Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › जुलै 2027 › 22 जुलै

कॅथलिक दिनदर्शिका

दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 22 जुलै 2027

गुरुवार · सामान्यकाळाचा 16वा आठवडा

सण आणि संत

संत मग्दालीया मरीया

सण · उपासनेचा रंग: पांढरा

दिवसाची वाचने

पहिले वाचन

गीत 3:1–4

किंवा: 2 करिं 5:14–17

1रात्रीच्या वेळी मी माझ्या शय्येवर पडले असता, ज्याच्यावर माझा जीव प्रेम करतो, त्याची उत्कंठा मला लागली. मी त्यास उत्कटतेने शोधले; पण तो मला सापडला नाही. 2मी स्वतःशीच म्हणाले, मी उठून, शहरासभोवती, रस्त्यावर आणि चौकांत फिरून माझ्या प्राणप्रियाला शोधीन. मी त्यास शोधले पण मला तो सापडला नाही. 3शहरात पहारा देणाऱ्या पहारेकऱ्यांना मी सापडले. मी त्यांना विचारले, “माझ्या प्राणप्रियाला तुम्ही पाहिलेत का?” 4मी पहारेकऱ्यांना सोडून निघाले होते. इतक्यात ज्याच्यावर माझा जीव प्रेम करतो तो माझा प्राणप्रिय मला सापडला. मी त्यास धरले. मी त्यास जाऊ दिले नाही. मी त्यास माझ्या आईच्या घरी नेले. जिने माझे गर्भधारण केले तिच्या खोलीत आणीपर्यंत मी त्यास सोडले नाही.

प्रतिसाद स्तोत्र

स्तोत्र 63:1–5, 7–8

1दाविदाचे स्तोत्र हे देवा, तू माझा देव आहेस; मी कळकळीने तुझा शोध घेईन; शुष्क आणि रूक्ष आणि निर्जल ठिकाणी माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे; माझा देहही तुझ्यासाठी आसुसला आहे. 2म्हणून मी तुझे सामर्थ्य आणि गौरव पाहण्यासाठी मी आपली दृष्टी पवित्र मंदिराकडे लावली आहे. 3कारण तुझी कराराची विश्वसनियता ही जीवनापेक्षा उत्तम आहे; माझे ओठ तुझी स्तुती करतील. 4म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुला धन्यवाद देईन; मी आपले हात तुझ्या नावात उंच करीन. 5माझा जीव मज्जेने आणि चरबीने व्हावा तसा तृप्त होईल; माझे तोंड आनंदी ओठाने तुझी स्तुती करतील. 7कारण तू माझे सहाय्य आहे, आणि मी तुझ्या पंखाच्या सावलीत आनंदी आहे. 8माझा जीव तुला चिकटून राहतो; तुझा उजवा हात मला आधार देतो.

शुभवर्तमान

योहा 20:1, 11–18

1आठवड्याच्या पहिल्या दिवशी, पहाटेस अंधारातच, मग्दालीया नगराची मरीया कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढली आहे असे तिने पाहिले. 11पण इकडे मरीया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि ती रडता रडता तिने ओणवून कबरेत पाहिले; 12आणि जेथे येशूचे शरीर आधी ठेवलेले होते तेथे ते शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन देवदूत एक डोक्याकडील बाजूस आणि एक पायांकडील बाजूस बसलेले दिसले. 13आणि ते तिला म्हणाले, “मुली, तू का रडतेस?” ती त्यांना म्हणाली, “त्यांनी माझ्या प्रभूला नेले आणि त्यास कोठे ठेवले हे मला माहीत नाही.” 14असे बोलून ती मागे वळली आणि तो तिला येशू उभा असलेला दिसला; पण तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. 15येशूने तिला म्हटले, “मुली, तू का रडतेस? तू कोणाला शोधतेस?” तो माळी आहे असे समजून त्यास म्हणाली, “साहेब, तू त्यास येथून नेले असेल तर कोठे ठेवलेस ते मला सांग म्हणजे मी त्यास घेऊन जाईन.” 16येशूने तिला म्हटले, “मरीये,” ती वळून त्यास इब्री भाषेत म्हणाली, “रब्बूनी,” (म्हणजे गुरूजी) 17येशूने तिला म्हटले, “मला शिवू नकोस; कारण, मी अजून पित्याकडे वर गेलो नाही; तर माझ्या बांधवांकडे जाऊन, त्यांना सांग की, जो माझा पिता आणि तुमचा पिता, माझा देव आणि तुमचा देव आहे त्याच्याकडे मी वर जातो.” 18मग्दालीया नगराची मरीया गेली आणि आपण प्रभूला पहिल्याचे आणि त्याने आपल्याला या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळविले.

आजचे संत

सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क