मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › एप्रिल 2027 › 18 एप्रिल
ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 5 एप्रिल (जुनी पद्धत)
ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 18 एप्रिल 2027
रविवार · स्वर 5
सण आणि संत
महान लेंतचा पाचवा रविवार
महान लेंत
उपवास: तेलासह
हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.
दिवसाची वाचने
प्रातःप्रार्थनेचे दुसरे शुभवर्तमान
1शब्बाथाचा दिवस संपला तेव्हा मग्दालीया नगराची मरीया, याकोबाची आई मरीया आणि सलोमी यांनी त्यास लावण्याकरिता सुगंधी तेल विकत आणले. 2आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी, अगदी पहाटे सूर्योदयाच्या वेळी त्या कबरेकडे गेल्या. 3त्या एकमेकीस म्हणत होत्या की, कबरेच्या तोंडावरून आपणासाठी धोंड कोण बाजूला लोटील? 4नंतर त्यांनी वर पाहिले आणि त्यांना धोंड दूर लोटलेली आढळली. ती फारच मोठी होती. 5त्या कबरेत आत गेल्या तेव्हा त्या चकित झाल्या. त्यांना एक तरुण पुरूष उजव्या बाजूस बसलेला आढळला. त्याने पांढरा शुभ्र झगा घातला होता. 6तो त्यांना म्हणाला, भयभीत होऊ नका, तुम्ही नासरेथकर येशू जो वधस्तंभावर खिळला होता त्याचा शोध करीत आहात. पण तो उठला आहे. येथे नाही. त्यांनी त्यास ठेवले होते ती जागा पाहा. 7जा आणि त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की, तो तुमच्या अगोदर गालील प्रांतात जात आहे, त्याने तुम्हास सांगितल्याप्रमाणे तेथे तो तुम्हास दृष्टीस पडेल. 8मग त्या बाहेर गेल्या आणि भीतीमुळे कबरेपासून पळाल्या. त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी कोणाला काहीही सांगितले नाही कारण त्या भयभीत झाल्या होत्या.
प्रेषितांचे पत्र
11पण आता ख्रिस्त हा घडून आलेल्या चांगल्या गोष्टींचा महायाजक म्हणून आला आहे आणि अधिक मोठा व अधिक पूर्ण, मनुष्याच्या हातांनी केलेला नव्हे, म्हणजे या सृष्टीतला नाही, अशा मंडपाच्याव्दारे, 12बकरे किंवा वासरु यांचे रक्त घेऊन नव्हे, तर आपले स्वतःचेच रक्त घेऊन; व त्याने सार्वकालिक खंडणी मिळवून एकदाच परमपवित्रस्थानात गेला; 13कारण बकरे व बैल यांचे रक्त; तसेच कालवडीची राख ही अशुद्ध झालेल्यांवर शिंपडल्याने जर देहाची शुद्धी होईल इतके पवित्र करतात, 14तर ज्याने सार्वकालिक आत्म्याकडून निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पिले, त्या ख्रिस्ताचे रक्त तुमच्या विवेकभावांस जिवंत देवाची सेवा करण्यासाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेषेकरून शुद्ध करील?
प्रेषितांचे पत्र (संत मरीया हिच्यासाठी)
23परंतु ख्रिस्तात विश्वास आला त्यापुर्वी, हा जो विश्वास प्रकट होणार होता, तो येण्याअगोदर आपण बंदिवान असता आपल्याला नियमशास्त्राखाली असे रखवालीत ठेवले होते. 24ह्यांवरून आपण विश्वासाने नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहचवणारे बालरक्षक होते. 25पण आता, विश्वासाचे येणे झाले आहे म्हणून आपण ह्यापुढे बालरक्षकाच्या अधीन राहिलो नाही. 26पण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्याद्वारे देवाचे पुत्र आहात. 27कारण ख्रिस्तात तुम्हामधील जितक्यांचा बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. 28यहूदी किंवा ग्रीक, दास किंवा स्वतंत्र नाही, पुरूष किंवा स्त्री हा भेदच नाही कारण ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही सर्वजण एकच आहात. 29आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहा; तर तुम्ही अब्राहामाचे संतान आणि अभिवचनाप्रमाणे वारीस आहात.
शुभवर्तमान
32मग ते वर यरूशलेम शहराच्या वाटेने जात असता येशू त्यांच्यापुढे चालला होता. त्याचे शिष्य विस्मित झाले आणि त्याच्यामागून येणारे घाबरले होते. नंतर येशूने त्या बारा शिष्यांना पुन्हा एकाबाजूला घेतले आणि स्वतःच्या बाबतीत काय घडणार आहे हे त्यांना सांगू लागला. 33“पाहा! आपण वर यरूशलेम शहरास जात आहोत आणि मनुष्याचा पुत्र धरून मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या हाती दिला जाईल. ते त्यास मरणाची शिक्षा देतील आणि ते त्यास परराष्ट्रीय लोकांच्या हाती देतील. 34ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्यास फटके मारतील, ठार करतील आणि तीन दिवसानी तो पुन्हा उठेल.” 35याकोब व योहान हे जब्दीचे पुत्र त्याच्याकडे आले आणि त्यास म्हणाले, “गुरुजी, आम्ही आपणाजवळ जे मागू ते आपण आमच्यासाठी करावे अशी आमची इच्छा आहे.” 36येशू त्यांना म्हणाला, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?” 37ते म्हणाले, “आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला तुमच्या उजवीकडे व दुसऱ्याला डावीकडे बसण्याचा अधिकार द्यावा.” 38येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही काय मागत आहात हे तुम्हास कळत नाही. मी जो प्याला पिणार आहे, तो तुमच्याने पिणे शक्य आहे काय? किंवा मी जो बाप्तिस्मा घेणार आहे तो तुमच्याने घेणे शक्य आहे काय?” 39ते त्यास म्हणाले, “आम्हास शक्य आहे.” मग येशू त्यांना म्हणाला, “मी जो प्याला पिणार आहे तो तुम्ही प्याल आणि जो बाप्तिस्मा घेईन तो तुम्ही घ्याल, 40परंतु माझ्या उजवीकडे किंवा डावीकडे बसू देणे माझ्या हाती नाही. ज्यांच्यासाठी त्या जागा तयार केल्या आहेत, त्यांच्यासाठीच त्या राखून ठेवल्या आहेत.” 41दहा शिष्यांनी या विनंतीविषयी ऐकले तेव्हा ते याकोब व योहानावर फार रागावले. 42येशूने त्यांना जवळ बोलावले आणि म्हटले, “तुम्हास माहीत आहे की, परराष्ट्री जे सत्ताधारी आहेत ते त्यांच्यावर स्वामित्व गाजवतात आणि त्यांचे पुढारी त्यांच्यावर अधिकार गाजवतात. 43परंतु तुमच्याबाबतीत तसे नाही. तुमच्यातील जो कोणी मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे. 44आणि जो कोणी पाहिला होऊ इच्छितो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे. 45कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यावयास नाही तर तो सेवा करावयास आला आहे, पुष्कळांच्या खंडणीकरिता आपला जीव देण्यासाठी आला आहे.”
शुभवर्तमान (संत मरीया हिच्यासाठी)
36तेव्हा परूश्यांपैकी कोणा एकाने, “तू माझ्याबरोबर जेवावे.” अशी येशूला विनंती केली. मग तो परूश्याच्या घरात जाऊन जेवायला बसला. 37आणि पाहा, कोणीएक पापी स्त्री त्या नगरांत होती; येशू परूश्यांच्या घरात जेवायला बसला आहे हे ऐकू ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली. 38आणि ती मागे त्याच्या पायांजवळ रडत उभी राहून आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली व तिने ते आपल्या डोक्याच्या केसांनी पुसून, त्याच्या पायांचे पुष्कळ मुके घेतले व त्यांना सुगंधी तेल लावले. 39तेव्हा ज्या परूश्याने येशूला बोलावले होते, त्याने हे पाहून आपल्या मनांत म्हटले, “हा संदेष्टा असता तर जी स्त्री त्यास स्पर्श करीत आहे ती कोण व कोणत्या प्रकारची आहे, म्हणजे ती पापी आहे, हे त्यास कळले असते.” 40तेव्हा येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, “शिमोना, तुझ्याशी मला काही बोलायचे आहे.” तेव्हा तो म्हणाला, “गुरूजी बोला.” 41येशूने म्हटले, “एका सावकाराचे दोन कर्जदार होते; एकाला चांदीचे पाचशे नाणे व दुसऱ्याला पन्नास असे देणे होते. 42परंतु कर्ज फेडायला त्यांच्याजवळ काही नव्हते म्हणून त्याने दोघांना क्षमा केली. तर त्यांच्यापैकी कोणता त्याच्यावर अधिक प्रीती करील?” 43तेव्हा शिमोनाने उत्तर देऊन म्हटले, “ज्याला अधिक माफ केले तो, असे मला वाटते.” मग येशू त्यास म्हणाला, “ठीक ठरवलेस.” 44तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हटले, “ही स्त्री तुला दिसते ना? मी तुझ्या घरात आलो, तू माझ्या पायांसाठी पाणी दिले नाही; परंतु हिने आसवांनी माझे पाय भिजवले आणि आपल्या केसांनी ते पुसले. 45तू माझा मुका घेतला नाही, परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायांचे मुके घेण्याचे थांबवले नाही, 46तू माझ्या डोक्याला तेल लावले नाही, परंतु हिने माझ्या पायांना सुगंधी तेल लावले आहे. 47या कारणासाठी मी तुला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे त्यांची क्षमा झाली आहे; कारण हिने पुष्कळ प्रीती केली; परंतु ज्याला थोडक्याची क्षमा होते तो थोडकी प्रीती करतो.” 48तेव्हा येशूने तिला म्हटले, “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” 49मग त्याच्याबरोबर जेवायला बसले होते ते आपसांत म्हणू लागले, “पापांची देखील क्षमा करणारा हा कोण आहे?” 50मग त्याने त्या स्त्रीला म्हटले, “तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा.”
तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 5 एप्रिल म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 18 एप्रिल. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क