मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › जून 2027 › 28 जून
कॅथलिक दिनदर्शिका
दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 28 जून 2027
सोमवार · सामान्यकाळाचा 13वा आठवडा
सण आणि संत
सामान्यकाळाच्या 13व्या आठवड्याचा सोमवार
स्मृतिदिन · उपासनेचा रंग: लाल
संत इरेनियस, बिशप, हुतात्मा आणि चर्चचे धर्माचार्य · स्मृतिदिन
दिवसाची वाचने
पहिले वाचन
16नंतर ते पुरुष उठले व सदोम नगराकडे जाण्यास निघाले. अब्राहाम त्यांना वाटेस लावण्यासाठी त्यांच्या बरोबर गेला. 17परमेश्वर देव म्हणाला, “मी जे काही करणार आहे ते अब्राहामापासून लपवू काय? 18कारण अब्राहामापासून खरोखर एक महान व समर्थ राष्ट्र होईल, आणि पृथ्वीवरील सगळी राष्ट्रे त्याच्यामुळे आशीर्वादित होतील. 19मी त्यास यासाठी निवडले आहे की, त्याने आपल्या मुलांना व कुटुंबाला अशी शिकवण द्यावी की, त्यांनी त्याच्यामागे न्यायीपणाने व धार्मिकतेने परमेश्वराचा मार्ग अनुसरावा, म्हणजे मग परमेश्वराने अब्राहामाविषयी जे सांगितले आहे ते तो त्यास प्राप्त करून द्यावे.” 20मग परमेश्वर म्हणाला, “सदोम व गमोरा यांच्या दुष्टाईचा आक्रोश मोठा आहे, आणि त्यांचे पाप फार गंभीर असल्या कारणाने, 21मी आता तेथे खाली जाईन आणि त्यांच्या पातकाचा जो बोभाटा माझ्या कानी आला आहे त्याप्रमाणेच त्यांची करणी आहे का हे पाहीन. तसे नसेल तर मला समजेल.” 22मग ती माणसे तेथून वळून आणि सदोम नगराकडे गेली, परंतु अब्राहाम परमेश्वरापुढे तसाच उभा राहिला. 23मग अब्राहाम परमेश्वराजवळ जाऊन म्हणाला, “तू दुष्टाबरोबर नीतिमानांचाही नाश करशील काय? 24कदाचित त्या नगरात पन्नास नीतिमान लोक असतील तर त्या नगराचा तू नाश करणार काय? तू त्या नगरात राहणाऱ्या पन्नास नीतिमान लोकांसाठी नगराचा बचाव करणार नाहीस काय? 25असे करणे तुझ्यापासून दूर असो. दुष्टाबरोबर नीतिमानाला मारणे म्हणजे नीतिमानाला दुष्टासारखे वागवणे हे तुझ्यापासून दूर असो! जो तू संपूर्ण पृथ्वीचा न्यायाधीश आहेस, तो तू योग्य न्याय करणार नाहीस काय?” 26परमेश्वर म्हणाला, “या सदोम शहरात मला पन्नास नीतिमान लोक सापडले तरीही त्यांच्यासाठी मी संपूर्ण स्थळाचा बचाव करीन.” 27अब्राहामाने उत्तर देऊन म्हटले, “पाहा मी केवळ धूळ व राख आहे, तरी प्रभूजवळ बोलायला धजतो! 28समजा जर पाच लोक कमी असतील म्हणजे फक्त पंचेचाळीसच चांगले लोक असतील तर? त्या पाच कमी असलेल्या लोकांकरता तू सर्व नगराचा नाश करशील काय?” आणि तो म्हणाला, “मला पंचेचाळीस लोक चांगले आढळले तर मी नगराचा नाश करणार नाही.” 29पुन्हा तो परमेश्वरास म्हणाला, “आणि जर तेथे तुला चाळीसच चांगले लोक आढळले तर? संपूर्ण शहराचा तू नाश करशील काय?” परमेश्वर म्हणाला, “जर मला चाळीसच लोक चांगले आढळले तरीही, मी शहराचा नाश करणार नाही.” 30तो म्हणाला, “प्रभू, कृपा करून तुला राग न यावा म्हणजे मी बोलेन. तेथे फक्त तीसच मिळाले तर?” परमेश्वर म्हणाला, “जर तीस चांगले लोक असतील तरीही मी तसे करणार नाही.” 31तो म्हणाला, “मी प्रभूशी बोलायला धजतो! समजा तेथे कदचित वीसच मिळाले तर?” परमेश्वराने उत्तर दिले, “त्या वीसांकरताही मी नगराचा नाश करणार नाही.” 32शेवटी तो म्हणाला, “प्रभू, कृपा करून माझ्यावर रागावू नकोस, मी शेवटी एकदाच बोलतो. कदाचित तुला तेथे दहाच लोक मिळाले तर?” परमेश्वर म्हणाला, “त्या दहांकरताही मी नगराचा नाश करणार नाही.” 33मग परमेश्वराने अब्राहामाशी बोलणे संपविल्याबरोबर तो लगेच निघून गेला, आणि अब्राहाम आपल्या तंबूकडे परत आला.
प्रतिसाद स्तोत्र
1दाविदाचे स्तोत्र. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. 2हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, आणि त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. 3तो तुझ्या सर्व पापांची क्षमा करतो; तो तुझे सर्व आजार बरे करतो. 4तो तुझे आयुष्य नाशापासून खंडून घेतो; तो तुला आपल्या विश्वासाच्या कराराने आणि करुणेच्या कृतीने मुकुट घालतो. 8परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे; तो सहनशील आहे; त्याच्यामध्ये महान कराराची विश्वासयोग्यता आहे. 9तो नेहमीच शिक्षा करणार नाही; तो नेहमीच रागावणार नाही. 10तो आम्हाशी आमच्या पापास अनुरूप असे वागला नाही किंवा आमच्या पापाला साजेसे प्रतिफळ दिले नाही. 11कारण जसे पृथ्वीच्या वरती आकाश आहे, तसे त्याचे जे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया आहे.
शुभवर्तमान
18मग येशूने आपल्या सभोवती लोकसमुदाय आहे असे पाहून त्यांना गालीलच्या सरोवरापलीकडे जाण्याची आज्ञा केली. 19तेव्हा कोणीएक शास्त्री येऊन त्यास म्हणाला, “गुरूजी, आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्यामागे येईन.” 20येशू त्यास म्हणाला, “खोकडांस बिळे व आकाशातील पाखरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला आपले डोके टेकण्यास ठिकाण नाही.” 21मग त्याच्या शिष्यांपैकी आणखी एकजण त्यास म्हणाला, “प्रभूजी, मला पित्याच्या मरणापर्यंत त्याच्याजवळ राहून, त्याच्या मरणानंतर त्यास पुरून येऊ द्या.” 22येशूने त्यास म्हटले, “तू माझ्यामागे ये आणि जे मरण पावलेले आहेत त्यांना आपल्या मरण पावलेल्यांना पुरू दे.”
आजचे संत
- संत इरेनियस, बिशप, हुतात्मा आणि चर्चचे धर्माचार्य
सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क