मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › एप्रिल 2027 › 4 एप्रिल
ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 22 मार्च (जुनी पद्धत)
ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 4 एप्रिल 2027
रविवार · स्वर 3
सण आणि संत
महान लेंतचा तिसरा रविवार
मौल्यवान क्रूसाची वंदना
महान लेंत
उपवास: तेलासह
हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.
दिवसाची वाचने
प्रातःप्रार्थनेचे 11वे शुभवर्तमान
15मग त्यांची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणतो, “माझी कोकरे चार.” 16तो पुन्हा दुसऱ्यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणाला, “माझी मेंढरे राख.” 17तो तिसर्यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” पेत्र दुःखी होऊन त्यास म्हणाला, “प्रभू, तुला सर्व माहीत आहे, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” येशू त्यास म्हणतो, “माझी मेंढरे चार.” 18“मी तुला खरे खरे सांगतो, तू जेव्हा तरुण होतास तेव्हा आपली कंबर बांधून तुझी इच्छा असेल तिकडे जात होतास; पण तू म्हातारा होशील तेव्हा हात पुढे करशील, दुसरा तुझी कंबर बांधील आणि तुझी इच्छा नसेल तिकडे तुला नेईल.” 19तो कोणत्या मरणाने देवाचे गौरव करणार होता हे प्रकट करायला तो हे बोलला आणि हे बोलल्यावर तो त्यास म्हणतो, “माझ्यामागे ये.” 20तेव्हा पेत्र मागे वळला आणि पाहतो की, ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती जो भोजनाच्या वेळी त्याच्या छातीशी टेकला असता मागे लवून ‘प्रभू, तुला धरून देणारा तो कोण आहे?’ असे म्हणाला होता, त्यास त्याने मागे चालतांना पाहिले. 21म्हणून, त्यास बघून, पेत्र येशूला म्हणाला, “प्रभू, ह्याचे काय?” 22येशूने त्यास म्हटले, “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर त्याचे तुला काय? तू माझ्यामागे ये.” 23तेव्हा बांधवांत हे बोलणे पसरले की, तो शिष्य मरणार नाही. पण येशू त्यास म्हणाला नव्हता की, तो मरणार नाही, पण “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर तुला काय?” 24जो या गोष्टींची साक्ष देतो व ज्याने या गोष्टी लिहिल्या आहेत तोच हा शिष्य आहे; आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हास माहीत आहे. 25आणि ह्याशिवाय येशूने केलेली पुष्कळ कृत्ये आहेत; ती एकएक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात देखील मावणार नाहीत असे मला वाटते.
प्रेषितांचे पत्र
14म्हणून, ज्याअर्थी आम्हास येशू देवाचा पुत्र हा महान महायाजक लाभला आहे व जो स्वर्गात गेला आहे, असा जो विश्वास आपण गाजवितो तो अखंडपणे भक्कम धरून राहू या. 15कारण आपल्याला लाभलेला महायाजक असा नाही, जो आपल्या अशक्तपणाबद्दल सहानुभूती दर्शवण्यास असमर्थ आहे. पण आपल्याला असा याजक लाभला आहे की, जो आमच्यासारखाच सर्व प्रकारच्या मोहाच्या अनुभवातून गेला. तरीही तो पूर्णपणे पापविरहीत राहिला. 16तर मग आपण देवाच्या कृपेच्या राजासनाजवळ निर्धाराने जाऊ या. यासाठी की, आमच्या गरजेच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून आम्हास दया व कृपा प्राप्त व्हावी. 5:1प्रत्येक यहूदी महायाजकाची निवड लोकांमधून होते आणि लोकांच्या वतीने त्यांच्या पापांसाठी यज्ञ व दाने ही दोन्ही देवाला अर्पावी, त्या कामाकरता महायाजक नेमलेला असतो. 2जे चुका करतात व जे अज्ञानी आहेत, त्यांच्याशी प्रत्येक मुख्य याजक सौम्यपणे वागू शकतो कारण तो स्वतः दुर्बल असतो. 3आणि त्या दुर्बलपणामुळे त्याने त्याच्या पापांसाठी तसेच लोकांच्या पापांसाठी अर्पणे केलीच पाहिजेत. 4आणि कोणीही मुख्य याजकपणाचा बहुमान स्वतःच्या पुढाकाराने घेत नसतो, तर अहरोनाला होते तसे त्यालाही देवाचे पाचारण असणे आवश्यक असते. 5त्याचप्रमाणे, ख्रिस्ताने महायाजक होण्याचा गौरव स्वतःहून आपणावर घेतले नाही, परंतु देव ख्रिस्ताला म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस आज मी तुला जन्म दिला आहे.” 6दुसऱ्या शास्त्रभागात तो असे म्हणतो, “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस.”
शुभवर्तमान
34नंतर त्याने आपल्या शिष्यांसह लोकांस बोलावले व त्यांना म्हणाला, “जर कोणाला माझ्यामागे यायचे असेल तर त्याने स्वतःला नाकारावे. आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे. 35जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो जीवाला मुकेल व जो कोणी माझ्यासाठी व सुवार्तेसाठी जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील. 36मनुष्याने सर्व जग मिळविले व आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्यास काय लाभ? 37जीवाच्या मोबदल्यात मनुष्य काय देऊ शकेल? 38देवाशी अप्रामाणिक आणि पापी पिढीत जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्रही जेव्हा तो आपल्या पित्याच्या गौरवात पवित्र दूतांसह येईल तेव्हा त्यांची लाज धरील.” 9:1येशू त्या लोकांस म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो की, येथे उभे असलेले काही असे आहेत की, ज्यांना देवाचे राज्य सामर्थ्यानिशी आलेले दिसेपर्यंत मरणाचा अनुभव येणार नाही.”
तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 22 मार्च म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 4 एप्रिल. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क