मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › ऑगस्ट 2027 › 21 ऑगस्ट
कॅथलिक दिनदर्शिका
दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 21 ऑगस्ट 2027
शनिवार · सामान्यकाळाचा 20वा आठवडा
सण आणि संत
सामान्यकाळाच्या 20व्या आठवड्याचा शनिवार
स्मृतिदिन · उपासनेचा रंग: पांढरा
संत पायस दहावे, पोप · स्मृतिदिन
दिवसाची वाचने
पहिले वाचन
1नामीच्या पतीचा एक नातेवाईक होता; तो अलीमलेख याच्या कुळातला असून मोठा धनवान मनुष्य होता, त्याचे नाव बवाज असे होते. 2मवाबी रूथ नामीला म्हणाली, “मला शेतात जाऊ द्या, म्हणजे ज्याची कृपादृष्टी माझ्यावर होईल त्याच्यामागे मी धान्याचा सरवा वेचीत जाईन.” तेव्हा तिने म्हटले, “माझ्या मुली, जा.” 3मग ती निघून शेतात गेली आणि कापणी करणाऱ्यांच्या मागे धान्य वेचू लागली, तेव्हा असे झाले की, शेताच्या ज्या भागात ती गेली तो अलीमलेखाच्या कुळातला बवाज याचा होता. 8बवाज रूथला म्हणाला, “मुली, तू माझे ऐकतेस ना? तू दुसऱ्याच्या शेतात सरवा वेचायला जाऊ नकोस, येथेच माझ्या काम करणाऱ्या तरुण स्त्रियांबरोबर राहा. 9हे ज्या शेताची कापणी करत आहेत त्याकडे नजर ठेवून त्यांच्यामागून जा. मी या लोकांस तुला त्रास देऊ नये अशी सूचना दिली आहे ना? आणि तुला तहान लागल्यास पाण्याच्या भांड्याकडे जाऊन नोकरांनी जे पाणी भरून ठेवले त्यातील पाणी पी.” 10तेव्हा ती बवाजापुढे दंडवत घालून म्हणाली, “मज परक्या स्त्रीवर कृपादृष्टी करून माझा समाचार घेतला याचे कारण काय?” 11बवाज तिला म्हणाला, “तुझा पती मरण पावल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस आणि तू आपल्या आई-वडिलांना व जन्मदेश सोडून तुला जे लोक परिचित नाहीत अशा लोकात तू आलीस ही सविस्तर माहिती मला मिळाली आहे. 4:13मग बवाजाने रूथशी लग्न केले व ती त्याची पत्नी झाली. तो तिच्यापाशी गेला तेव्हा परमेश्वराच्या दयेने तिच्या पोटी गर्भ राहून तिला पुत्र झाला. 14तेव्हा तेथील स्त्रिया नामीला म्हणाल्या, “परमेश्वर धन्यवादित असो, कारण त्याने तुला जवळच्या नातलगाशिवाय राहू दिले नाही, त्याचे नाव इस्राएलात प्रसिद्ध होवो. 15तो तुला पुन्हा जीवन देणारा व वृद्धापकाळी सांभाळणारा असा होईल, कारण जी सून तुझ्यावर प्रीती करते, जी सात मुलांपेक्षा तुला अधिक आहे, तिला तो झाला आहे.” 16तेव्हा नामीने ते बालक घेतले आणि आपल्या उराशी धरून ती त्याची दाई झाली. 17“नामीला पुत्र झाला” असे म्हणून शेजारणींनी त्याचे नाव ओबेद ठेवले. तो इशायाचा पिता व दावीदाचा आजोबा झाला.
प्रतिसाद स्तोत्र
1जो प्रत्येकजन परमेश्वराचा आदर करतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्यवादित आहे. 2तू आपल्या हाताच्या श्रमाचे फळ खाशील, तू आनंदित होशील; तू आशीर्वादित होऊन तुझी भरभराट होईल. 3तुझी पत्नी तुझ्या घरात फलदायी द्राक्षवेलीसारखी होईल; तुझी मुले तुझ्या मेजाभोवती बसलेल्या जैतूनाच्या रोपांसारखी होतील. 4होय, खरोखर, जो मनुष्य परमेश्वराचा आदर करतो, तो असा आशीर्वादित होईल. 5परमेश्वर तुला सियोनेतून आशीर्वाद देवो; तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरूशलेमेची उन्नती तुझ्या दृष्टीस पडो.
शुभवर्तमान
1येशू लोकांशी व त्याच्या शिष्यांशी बोलला, 2तो म्हणाला, “नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत. 3म्हणून ते जसे सांगतात तसे तुम्ही करा आणि पाळा. पण तुम्ही त्यांच्या कृतीप्रमाणे तसे करू नका. याचे कारण ते सांगतात पण त्याप्रमाणे करत नाहीत. 4वाहावयास अवघड असे ओझे ते बांधतात व लोकांच्या खांद्यांवर देतात पण स्वतः ते ओझे उचलायला एक बोटदेखील लावत नाहीत. 5ते त्यांचे सर्व कामे लोकांनी पाहावे म्हणून करतात कारण ते आपली स्मरणपत्रे रूंद करतात आणि आपल्या झग्यांचे काठ मोठे करतात. 6मेजवानीच्या ठिकाणी आपल्याला विशेष मानाची जागा मिळावी असे त्यांना वाटते. तसेच यहूद्यांच्या सभास्थानात मोक्याच्या जागी बसायला त्यांना फार आवडते. 7बाजारातील मुख्य रस्त्याने जाता येता लोकांनी आपल्याला मान द्यावा याची त्यांना फार आवड असते आणि लोकांनी त्यांना ‘रब्बी’ म्हणावे असे त्यांना वाटते. 8परंतु तुम्ही स्वतःला ‘रब्बी’ म्हणवून घेऊ नका. तुम्ही सर्व एकमेकांचे भाऊ आहात, तुमचा गुरू एकच आहे. 9आणि जगातील कोणालाही पिता म्हणू नका कारण तुमचा पिता एकच आहे व तो स्वर्गात आहे. 10तुम्ही स्वतःला मालक म्हणून घेऊ नका. तुमचा मालक ख्रिस्त आहे. 11तुमच्यातील जो सेवक बनून तुमची सेवा करतो तो तुमच्यात सर्वात मोठा होय. 12जो स्वतःला मोठा समजेल त्यास कमी लेखले जाईल. स्वतःला लहान समजणारा प्रत्येकजण मोठा गणला जाईल.
आजचे संत
- संत पायस दहावे, पोप
सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क