Bible Explorer अ‍ॅप मिळवा

बायबल › गीतरत्न › 8

IRV · अध्याय 8 / 8

गीतरत्न 8

1माझ्या आईचे स्तनपान केलेल्या माझ्या बंधूसारखा तू असतास तर किती बरे होते. तू मला बाहेर भेटल्यास मी तुझे चुंबन घेतले असते आणि मग माझा कोणीही अपमान केला नसता.

2मी तुला माझ्याबरोबर चालवून आईच्या घरात आणले असते. तू मला शिकवले असते. मी तुला मसाला घातलेला द्राक्षरस आणि माझ्या डाळिंबाचा रस प्यायला दिला असता.

3त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली असता आणि त्याचा उजवा हात मला आलिंगन देत असता.

4यरूशलेमेच्या कन्यांनो, मी तुम्हास शपथ घालते. माझ्या प्रेमानंदात व्यत्यय आणू नका. समाधान होईपर्यंत राहू द्या.

5आपल्या प्रियकरावर टेकत रानातून येणारी ही स्त्री कोण आहे? मी तुला सफरचंदाच्या झाडाखाली उठवले, तेथे तुझ्या आईने तुझे गर्भधारण केले, तेथे तिने तुला जन्म दिला, ती तुला प्रसवली.

6तू आपल्या हृदयावर शिक्क्याप्रमाणे, आपल्या बाहूवर शिक्क्यासारखी मला ठेव. कारण प्रेम मृत्यूसारखेच शक्तीशाली आहे. प्रेमसंशय मृतलोकासारखा कठोर आहे. त्याची ज्वाला, अग्नीज्वालेसारखी, किंबहुना प्रदीप्त केलेला तो अग्नीच आहे.

7असले प्रेम महाजलांच्यानेही विझवणार नाही. महापुरांनी तिला बुडवून टाकिता येणार नाही. जरी मनुष्याने प्रेमासाठी आपल्या घरची सगळी संपत्ती दिली तरी, ती त्यापुढे अगदी तुच्छ होय.

8आम्हास एक लहान बहीण आहे, आणि तिच्या वक्षस्थळांची अजून पूर्ण वाढ झालेली नाही. आमच्या या बहिणीस लग्नाची मागणी होईल त्या दिवशी आम्ही काय करावे?

9ती जर भिंत असती तर, आम्ही तिच्याभोवती चांदीचा मनोरा उभारला असता. ती जर दार असती तर, तिच्या भोवती आम्ही गंधसरूच्या फळ्यांनी झाकले असते.

10मी भिंत आहे आणि माझी वक्षस्थळे बुरूजासारखे होते. म्हणून मी आपल्या प्रियकराच्या दृष्टीने पूर्ण समाधानी आहे.

11बाल-हामोन येथे शलमोनाचा एक द्राक्षाचा मळा होता. त्याने तो मळा राखणाऱ्यांच्या स्वाधीन केला, त्याच्या फळांसाठी प्रत्येकाला एक हजार शेकेल द्यावे लागत.

12माझाही एक द्राक्षीचा मळा आहे. तो माझाच आहे तो माझ्यापुढे आहे. हे शलमोना, त्याचे हजार तुझे होतील, आणि दोनशे जो राखतात त्यांचे होतील.

13जी तू बागेत राहतेस. त्या तुझ्या मैत्रिणी तुझा आवाज ऐकत आहेत. मलाही तो ऐकू दे!

14माझ्या प्रियकरा त्वरा कर. सुगंधी झाडांच्या पर्वतावर हरीणासारखा, तरुण हरीणीच्या पाडसासारखा तू हो.

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRV, 2019) · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. (मजकूर बदललेला नाही; तळटीपा आणि शीर्षके वगळली आहेत) · eBible.org