Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › एप्रिल 2027 › 14 एप्रिल

कॅथलिक दिनदर्शिका

दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 14 एप्रिल 2027

बुधवार · पास्काकाळाचा तिसरा आठवडा

सण आणि संत

पास्काकाळाच्या तिसऱ्या आठवड्याचा बुधवार

आठवड्याचा दिवस · उपासनेचा रंग: पांढरा

दिवसाची वाचने

पहिले वाचन

प्रेषि 8:1–8

1स्तेफनाचा जो खून झाला त्यास शौलाची संमती होती. त्या दिवसापासून यरूशलेम शहर; येथील ख्रिस्ताच्या मंडळीचा मोठा छळ सुरू झाला, प्रेषितांशिवाय इतर सर्व विश्वास ठेवणारे शिष्य यहूदीया व शोमरोन प्रांताच्या, कानाकोपऱ्यात पांगून गेले. 2काही धार्मिक मनुष्यांनी स्तेफनाला पुरले आणि त्याच्यासाठी त्यांनी फार शोक केला. 3शौलाने ख्रिस्ताच्या मंडळीचा छळ करण्यास सुरुवात केली; तो घरोघर जाई विश्वास ठेवणारे पुरूष व स्त्रिया यांना धरून खेचून नेई, व तुरुंगात टाकीत असे. 4विश्वास ठेवणारे सगळीकडे पांगले होते जेथे कोठे विश्वास ठेवणारे जात तेथे ते लोकांस सुवार्ता सांगत. 5फिलिप्प शोमरोन प्रांतातील एका शहरात गेला, त्याने ख्रिस्ताची घोषणा केली तेथील लोकांनी फिलिप्पाचे बोलणे ऐकले, व त्याने केलेले चमत्कार पाहिले. 6फिलिप्प जी चिन्हे करत असे व ज्या गोष्टी त्यांना सांगत असे, ते ती लक्षपूर्वक ऐकत असत. 7कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळांतून ते मोठ्याने ओरडून निघून गेले; तेथे बरेच लंगडे व अर्धांगवायू झालेले लोक बरे झाले. 8यामुळे शहरातील लोक फार आनंदित झाले.

प्रतिसाद स्तोत्र

स्तोत्र 66:1–7

1अहो पृथ्वीवरील सर्वजणहो देवाचा जयजयकार करा; 2त्याच्या नावाचा महिमा गा; त्याची स्तुती गौरवशाली होईल अशी करा. 3देवाला म्हणा, तुझी कृत्ये किती भीतिदायक आहेत, तुझ्या महान सामर्थ्यामुळे तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन होतात. 4सर्व पृथ्वी तुझी आराधना करतील; आणि तुझी स्तोत्रे गातील; ते तुझ्या नावाची स्तोत्रे गातील. 5अहो या, आणि देवाची कार्ये पहा; तो मनुष्यांच्या मुलांस आपल्या कृत्यांनी धाक बसवतो. 6त्याने समुद्र पालटून कोरडी भूमी केली; ते नदीतून पायांनी चालत गेले; तेथे आम्ही त्याच्यात आनंद केला. 7तो आपल्या सामर्थ्याने सर्वकाळ राज्य करतो; तो आपल्या डोळ्यांनी सर्व राष्ट्रांचे निरीक्षण करतो; बंडखोरांनी आपल्यास उंच करू नये.

शुभवर्तमान

योहा 6:35–40

35तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मीच जीवनाची भाकर आहे. माझ्याकडे जो येतो त्यास कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्यास कधीही तहान लागणार नाही. 36परंतु तुम्ही मला पाहीले असताही विश्वास ठेवत नाही असे मी तुम्हास सांगितले. 37पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे जो येतो त्यास मी कधीच घालवणार नाही. 38कारण मी स्वर्गातून आलो तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे करायला नाही, पण ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला आलो आहे. 39आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की, त्याने मला जे सर्व दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये, पण शेवटच्या दिवशी मी ते उठवावे. 40माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे; त्यास मीच शेवटच्या दिवशी उठवीन.”

सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क