Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › जुलै 2027 › 1 जुलै

कॅथलिक दिनदर्शिका

दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 1 जुलै 2027

गुरुवार · सामान्यकाळाचा 13वा आठवडा

सण आणि संत

सामान्यकाळाच्या 13व्या आठवड्याचा गुरुवार

आठवड्याचा दिवस · उपासनेचा रंग: हिरवा

दिवसाची वाचने

पहिले वाचन

उत्प 22:1–19

1या गोष्टी झाल्यानंतर देवाने अब्राहामाची परीक्षा घेतली. तो अब्राहामाला म्हणाला, “अब्राहामा!” अब्राहाम म्हणाला, “हा मी येथे आहे.” 2नंतर देव म्हणाला, “तुझा एकुलता एक प्रिय पुत्र, ज्याच्यावर तू प्रीती करतोस त्या इसहाकाला घेऊन तू मोरिया देशात जा आणि तेथे मी तुला सांगेन त्या डोंगरावर माझ्यासाठी त्याचे होमार्पण कर.” 3तेव्हा अब्राहाम पहाटेस लवकर उठला, त्याने खोगीर घालून आपले गाढव तयार केले, आपला मुलगा इसहाक व त्याच्यासोबत दोन तरुण सेवकांना आपल्याबरोबर घेतले. त्याने होमार्पणाकरिता लाकडे फोडून घेतली आणि मग ते सर्व देवाने सांगितलेल्या ठिकाणी प्रवासास निघाले. 4तिसऱ्या दिवशी अब्राहामाने वर पाहिले आणि दूर अंतरावर ती जागा पाहिली. 5मग अब्राहाम आपल्या तरुण सेवकांना म्हणाला, “तुम्ही येथे गाढवाजवळ थांबा, आणि मी व मुलगा तिकडे जातो. आम्ही देवाची आराधना करू आणि तुम्हाकडे परत येऊ.” 6अब्राहामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन इसहाकाच्या खांद्यावर ठेवली; त्याने स्वतःच्या हातात अग्नी व एक सुरा घेतला. आणि ते दोघे बरोबर निघाले. 7इसहाक आपल्या पित्याला म्हणाला, “माझ्या बाबा.” अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे, माझ्या मुला.” इसहाक म्हणाला, “मला लाकडे व अग्नी दिसतात, परंतु होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे?” 8अब्राहाम म्हणाला, “माझ्या मुला, होमार्पणासाठी कोकरू देव स्वतः आपल्याला पुरवेल.” तेव्हा अब्राहाम व त्याचा मुलगा बरोबर निघाले. 9देवाने सांगितलेल्या ठिकाणी जेव्हा ते जाऊन पोहचले, तेथे अब्राहामाने एक वेदी बांधली, त्याने वेदीवर लाकडे रचली. नंतर त्याने आपला पुत्र इसहाक याला बांधले, आणि वेदीवरील लाकडावर ठेवले. 10मग अब्राहामाने आपला हात पुढे करून आपल्या मुलाला मारण्यासाठी सुरा हातात घेतला. 11परंतु तेवढ्यात, परमेश्वराच्या दूताने स्वर्गातून हाक मारून त्यास म्हटले, “अब्राहामा, अब्राहामा!” अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे.” 12तो म्हणाला, “तू आपल्या मुलावर हात टाकू नकोस, किंवा त्यास कोणत्याही प्रकारची इजा करू नकोस, कारण आता मला खात्रीने समजले की, तू देवाचे भय बाळगतोस, कारण तू माझ्यासाठी आपल्या एकुलत्या एका पुत्राला ही राखून ठेवले नाही.” 13आणि मग अब्राहामाने वर पाहिले आणि पाहा, त्याच्यामागे एका झुडपात शिंगे अडकलेला असा एक एडका होता. मग त्याने जाऊन तो घेतला व आपल्या मुलाच्या ऐवजी त्या एडक्याचे होमार्पण म्हणून अर्पण केले. 14तेव्हा अब्राहामाने त्या जागेला, “परमेश्वर पुरवठा करेल,” असे नाव दिले, आणि आजवर देखील, “परमेश्वराच्या डोंगरावर तो पुरवठा केला जाईल,” असे बोलले जाते. 15नंतर स्वर्गातून परमेश्वराच्या दूताने अब्राहामास दुसऱ्यांदा हाक मारली 16आणि म्हटले, हे परमेश्वराचे शब्द आहेत, “मी परमेश्वर आपलीच शपथ वाहून म्हणतो की, तू ही जी गोष्ट केली आहे, म्हणजे तू आपल्या एकुलत्या एका मुलाला राखून ठेवले नाही, 17मी खरोखर तुला आशीर्वाद देईन व तुझे वंशज आकाशातल्या ताऱ्यांसारखे व समुद्र किनाऱ्यावरील वाळू इतके बहुतपट वाढवीनच वाढवीन; आणि तुझे वंशज आपल्या शत्रूच्या वेशीचा ताबा मिळवतील. 18पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील, कारण तू माझा शब्द पाळला आहेस.” 19मग अब्राहाम आपल्या तरुण सेवकाकडे परत आला आणि अब्राहाम, इसहाक व त्याचे सेवक असे सर्व मिळून बैर-शेबाला गेले, आणि तो बैर-शेबा येथे राहिला.

प्रतिसाद स्तोत्र

स्तोत्र 116:1–6, 8–9

1मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो माझी वाणी आणि माझ्या विनंत्या दयेसाठी ऐकतो. 2कारण तो माझे ऐकतो, म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी त्यास हाक मारीन. 3मृत्यूचे दोर माझ्याभोवती आवळले, आणि मला अधोलोकांच्या यातना झाल्या, संकट व क्लेश मला झाले. 4नंतर मी परमेश्वराच्या नावाचा धावा केला, “हे परमेश्वरा, मी तुला विनंती करतो, मला वाचव.” 5परमेश्वर कृपाळू आणि न्यायी आहे; आमचा देव कनवाळू आहे. 6परमेश्वर भोळ्यांचे रक्षण करतो; मी दीनावस्थेत होतो तेव्हा त्याने माझे तारण केले. 8तू माझा जीव मृत्यूपासून, माझे डोळे अश्रूपासून, आणि माझे पाय अडखळण्यापासून मुक्त केले आहेत. 9जीवंताच्या भूमित परमेश्वराची सेवा करणे मी चालूच ठेवीन.

शुभवर्तमान

मत्त 9:1–8

1तेव्हा येशू तारवात बसून पलीकडे गेला व परत आपल्या स्वतःच्या नगरात आला. 2तेव्हा काही लोकांनी पक्षघात झालेल्या कोणाएका मनुष्यास येशूकडे आणले. तो मनुष्य बाजेवर पडून होता. येशूने त्यांचा विश्वास पाहून त्या पक्षघाती मनुष्यास म्हटले, “मुला, धीर धर. तुझी पापे क्षमा करण्यात आली आहेत.” 3काही नियमशास्त्राच्या शिक्षकांनी हे ऐकले आणि ते आपसात म्हणाले, “हा मनुष्य तर देवाविरुद्ध दुर्भाषण करीत आहे.” 4येशूला त्यांचे विचार कळाले व तो त्यांना म्हणाला, “तुमच्या अंतःकरणात तुम्ही वाईट विचार का करता? 5कारण, तुझी पापे क्षमा करण्यात आली आहे, असे म्हणणे किंवा उठ व चालू लाग, असे म्हणणे यातून कोणते सोपे आहे? 6परंतु, मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे, हे तुम्ही जाणावे म्हणून,” मग येशू त्या पक्षघाती मनुष्यास म्हणाला, “ऊठ! आपली बाज उचलून घेऊन घरी जा.” 7मग तो उठून आपल्या घरी गेला. 8हे पाहून लोकसमुदाय थक्क झाला आणि ज्या देवाने मनुष्यास एवढा अधिकार दिला त्याचे त्यांनी गौरव केले.

सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क