Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › मार्च 2027 › 7 मार्च

कॅथलिक दिनदर्शिका

दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 7 मार्च 2027

रविवार · उपवासकाळाचा चौथा आठवडा

सण आणि संत

उपवासकाळाचा चौथा रविवार

रविवार · उपासनेचा रंग: गुलाबी

दिवसाची वाचने

पहिले वाचन

2 इति 36:14–16, 19–23

14त्याचप्रमाणे याजकांचे प्रमुख, आणि यहूदातील वडिलधारी मंडळी यांचे दुराचरण वाढत चालले आणि त्यांनी अधिकाधिक पातके केली. ते परमेश्वराच्या बाबतीत अप्रमाणिक झाले. इतर देशांची अमंगळ कृत्यांची उदाहरणे त्यांनी समोर ठेवली. या प्रमुखांनी यरूशलेमामधल्या परमेश्वराने पवित्र केलेल्या मंदिराची धूळधान केली. 15त्यांच्या पूर्वजांच्या परमेश्वर देवाने लोकांस सावध करण्यासाठी मोठ्या निकडीने संदेष्टे पाठवले. आपल्या प्रजेविषयी आणि मंदिराविषयी त्याच्या मनात करुणा होती म्हणून परमेश्वर असे वागला. त्यांचा अथवा मंदिराचा नाश होऊ नये असे परमेश्वरास वाटत होते. 16पण या परमेश्वराच्या प्रजेने मात्र संदेष्ट्यांची टर उडवली. त्यांनी देवाच्या संदेष्ट्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. देवाच्या संदेशांची हेटाळणी केली. अखेर देवाचा क्रोध अनावर झाला. आता त्याचा संताप थोपवता येणे अशक्य झाले. 19त्यांनी देवाच्या घराला आग लावली, यरूशलेमची तटबंदी उद्ध्वस्त केली, राजा आणि सरदार यांच्या मालकीची घरे जाळली. यरूशलेम येथील प्रत्येक मौल्यवान वस्तू लुटून नेली किंवा नष्ट केली. 20अजूनही हयात असलेल्या व तलवारीपासून वाचलेल्या लोकांस नबुखद्नेस्सरने बाबेलला नेऊन गुलाम केले. पुढे पारसाचे राज्य येऊन त्यांनी बाबेलचा पराभव करेपर्यंत हे गुलाम तेथेच राहिले. 21अशाप्रकारे, यिर्मयाकडून इस्राएलाबद्दल परमेश्वराने जे वदवले ते प्रत्यक्षात घडले. परमेश्वर यिर्मयाद्वारे म्हणाला होता: हे ठिकाण सत्तर वर्षे निर्मनुष्य आणि उजाड राहील. लोकांनी न पाळलेल्या शब्बाथाच्या भरपाईसाठी असे होईल. 22कोरेश पारसाचा राजा असताना पहिल्याच वर्षी परमेश्वराने त्यास एक फर्मान काढायला प्रेरणा दिली. यिर्मयाच्या तोंडून वदवलेली भविष्यवाणी प्रत्यक्षात येण्यासाठी परमेश्वराने त्यालाही स्फूर्ती दिली. कोरेशने आपल्या दूताकरवी राज्यभर असा संदेश पाठवला की, 23“पारसचा राजा कोरेश म्हणतो; स्वर्गातील परमेश्वर देव याने मला या पृथ्वीचा सम्राट केले आहे. त्याच्यासाठी यहूदातील यरूशलेमेमध्ये मंदिर बांधण्याची जबाबदारीही माझ्यावर सोपवली आहे. आता तुमच्यापैकी देवाला मानणारे सर्वजण निर्धास्तपणे यरूशलेमेला जाऊ शकता, परमेश्वर देव तुमच्याबरोबर असो.”

प्रतिसाद स्तोत्र

स्तोत्र 137:1–6

1आम्ही बाबेलाच्या नद्यांजवळ खाली बसलो; आणि जेव्हा आम्ही सियोनेविषयी विचार केला तेव्हा रडलो. 2तेथील वाळुंजावर आम्ही आमच्या वीणा टांगल्या. 3तेथे आम्हास पकडणाऱ्यांनी आम्हास गाणी गावयाला सांगितले आणि आमची थट्टा करणाऱ्यांनी आम्ही त्यांच्यासाठी करमणूक करावी म्हणून आम्हांस म्हणाले, सीयोनाच्या गाण्यांतले एखादे गाणे आम्हांला गाऊन दाखवा. 4परक्या देशात आम्ही परमेश्वराचे गाणे कसे गावे? 5हे यरूशलेमे, मी जर तुला विसरलो, तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो. 6जर मी तुला विसरलो, जर मी यरूशलेमेला आपल्या आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक मानले नाही तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो.

दुसरे वाचन

इफि 2:4–10

4पण देव खूप दयाळू आहे कारण त्याच्या महान प्रीतीने त्याने आमच्यावर प्रेम केले. 5आम्ही आमच्या अपराधामुळे मरण पावलेले असता त्याने आम्हास ख्रिस्ताबरोबर नवीन जीवन दिले. तुमचे तारण कृपेने झाले आहे. 6आणि आम्हास त्याच्याबरोबर उठवले आणि स्वर्गीय स्थानात ख्रिस्त येशूसोबत बसविले. 7यासाठी की, येशू ख्रिस्तामध्ये त्याची आम्हांवरील प्रीतीच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याची महान कृपा दाखविता यावी. 8कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्याद्वारे तुम्हास शिक्षेपासून वाचवले आहे आणि ते आमच्याकडून झाले नाही, तर हे दान देवापासून आहे, 9आपल्या कर्मामुळे हे झाले नाही यासाठी कोणी बढाई मारू नये. 10कारण आम्ही देवाच्या हाताची कृती आहोत जी ख्रिस्तामध्ये आहे जेणेकरूण आम्ही जीवनात चांगली कामे करावी जे देवाने आरंभीच योजून ठेवले होते.

शुभवर्तमान

योहा 3:14–21

14जसा मोशेने अरण्यात पितळेचा सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, 15यासाठी की, जो कोणी विश्वास ठेवतो त्यास त्याच्याठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. 16कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्यास सार्वकालिक जीवन मिळावे. 17कारण देवाने पुत्राला जगात पाठवले ते जगाचा न्याय करायला नाही, पण त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. 18जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय होणार नाही, पण जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय झालेलाच आहे; कारण, त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. 19आणि न्याय हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे; पण मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्ये वाईट होती; 20कारण जो कोणी वाईट कृत्ये करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. 21पण जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो यासाठी की, आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे.”

आजचे संत

सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क