दुर्बलता असलेल्या मनुष्याची मुख्य याजक म्हणून नेमणूक करते. पण नियमशास्त्रानंतर शपथेचे वचन “युगानुयुग” देण्यात आल्यामुळे देवाचा पुत्र हा अनंतकाळासाठी परिपूर्ण असा मुख्य याजक झाला. 8:1आम्ही जे सांगत आहोत त्याचा मुद्दा असा आहे की, जो स्वर्गामध्ये देवाच्या राजासनाच्या उजव्या बाजूस बसलेला असा महायाजक आम्हास लाभलेला आहे, 2तो पवित्रस्थानाचा व कोणतेही मानवनिर्मित नव्हे, तर प्रभू परमेश्वराने बनवलेल्या खऱ्या सभामंडपाचा सेवक आहे.

शुभवर्तमान

मत्त 21:43–46

43म्हणून मी तुम्हास सांगतो की, देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेण्यात येईल आणि जे राष्ट्र त्यातली फळे देईल त्यास ते दिले जाईल. 44जो कोणी या दगडावर पडेल, त्याचे तुकडे तुकडे होतील परंतु जर हा दगड कोणावर पडेल तर त्याचा भुगाभुगा होईल.” 45येशूने सांगितलेले दाखले मुख्य याजकांनी आणि परूश्यांनी ऐकले. येशू त्यांच्याविषयी बोलत आहे हे त्यांनी ओळखले. 46त्यांना येशूला अटक करायचे होते. पण त्यांना लोकांचे भय वाटत होते, कारण लोक येशूला संदेष्टा मानीत होते.

शुभवर्तमान (संत तिखोन यांच्यासाठी)

मत्त 5:14–19

14तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपवता येत नाही. 15आणि दिवा लावून तो कोणी टोपलीखाली लपवून ठेवत नाही, उलट तो दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो दिवा घरातील सर्वांना प्रकाश देतो. 16तुमचा प्रकाश इतरांसमोर याप्रकारे प्रकाशू द्या की जेणेकरून त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे. 17नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे असा विचार करु नका; मी ते रद्द करावयास नव्हे तर ते पूर्ण करावयास आलो आहे. 18कारण मी तुम्हास खरे सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होतील, परंतु सर्वकाही पूर्ण झाल्याशिवाय, नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. 19यास्तव जो कोणी या लहान आज्ञातील एखादी आज्ञा रद्द करील व त्याप्रमाणे लोकांस शिकवील त्यास स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील; पण जो कोणी त्या पाळील व शिकवील त्यास स्वर्गाच्या राज्यात महान म्हणतील.

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 13 ऑगस्ट म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 26 ऑगस्ट. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क