Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › फेब्रुवारी 2027 › 15 फेब्रुवारी

कॅथलिक दिनदर्शिका

दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 15 फेब्रुवारी 2027

सोमवार · उपवासकाळाचा पहिला आठवडा

सण आणि संत

उपवासकाळाच्या पहिल्या आठवड्याचा सोमवार

आठवड्याचा दिवस · उपासनेचा रंग: जांभळा

दिवसाची वाचने

पहिले वाचन

लेवी 19:1–2, 11–18

1परमेश्वर मोशेला म्हणाला, 2सर्व इस्राएलाच्या मंडळीतील लोकांस सांग की, मी तुमचा देव परमेश्वर पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र असलेच पाहिजे. 11तुम्ही चोरी करु नये. कोणाला फसवू नये. एकमेकाशी कपटाने बोलू नये. 12तुम्ही माझ्या नावाने खोटी शपथ वाहून आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नये. मी परमेश्वर आहे! 13आपल्या शेजाऱ्यावर जुलूम करु नका व त्यास लुबाडू नका; मजुराची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नका. 14बहिऱ्याला शिव्याशाप देऊ नका; आंधळ्याने ठोकर लागून पडावे म्हणून एखाद्या वस्तूचे अडखळण त्याच्या वाटेत ठेवू नका; पण आपल्या देवाचा मान राखा त्याचे भय बाळगा. मी परमेश्वर आहे! 15न्यायनिवाडा करताना कोणावर अन्याय करु नका तर योग्य न्याय द्या. न्यायदान करताना गरीब लोक व वजनदार लोक ह्याना विशेष मर्जी दाखवू नका. आपल्या शेजाऱ्याचा न्याय करताना योग्य तोच न्याय द्या. 16आपल्या लोकांमध्ये चहाड्या करीत इकडे तिकडे फिरू नका, आपल्या शेजाऱ्याचा जीव धोक्यात येईल असे काही करु नका. मी परमेश्वर आहे! 17आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगू नका; आपल्या शेजाऱ्याने चुकीचे काही कृत्य केल्यास त्याची कान उघडणी करावी, परंतु त्याच्या अपराधामध्ये सहभागी होऊ नये. 18लोकांनी तुमचे वाईट केलेले विसरून जावे, त्याबद्दल सूड घेण्याचा प्रयत्न करु नका तर आपल्या शेजाऱ्यावर स्वत: सारखी प्रीती करा. मी परमेश्वर आहे!

प्रतिसाद स्तोत्र

स्तोत्र 19:7–9, 14

7परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते जीवाला पुर्नजीवित करणारे आहे. परमेश्वराचे नियम विश्वसनीय आहेत, ज्यांना अनुभव नाही त्यांना शहाणपण देणारे आहे. 8परमेश्वराच्या सूचना खऱ्या आहेत. जे हृदयाला हर्षीत करतात. परमेश्वराच्या कराराचे नियम शुद्ध आहेत, ते डोळे प्रकाशवनारे आहेत. 9परमेश्वराची भीती शुद्ध आहे, ती सर्वकाळ टिकणारे आहे, परमेश्वराचे नियम खरे आहेत, आणि सर्व न्यायी आहेत. 14माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या हृदयाचे विचार तुझ्यासमोर मान्य असोत. परमेश्वरा, तू माझा खडक आहेस, मला तारणारा तूच आहेस.

शुभवर्तमान

मत्त 25:31–46

31मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या देवदूतांसह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी राजासनावर बसेल. 32मग सर्वं राष्ट्रे त्याच्यासमोर एकत्र जमतील. त्यांना तो एकमेकांपासून विभक्त करील. ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढरे शेरडांपासून वेगळी करतो. 33तो मेंढरांना आपल्या उजवीकडे बसवील पण शेरडांना तो डावीकडे बसवील. 34मग राजा जे त्याच्या उजवीकडे आहेत त्यांना म्हणेल, या, जे तुम्ही माझ्या पित्याचे धन्यवादित आहात! हे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी तयार केले आहे त्या राज्याचे वतनदार व्हा. 35हे तुमचे राज्य आहे, कारण जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले. मी तहानेला होतो तेव्हा तुम्ही मला प्यावयास दिले. मी परका होतो आणि तुम्ही मला आत घेतले 36मी उघडा होतो तेव्हा तुम्ही मला कपडे दिले. मी आजारी होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली. मी तुरूंगात होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. 37मग जे नीतिमान आहेत ते उत्तर देतील, प्रभू आम्ही तुला केव्हा भुकेला व तहानेला पाहिले आणि तुला खायला आणि प्यायला दिले? 38आम्ही तुला परका म्हणून कधी पाहिले आणि तुला आत घेतले किंवा आम्ही तुला केव्हा उघडे पाहिले व कपडे दिले? 39आणि तू आजारी असताना आम्ही तुला कधी भेटायला आलो? किंवा तुरूंगात असताना कधी तुझ्याकडे आलो? 40मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हास खरे सांगतो येथे असलेल्या माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले, तर ते तुम्ही मलाच केले. 41मग राजा जे आपल्या डाव्या बाजूला आहेत त्यांस म्हणेल, माझ्यापासून दूर जा. तुम्ही शापित आहात, सार्वकालिक अग्नीत जा, हा अग्नी सैतान व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे. 42ही तुमची शिक्षा आहे कारण मी भुकेला होतो पण तुम्ही मला काही खायला दिले नाही, मी तहानेला होतो पण तुम्ही मला काही प्यावयास दिले नाही. 43मी प्रवासी असता माझा पाहुणचार केला नाही. मी वस्त्रहीन होतो. पण तुम्ही मला कपडे दिले नाहीत. मी आजारी आणि तुरूंगात होतो पण तुम्ही माझी काळजी घेतली नाही. 44मग ते लोकसुद्धा त्यास उत्तर देतील, प्रभू आम्ही कधी तुला उपाशी किंवा तहानेले पाहिले किंवा प्रवासी म्हणून कधी पाहिले? किंवा वस्त्रहीन, आजारी किंवा तुरूंगात कधी पाहिले आणि तुला मदत केली नाही? 45मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हास खरे सांगतोः माझ्या अनुयायांतील लहानातील लहानाला काही करण्याचे जेव्हा जेव्हा तुम्ही नाकारले, तेव्हा तेव्हा ते तुम्ही मला करण्याचे नाकारले. 46“मग ते अनीतिमान लोक सार्वकालिक शिक्षा भोगण्यास जातील, पण नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगण्यास जातील.”

सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क