Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › जानेवारी 2027 › 2 जानेवारी

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 20 डिसेंबर (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 2 जानेवारी 2027

शनिवार · पेन्टेकॉस्टनंतरचा 31वा आठवडा · स्वर 5

सण आणि संत

जन्मसणापूर्वीचा शनिवार

नाताळचा उपवास

उपवास: तेलासह

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

प्रेषितांचे पत्र

कल 1:3–6

3आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तेव्हा आम्ही नित्य देवाचे, म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या पित्याचे उपकार मानतो 4कारण ख्रिस्त येशूमधील तुमच्या विश्वासाविषयी आणि सर्व पवित्र जनांविषयी तुमच्यात असलेल्या प्रीतीविषयी आम्ही ऐकले आहे. 5जी आशा तुमच्यासाठी स्वर्गात ठेवली आहे या आशेविषयी, तुम्ही प्रथम, सुवार्तेच्या सत्यवचनात ऐकले. 6ती सुवार्ता तुमच्यात आली, तुम्ही ऐकलीत आणि तुम्हास सत्याद्वारे देवाच्या कृपेचे ज्ञान झाले, त्या दिवसापासून, ती जशी सार्‍या जगात तशी ती तुमच्यात फळ देत आहे आणि वाढत आहे.

प्रेषितांचे पत्र (ख्रिस्तजन्मापूर्वीच्या शनिवारसाठी)

गल 3:8–12

8आणि देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरवणार या पूर्वज्ञानामुळे शास्त्रलेखाने, अब्राहामाला पूर्वीच शुभवर्तमान सांगितले की, ‘तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल.’ 9तर मग जे विश्वास ठेवतात त्यांना विश्वासू अब्राहामाबरोबर आशीर्वाद दिला गेला आहे. 10कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके शापाच्या अधीन आहे कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व पाळण्यास जो टिकून राहत नाही तो शापित आहे.’ 11नियमशास्त्राने कोणीही देवासमोर नीतिमान ठरत नाही, हे उघड आहे; कारण ‘नीतिमान विश्वासाने जगेल.’ 12आणि नियमशास्त्र तर विश्वासाचे नाही पण ‘जो त्यातील कृत्ये आचरतो तो त्यांच्यायोगे जगेल.’

शुभवर्तमान

लूक 14:1–11

1एका शब्बाथ दिवशी तो परूश्यांच्या अधिकाऱ्यांपैकी एकाच्या घरी जेवावयास गेला, तेव्हा तेथे जमलेले लोक येशूवर बारकाईने नजर ठेवून होते. 2आणि तेथे त्याच्यासमोर जलोदर झालेला एक मनुष्य होता. 3येशूने नियमशास्त्र शिक्षकांना व परूश्यांना विचारले, “शब्बाथ दिवशी बरे करणे नियमशास्त्राला धरुन आहे की नाही?” 4परंतु ते गप्पच राहिले. तेव्हा येशूने त्या आजारी मनुष्यास धरुन त्यास बरे केले व त्यास पाठवून दिले. 5मग तो त्यांना म्हणाला, “जर तुमच्यापैकी एखाद्याला एक मुलगा किंवा एक बैल आहे व तो विहीरीत पडला, तर शब्बाथ दिवशी तुम्ही त्यास ताबडतोब बाहेर काढणार नाही काय?” 6आणि या प्रश्नाला उत्तर देणे त्यांना जमले नाही. 7नंतर, आमंत्रित पाहुणे स्वतःसाठी मानाच्या जागा कसे निवडून घेत होते हे पाहून, त्याने त्यांना एक दाखला सांगितला, तो म्हणाला, 8“जेव्हा एखादा तुम्हास लग्नाच्या मेजवानीला आमंत्रित करील, तेव्हा मानाच्या आसनावर बसू नका कारण तुमच्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या मनुष्यास त्याने कदाचित आमंत्रण दिले असेल. 9मग ज्याने तुम्हा दोघांना आमंत्रित केले आहे तो येईल आणि तुम्हास म्हणेल, या मनुष्यास तुझी जागा दे. मग अपमानित होऊन तुम्हास खालच्या जागी बसावे लागेल. 10पण जेव्हा तुम्हास आमंत्रित केलेले असेल, तेव्हा जा आणि अगदी खालच्या जागी जाऊन बसा. यासाठी की, जेव्हा यजमान येईल, तेव्हा तो तुम्हास म्हणेल, मित्रा, वरच्या आसनावर येऊन बस. तेव्हा तुझ्या पाहुण्यांसमोर तुझे गौरव होईल. 11कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल व जो स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल.”

शुभवर्तमान (ख्रिस्तजन्मापूर्वीच्या शनिवारसाठी)

लूक 13:18–29

18मग तो म्हणाला, “देवाचे राज्य कशासारखे आहे? आणि मी त्यास कशाची उपमा देऊ. 19देवाचे राज्य एका मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो मोहरीचा दाणा एका मनुष्याने घेतला व आपल्या बागेत लावला व ते वाढून त्याचे मोठे झाड झाले आणि आकाशातील पाखरांनी त्याच्या फांद्यांवर घरटी बांधली.” 20तो पुन्हा म्हणाला, “मी देवाच्या राज्याला आणखी कशाची उपमा देऊ? 21ते खमिरासारखे पिठ किंवा इतर पदार्थांना आंबविण्यासाठी उपयोगात येणारा पदार्थ आहे. एका स्त्रीने तीन मापे पिठात खमिर मिसळले आणि ते सर्व खमिरामुळे फुगले.” 22येशू यरूशलेम शहराच्या दिशेने वाटचाल करीत असता, गांवागांवातून आणि खेड्यापाड्यांतून तो लोकांस शिकवीत होता. 23कोणीतरी त्यास विचारले, “प्रभू, अगदी थोड्याच लोकांचे तारण होईल का?” तो त्यांना म्हणाला, 24“अरुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करा, कारण मी तुम्हास सांगतो की, पुष्कळजण आत येण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना ते शक्य होणार नाही. 25घराच्या मालकाने उठून दरवाजा बंद केल्यावर, तुम्ही बाहेर उभे रहाल व दरवाजा ठोठवाल आणि म्हणाला; प्रभू, आम्हासाठी दरवाजा उघडा! परंतु तो तुम्हास उत्तर देईल, तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही. 26नंतर तुम्ही म्हणाल, आम्ही तुमच्याबरोबर जेवलो, आम्ही तुमच्याबरोबर प्यालो, आमच्या रस्त्यावर तुम्ही शिक्षण दिले! 27आणि तो तुम्हास म्हणेल, तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही, अन्याय करणाऱ्यांनो तुम्ही सर्व माझ्यापासून दूर व्हा. 28तेथे रडणे व दात खाणे चालेल, तेव्हा तुम्ही अब्राहामाला आणि इसहाकाला आणि याकोबाला आणि सर्व संदेष्ट्यांना देवाच्या राज्यामध्ये पाहाल, पण तुम्ही स्वतः मात्र बाहेर टाकलेले असाल. 29आणि लोक पूर्वेकडून, पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून येतील व देवाच्या राज्यात मेजासभोवती आपापल्या जागेवर बसतील.

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 20 डिसेंबर म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 2 जानेवारी. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क