Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › ऑक्टोबर 2026 › 25 ऑक्टोबर

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 12 ऑक्टोबर (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 25 ऑक्टोबर 2026

रविवार · स्वर 4

सण आणि संत

पेन्टेकॉस्टनंतरचा 21वा रविवार

सातव्या विश्वव्यापी परिषदेचे पिता

उपवास

उपवास नाही

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

संध्याप्रार्थना: वाचन

उत्प 14:14–20

14जेव्हा अब्रामाने ऐकले की, त्याच्या नातेवाइकांना शत्रूंनी पकडून नेले आहे तेव्हा त्याने आपल्या घरी जन्मलेली, लढाईचे शिक्षण घेतलेली तीनशे अठरा माणसे घेऊन सरळ दान नगरापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला. 15त्याने रात्री त्याचे लोक त्यांच्याविरुद्ध विभागले आणि त्यांच्यावर हल्ला केला आणि दिमिष्काच्या डावीकडे होबापर्यंत त्यांचा पाठलाग केला. 16अब्रामाने सगळी मालमत्ता आणि त्याचा नातेवाइक लोट आणि त्याच्या वस्तू, त्याचप्रमाणे स्त्रिया आणि इतर लोक यांना परत आणले. 17मग कदार्लागोमर व त्याच्याबरोबरचे राजे यांचा पराभव केल्यावर अब्राम परत आला तेव्हा सदोमाचा राजा शावेच्या खोऱ्यात त्यास भेटायला बाहेर आला. या खोऱ्याला राजाचे खोरे असे म्हणतात. 18देवाचा याजक असलेला शालेमाचा राजा मलकीसदेक भाकर व द्राक्षरस घेऊन अब्रामाला भेटण्यास आला. हा परात्पर देवाचा याजक होता. 19त्याने अब्रामाला आशीर्वाद देऊन म्हटले, “अब्रामा, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता परात्पर देव तुला आशीर्वाद देवो. 20परात्पर देव ज्याने तुझे शत्रू तुझ्या हाती दिले तो धन्यवादित असो.” तेव्हा अब्रामाने त्यास सर्वाचा दहावा भाग दिला.

संध्याप्रार्थना: वाचन

अनु 1:8–11, 15–17

8पाहा हा प्रदेश मी तुम्हास देऊ करत आहे जा आणि त्यावर ताबा मिळवा अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना व त्यांच्यानंतर त्यांच्या वंशजांना हा प्रदेश देण्याचे परमेश्वराने वचन दिले होते. 9तेव्हा मी तुम्हास म्हणालो होतो की “मी एकटा तुमचा सांभाळ करू शकणार नाही. 10आणि आता तर तुमची संख्या कितीतरी वाढली आहे परमेश्वर देवाच्या कृपेने ती वाढून आकाशातील ताऱ्यांइतकी झाली आहे. 11तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर, ह्याच्या कृपेने आणखी वाढून आताच्या हजारपट होवो आणि त्याने कबूल केल्याप्रमाणे त्याचा आशीर्वाद तुम्हास मिळो. 15म्हणून मी त्या ज्ञानी व अनुभवी व्यक्तींना तुमचे प्रमुख म्हणून नेमले. हजारांच्या समूहावर एक अधिकारी, शंभरांवर एक, पन्नासांवर, दहावर तसेच घराण्यावर अशा या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. 16या न्यायाधीशांना मी त्यावेळी सांगितले की तुमच्या भाऊबंदांतील वाद नीट ऐकून घ्या. निवाडा करताना पक्षपात करू नका मग तो वाद दोन भावांमधला असो की एखादा मनुष्य व त्याचा भाऊबंद व उपरी यांच्यातील असो. नीतिने न्याय करा. 17न्याय करताना कोणालाही कमी लेखू नका. लहान मोठ्यांचे सारखे ऐकून घ्या. कोणाचे तोंड पाहून घाबरू नका; कारण न्याय करणे देवाचे काम आहे. एखादे प्रकरण तुम्हास विशेष अवघड वाटले तर ते माझ्याकडे आणा. मी त्याचा निवाडा करीन.

संध्याप्रार्थना: वाचन

अनु 10:14–21

14सर्वकाही तुमचा देव परमेश्वर ह्याचे आहे. आकाश, आकाशापलीकडचे आकाश, पृथ्वी व पृथ्वीवरचे सर्वकाही परमेश्वर देवाचे आहे. 15परमेश्वराचे तुमच्या पूर्वजांवर फार प्रेम होते. त्या प्रेमाखातीर त्याने इतरांना वगळून तुम्हास आपले मानले. आजही वस्तूस्थिती तिच आहे. 16तेव्हा हट्टीपणा सोडा, आपली अंत:करणे परमेश्वरास द्या. 17कारण परमेश्वर तुमचा देव आहे, तो देवांचा देव व प्रभूंचा प्रभू आहे. तो महान व भययोग्य परमेश्वर आहे. तो विस्मयकारी आहे. त्यास सर्वजण सारखेच आहेत. तो पक्षपात करत नाही की लाच घेत नाही. 18अनाथांना, विधवांना इतकेच काय शहरात आलेल्या परकीयानांही अन्नवस्त्र पुरवून आपले प्रेम दाखवतो. 19म्हणून तुम्ही परक्यांशी प्रेमाने वागले पाहिजे. कारण मिसर देशात तुम्हीही उपरेच होतात. 20तुम्ही फक्त तुमचा देव परमेश्वर याचेच भय धरा व त्याचीच सेवा करा, त्याच्याबद्दल आदर बाळगा. त्यास धरुन राहा, शपथ वाहाताना त्याच्याच नावाने शपथ घ्या. 21फक्त परमेश्वराची स्तुती करा. तो तुमचा देव आहे. त्याने केलेले चमत्कार आणि भयानक थोर कृत्ये तुम्ही प्रत्यक्ष पाहिली आहेत.

प्रातःप्रार्थनेचे 10वे शुभवर्तमान

योहा 21:1–14

1आणि या यानंतर पुन्हा तिबिर्याच्या सरोवराजवळ येशूने शिष्यांना स्वतःस प्रकट झाला; आणि अशाप्रकारे स्वतःस प्रकट केले. 2शिमोन पेत्र व ज्याला दिदुम म्हणत तो थोमा, गालील प्रांतातील काना नगरातील नथनेल व जब्दीचे पुत्र आणि त्याच्या शिष्यांतील दुसरे दोघे जण हे बरोबर होते. 3शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, “मी मासे धरावयला जातो.” ते त्यास म्हणतात, “आम्ही पण तुझ्याबरोबर येतो.” तेव्हा ते निघून तारवात चढले आणि त्या रात्री त्यांनी काहीही धरले नाही. 4पण आता पहाट होते वेळी येशू समुद्र किनार्‍याजवळ उभा होता, पण तो येशू होता हे शिष्यांना समजले नाही. 5तेव्हा येशूने त्यांना म्हटले, “मुलांनो, तुमच्याजवळ काही खावयाला आहे काय?” ते त्यास म्हणाले, “नाही.” 6आणि तो त्यांना म्हणाला, “तारवाच्या उजवीकडे जाळे टाका आणि तुम्हास मिळेल.” म्हणून त्यांनी टाकले आणि माशांच्या घोळक्यामुळे ते त्यांना आता ओढवेना. 7तेव्हा ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, “तो प्रभू आहे.” शिमोन पेत्राने ऐकले की, तो “प्रभू आहे, प्रभू आहे” तेव्हा तो उघडा असल्यामुळे (त्याने बाहेरील वस्त्र, झगा, न घातल्यामुळे) त्याने कमरेला झगा गुंडाळला आणि सरोवरात उडी घेतली. 8आणि दुसरे शिष्य त्या लहान मचव्याने ते माशांचे जाळे ओढीत ओढीत आले कारण ते किनार्‍यापासून फार दूर नव्हते, पण सुमारे दोनशे हातावर होते. 9तेव्हा ते किनार्‍यावर बाहेर आल्यावर तेथे कोळशांचा विस्तव आणि त्यावर ठेवलेली मासळी आणि भाकरी पाहिली. 10येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही आता धरलेल्या मासळीमधून काही आणा.” 11तेव्हा शिमोन पेत्राने मचव्यावर चढून एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनार्‍यावर ओढून आणले. ते तितके असतानाही जाळे फाटले नाही. 12येशू त्यांना म्हणाला, “या, न्याहरी करा.” कारण तो प्रभू आहे हे त्यांना समजले म्हणून आपण कोण आहात हे त्यास विचारावास शिष्यांतील कोणी धजला नाही. 13तेव्हा येशूने भाकर घेतली आणि त्यांना दिली; तशीच मासळी दिली. 14येशू मरण पावलेल्यातून उठल्यानंतर त्याची शिष्यांना प्रकट व्हायची ही तिसरी वेळ.

प्रेषितांचे पत्र

गल 2:16–20

16तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे ठरतो, हे ओळखून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला; ह्यासाठी की, विश्वासाने मनुष्य नीतिमान ठरवला जातो, म्हणून आम्हीही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला; म्हणजे आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी पाळून नाही, कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी मनुष्यजातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही. 17पण ख्रिस्तात नीतिमान ठरवले जाण्यास पाहत असता जर आपणदेखील पापी आढळलो तर ख्रिस्त पापाचा सेवक आहे काय? कधीच नाही. 18कारण मी जे पाडले आहे ते पुन्हा उभारले तर मी स्वतःला नियमशास्त्र मोडणारा ठरवीन. 19कारण मी नियमशास्त्राद्वारे नियमशास्त्राला मरण पावलो आहे, ह्यासाठी की, मी देवाकरता जगावे. 20मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जगणे आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्याद्वारे आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले.

प्रेषितांचे पत्र (पित्यांसाठी)

इब्री 13:7–16

7ज्यांनी तुम्हास देवाचे वचन दिले त्या पुढाऱ्यांची आठवण ठेवा. त्यांच्या जीवनातील आचार पाहा व त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा. 8येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. 9विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका कारण ज्यांकडून आचणाऱ्यांना लाभ नाही अशा अन्नाच्या विधीने नव्हे, तर देवाच्या कृपेने आपली अंतःकरण स्थिर केलेले असणे चांगले. 10ज्या वेदीवरील अन्न खाण्याचा किंवा सहभागी होण्याचा अधिकार मंडपात सेवा करणाऱ्यांनाही नाही, अशी वेदी आपल्याकडे आहे. 11यहूदी मुख्य याजक प्राण्यांचे रक्त परमपवित्रस्थानात पापाचे अर्पण म्हणून घेऊन जातात. परंतु केवळ प्राण्यांची शरीरे छावणीच्या बाहेर नेऊन जाळतात. 12म्हणून येशूने सुद्धा स्वतःच्या रक्ताने लोकांस पवित्र करावे यासाठी नगराच्या वेशीबाहेर मरण सोसले, 13म्हणून आपण छावणीच्या बाहेर जाऊ आणि येशूच्या अपमानाचे वाटेकरी होऊ. 14कारण स्थायिक असे नगर आपल्याला येथे नाही तरी भविष्यकाळात येणारे जे नगर आहे त्याच्याकडे आपण पाहत आहोत. 15म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या “ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण येशूद्वारे देवाला नित्य अर्पण करावा.” 16आणि इतरांसाठी चांगले ते करण्यास आणि दानधर्म करण्यास विसरू नका कारण अशा अर्पणाने देवाला संतोष होतो.

शुभवर्तमान

लूक 7:11–16

11आणि दुसऱ्या दिवशी असे झाले की, तो नाईन नावाच्या नगराकडे जात होता आणि त्याचे पुष्कळ शिष्य व मोठा समुदाय हे त्याच्याबरोबर जात होते. 12जसा तो गावाच्या वेशीजवळ आला तेव्हा पाहा कोणाएका मरण पावलेल्या मनुष्यास बाहेर घेऊन जात होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता व ती विधवा होती; आणि गावातील बरेच लोक तिच्याबरोबर होते. 13तेव्हा तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला “रडू नकोस” 14मग जवळ जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला; तेव्हा खांदेकरी स्थिर उभे राहीले आणि तो म्हणाला, “मुला, मी तुला सांगतो, उठ!” 15आणि तो मरण पावलेला उठून बसला व बोलू लागला; मग येशूने त्यास त्याच्या आईजवळ दिले. 16तेव्हा सर्वांना भय वाटले आणि ते देवाला गौरव करीत म्हणाले, “आमच्यामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे”

शुभवर्तमान (पित्यांसाठी)

योहा 17:1–13

1“या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे पित्या, वेळ आली आहे; पुत्राने तुझे गौरव करावे म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर. 2जे तू त्यास दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू त्यास सर्व मनुष्यांमात्रावर अधिकार दिला आहेस. 3सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच, खरा देव त्या तुला आणि ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे. 4जे तू काम मला करावयाला दिलेस ते पूर्ण करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे. 5तर आता, हे माझ्या पित्या, हे जग होण्याआधी तुझ्याबरोबर मला जे गौरव होते त्याच्यायोगे तू आपणा स्वतःबरोबर माझे गौरव कर. 6जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रकट केले. ते तुझे होते आणि ते तू मला दिलेस आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. 7आता त्यांना समजले आहे की, तू ज्या गोष्टी मला दिल्यास त्या सर्व तुझ्यापासून आहेत. 8कारण तू मला जी वचने दिलीस ती मी त्यांना दिली आहेत; ती त्यांनी स्वीकारली, मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले आणि तू मला पाठवले. असा त्यांनी विश्वास ठेवला. 9त्यांच्यासाठी मी विनंती करतो, मी जगासाठी विनंती करीत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी मी विनंती करतो, कारण ते तुझे आहेत. 10जे माझे ते सर्व तुझे आहे आणि जे तुझे ते सर्व माझे आहे आणि त्यांच्याठायी माझे गौरव झाले आहे. 11आणि आता, यापुढे मी जगात नाही; पण ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र पित्या, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे. 12जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावात मी त्यांना राखले; मी त्यांचा सांभाळ केला आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचा नाश झाला नाही. हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले. 13पण आता मी तुझ्याकडे येत आहे आणि माझा आनंद त्यांच्याठायी परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात या गोष्टी बोलतो.

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 12 ऑक्टोबर म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 25 ऑक्टोबर. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क