मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › जुलै 2027 › 12 जुलै
ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 29 जून (जुनी पद्धत)
ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 12 जुलै 2027
सोमवार · पेन्टेकॉस्टनंतरचा चौथा आठवडा · स्वर 2
सण आणि संत
The Holy Glorious and All-Praised Leaders of the Apostles, Peter and Paul
उपवास
उपवास नाही
हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.
दिवसाची वाचने
संध्याप्रार्थना: वाचन
3आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव आणि पिता धन्यवादित असो! त्याने आपल्या महादयेने येशू ख्रिस्ताला मृतांतून उठवून आपल्याला एका जिवंत आशेत पुन्हा जन्म दिला आहे, 4आणि त्याद्वारे मिळणारे अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन स्वर्गात तुमच्यासाठी राखून ठेवले आहे, 5आणि शेवटच्या काळात प्रकट करण्याकरता सिद्ध केलेल्या तारणासाठी तुम्ही देवाच्या सामर्थ्याने विश्वासाद्वारे, राखलेले आहात. 6आणि या कारणास्तव, आताच्या काळात, निरनिराळया प्रकारच्या परीक्षांमुळे तुम्हास थोडा वेळ भाग पडल्यास तुम्ही दुःख सोशीत असताही आनंदित होता. 7म्हणजे, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्याहून मोलवान असलेल्या तुमच्या विश्वासाची परीक्षा, येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी, प्रशंसेला, गौरवाला व मानाला कारण व्हावी. 8तुम्ही त्यास बघितले नसताही तुम्ही त्याच्यावर प्रीती करता आणि त्यास पाहिले नसताही त्याच्यावर विश्वास ठेवून, तुम्ही अवर्णनीय, गौरवी आनंदाने उल्लसीत होता. 9कारण, तुमच्या विश्वासाचे प्रतिफळ, म्हणजे तुमच्या आत्म्याचे तारण तुम्ही मिळवत आहात.
संध्याप्रार्थना: वाचन
13म्हणून तुम्ही आपल्या मनाची कंबर कसून सावध रहा आणि येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी तुमच्यावर जी कृपा होणार आहे तिच्यावर पूर्ण आशा ठेवा. 14तुम्ही आज्ञांकित मुले होऊन, तुमच्या पूर्वीच्या अज्ञानातील वासनांप्रमाणे स्वतःला वळण लावू नका. 15परंतु तुम्हास ज्याने पाचारण केले तो जसा पवित्र आहे तसे तुम्ही आपल्या सर्व वागण्यात पवित्र व्हा. 16कारण असे जे पवित्र शास्त्रात लिहिले आहे की, “तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे.” 17आणि पक्षपात न करता, जो प्रत्येक मनुष्याचा कामाप्रमाणे न्याय करतो त्यास तुम्ही जर पिता म्हणून हाक मारता, तर तुमच्या प्रवासाच्या काळात तुम्ही भय धरून वागले पाहिजे. 18कारण तुम्हास माहीत आहे की, तुमच्या पूर्वजांनी लावून दिलेल्या निरर्थक आचरणातून चांदीसोन्यासारख्या नाशवंत गोष्टीद्वारे, तुमची सुटका केली गेली नाही. 19निष्कलंक व निर्दोष कोकरा झालेल्या ख्रिस्ताच्या मोलवान रक्ताद्वारे तुम्ही मुक्त झाला आहात.
संध्याप्रार्थना: वाचन
11माझ्या प्रियांनो, तुम्ही उपरी व प्रवासी असल्यामुळे मी तुम्हास विनंती करतो की, आत्म्याबरोबर लढाई करणार्या दैहिक वासनांपासून दूर रहा. 12परराष्ट्रीयात आपले आचरण चांगले ठेवा, म्हणजे तुम्हास दुराचरणी मानून, ते जरी तुमच्याविषयी वाईट बोलतात, तरी तुमची जी चांगली कामे त्यांना दिसतील, त्यावरून त्याच्या भेटीच्या दिवशी त्यांनी देवाचे गौरव करावे. 13प्रत्येक प्रकारच्या मानवी व्यवस्थेला, प्रभूकरता, आज्ञाधारक रहा. राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या अधीन राहा. 14जे अधिकारी असतील त्यांना आज्ञांकित रहा; कारण वाईट करणार्यांना शिक्षा करण्यास व चांगले करणार्यांची प्रशंसा करण्यास ते पाठवलेले आहेत. 15कारण देवाची इच्छा आहे की, तुम्ही चांगले करीत राहून निर्बुद्ध मनुष्यांच्या अज्ञानाला गप्प करावे. 16तुम्ही स्वतंत्र आहात, परंतु वाईट प्रवृतीवर पांघरूण घालण्यास स्वातंत्र्याचा उपयोग न करता, देवाचे दास म्हणून जगावे 17सर्वांना मान द्या; बंधुवर्गावर प्रीती करा; देवाचे भय धरा; राजाला मान द्या. 18घरच्या नोकरांनो, तुम्ही पूर्ण आदराने आपल्या स्वामीच्या आज्ञेत रहा. जे चांगले आणि सहनशील असतील त्यांनाच नव्हे, पण कठोर असतील त्यांनादेखील आज्ञेत रहा 19कारण, जर कोणी देवाविषयी विवेक बाळगून, अन्याय सोसून, दुःख सहन करीत असेल, तर ते स्तुत्य आहे; 20पण तुम्ही पाप करता तेव्हा तुम्हास ठोसे दिले गेले आणि तुम्ही ते सहन केलेत तर त्यामध्ये काय मोठेपणा आहे? पण चांगले करून सोसावे लागते तेव्हा तुम्ही ते सहन केले, तर ते देवाला आवडणारे आहे. 21कारण ह्यासाठीच तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख सोसले आहे; आणि तुम्ही त्याच्या पावलांवरून मागोमाग जावे म्हणून त्याने तुमच्यासाठी कित्ता ठेवला आहे. 22त्याने पाप केले नाही व त्याच्या मुखात काही कपट आढळले नाही. 23त्याची हेटाळणी होत असता त्याने फिरून हेटाळले नाही, आणि सोशीत असता त्याने धमकावले नाही; पण देव जो नीतीने न्याय करतो त्याच्या हातात त्याने स्वतःस सोपवले. 24त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून वधस्तंभावर नेली, ह्यासाठी की, आपण पापाला मरून नीतिमत्त्वाला जिवंत रहावे; त्यास बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात.
प्रातःप्रार्थना: शुभवर्तमान
15मग त्यांची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणतो, “माझी कोकरे चार.” 16तो पुन्हा दुसऱ्यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणाला, “माझी मेंढरे राख.” 17तो तिसर्यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” पेत्र दुःखी होऊन त्यास म्हणाला, “प्रभू, तुला सर्व माहीत आहे, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” येशू त्यास म्हणतो, “माझी मेंढरे चार.” 18“मी तुला खरे खरे सांगतो, तू जेव्हा तरुण होतास तेव्हा आपली कंबर बांधून तुझी इच्छा असेल तिकडे जात होतास; पण तू म्हातारा होशील तेव्हा हात पुढे करशील, दुसरा तुझी कंबर बांधील आणि तुझी इच्छा नसेल तिकडे तुला नेईल.” 19तो कोणत्या मरणाने देवाचे गौरव करणार होता हे प्रकट करायला तो हे बोलला आणि हे बोलल्यावर तो त्यास म्हणतो, “माझ्यामागे ये.” 20तेव्हा पेत्र मागे वळला आणि पाहतो की, ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती जो भोजनाच्या वेळी त्याच्या छातीशी टेकला असता मागे लवून ‘प्रभू, तुला धरून देणारा तो कोण आहे?’ असे म्हणाला होता, त्यास त्याने मागे चालतांना पाहिले. 21म्हणून, त्यास बघून, पेत्र येशूला म्हणाला, “प्रभू, ह्याचे काय?” 22येशूने त्यास म्हटले, “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर त्याचे तुला काय? तू माझ्यामागे ये.” 23तेव्हा बांधवांत हे बोलणे पसरले की, तो शिष्य मरणार नाही. पण येशू त्यास म्हणाला नव्हता की, तो मरणार नाही, पण “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर तुला काय?” 24जो या गोष्टींची साक्ष देतो व ज्याने या गोष्टी लिहिल्या आहेत तोच हा शिष्य आहे; आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हास माहीत आहे. 25आणि ह्याशिवाय येशूने केलेली पुष्कळ कृत्ये आहेत; ती एकएक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात देखील मावणार नाहीत असे मला वाटते.
प्रेषितांचे पत्र (प्रेषितांसाठी)
21स्वतःला हिणवून मी हे बोलतो, तरी ज्या बाबतीत कोणी धीट असेल, तिच्यात मीही धीट आहे (हे मी मूढपणाने बोलतो). 22ते इब्री आहेत काय? मीही आहे. ते इस्राएली आहेत काय? मीहि आहे. ते अब्राहामाचे संतान आहेत काय? मीहि आहे. 23ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे (मी हे वेडगळासारखे बोलतो) मी पुष्कळ कठीण काम केले आहे. सारखा तुरुंगात जात होतो, बेसुमार फटके खाल्ले, पुष्कळ वेळा मरणाला सामोरे गेलो, म्हणून मीही अधिक आहे. 24पाच वेळेला यहूद्यांकडून मला चाबकाचे एकोणचाळीस फटके बसले. 25तीन वेळा काठीने मारण्यात आले, एकदा मला दगडमार करण्यात आला, तीन वेळा माझे जहाज फुटले, खुल्या समुद्रात मी एक रात्र व दिवस घालविला. 26मी सातत्याने फिरत होतो, नदीच्या प्रवासात धोका होता. लुटारुंकडून धोका होता. माझ्या स्वतःच्या देशबांधवांकडून धोका होता. परराष्ट्रीय लोकांकडून, शहरांमध्ये धोका होता. डोंगराळ प्रदेशात धोका होता. समुद्रातील धोके होते, विश्वास ठेवणाऱ्या खोटया बंधूंकडून आलेले धोके होते. 27मी कष्ट केले आणि घाम गाळला व पुष्कळ वेळा जागरण केले. मला भूक व तहान माहीत आहे. पुष्कळ वेळा मी उपाशी राहिलो, थंडीत उघडा असा मी राहिलो, 28या सर्व गोष्टीशिवाय दररोज माझ्यावर येणार दबाव म्हणजे सर्व मंडळ्यांविषयीची चिंता. 29कोण दुर्बळ झाला असता तर मी दुर्बळ होत नाही काय? कोण दुसऱ्याला पापात पाडण्यास कारण होतो आणि मला संताप होत नाही? 30जर मला अभिमान बाळगायचा असेल तर मी आपल्या दुर्बलतेच्या गोष्टीविषयी अभिमान बाळगीन. 31देव आणि प्रभू येशूचा पिता, ज्याची अनंतकाळपर्यंत स्तुती केली पाहिजे, तो हे जाणतो की मी खोटे बोलत नाही. 32दिमिष्क नगरात अरीतास राजाने नेमलेल्या अधिकाऱ्याने मला अटक करण्यासाठी दिमिष्ककरांच्या नगरावर पहारा दिला होता. 33पण मला टोपलीत बसवून गावकुसाच्या खिडकीतून खाली सोडण्यात आले आणि त्याच्या हातून मी निसटलो. 12:1मला अभिमान मिरवणे भाग पडते; तरी हे उचित नाही पण मी प्रभूच्या दर्शनांकडे व प्रकटीकरणांकडे आता वळतो. 2मला एक ख्रिस्तातील मनुष्य माहीत आहे; तो चौदा वर्षांपूर्वी (शरीरात की शरीराबाहेर हे मला माहीत नाही, देवाला माहीत आहे) तिसर्या स्वर्गापर्यंत नेला गेला. 3तो मला माहीत आहे आणि असा तो मनुष्य (शरीरात की शरीरापासून वेगळा हे मला माहीत नाही, देवाला माहीत आहे) 4त्या मनुष्यास सुखलोकात उचलून नेण्यात आले आणि मनुष्याने ज्यांचा उच्चारही करणे योग्य नाही अशी वाक्ये त्याने ऐकली. 5मी अशा मनुष्याविषयी अभिमान मिरवीन, मी स्वतःविषयी नाही, तर केवळ आपल्या दुर्बलतेची प्रौढी मिरवीन. 6कारण आपण अभिमान मिरवावा अशी जरी मी इच्छा धरली, तरी मी मूढ होणार नाही, कारण मी जे खरे ते बोलेन; पण मी स्वतःस आवरले पाहिजे, म्हणजे कोणी जे माझे पाहतो किंवा ऐकतो त्याहून त्याने मला अधिक मानू नये. 7आणि प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये म्हणून माझ्या देहात एक काटा दिलेला आहे, तो मला ठोसे मारणार्या सैतानाचा दूत आहे; म्हणजे मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये. म्हणून तो ठेवण्यात आला आहे. 8माझ्यामधून तो निघावा म्हणून मी प्रभूला ह्याविषयी तीनदा विनंती केली. 9आणि त्याने मला म्हणले की, ‘माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणात माझे सामर्थ्य पूर्ण होते.’ म्हणून, फार आनंदाने, मी माझ्या अशक्तपणात अभिमान मिरवीन, म्हणजे ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर रहावे;
शुभवर्तमान (प्रेषितांसाठी)
13येशू फिलिप्पाच्या कैसरीया या भागाकडे गेला. तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात?” 14आणि ते म्हणाले, “काही बाप्तिस्मा करणारा योहान, तर कित्येक एलीया तर दुसरे काही यिर्मया किंवा संदेष्ट्यापैकी एक असे म्हणतात.” 15मग येशू त्यांना म्हणाला, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” 16शिमोन पेत्राने उत्तर दिले, “तू ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र आहेस.” 17येशू म्हणाला, “शिमोन, बार्योना, तू धन्य आहेस कारण रक्त व मांस यांनी तुला हे उघड केले नाही, तर माझा पिता जो स्वर्गात आहे त्याने तुला हे उघड केले. 18आणखी मी तुला असे सांगतो की, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्यापुढे मृतलोकाच्या द्वारांचे कांहींच चालणार नाही. 19मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.”
तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 29 जून म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 12 जुलै. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क