मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › डिसेंबर 2027 › 25 डिसेंबर
कॅथलिक दिनदर्शिका
दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 25 डिसेंबर 2027
शनिवार · नाताळकाळ
सण आणि संत
प्रभूचा जन्म (नाताळ)
महासण · उपासनेचा रंग: पांढरा
दिवसाची वाचने
पहिले वाचन
7“शांती प्रस्थापित झाली आहे चांगुलपणा आला आहे. तारण झाले आहे. सियोन, तुमचा देव हाच राजा आहे.” अशी जो घोषणा करतो, त्याचे पाय पर्वतांवर किती सुंदर आहेत. 8तुझ्या पाहारेकऱ्यांचा उंचावलेला आवाज ऐक, ते एकत्र येऊन हर्षाने ओरडत आहेत. कारण त्यांच्यातील प्रत्येकाने परमेश्वरास सियोनेला परत येताना पाहिले आहे. 9यरूशलेमेच्या ओसाड स्थळांनो, आनंदाने एकत्र गायन करीत सुटा, कारण परमेश्वराने त्याच्या लोकांचे सांत्वन केले आहे. त्याने यरूशलेमेला खंडूण घेतले आहे. 10परमेश्वराने सर्व राष्ट्रांसमोर आपला पवित्र भूज दिसण्याजोगा केला आहे. सर्व पृथ्वी आमच्या देवाचे तारण पाहील.
प्रतिसाद स्तोत्र
1परमेश्वरास नवीन गीत गा, कारण त्याने आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत; त्याने आपल्या उजव्या हाताने आणि आपल्या पवित्र बाहूने आम्हास विजय दिला आहे. 2परमेश्वराने आपले तारण कळवले आहे; त्याने सर्व राष्ट्रांच्यासमोर आपले न्यायीपण उघडपणे दाखवले आहे. 3त्याने इस्राएलाच्या घराण्यासाठी आपली निष्ठा आणि विश्वासाचा करार यांची आठवण केली; पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे. 4अहो सर्व पृथ्वी, परमेश्वराचा जयजयकार करा; उच्च स्वराने आणि आनंदाने गा, स्तुतिगायन करा. 5परमेश्वराचे स्तुतिगान वीणेवर करा, वीणेवर मधुर स्वराने गायन करा. 6कर्णा आणि शिंगाच्या आवाजाने, परमेश्वर राजासमोर आनंदाने जयघोष करा.
दुसरे वाचन
1देव प्राचीन काळांमध्ये आपल्या पूर्वजांशी संदेष्ट्यांच्या द्वारे अनेक वेळेस वेगवेगळ्या मार्गांनी बोलला, 2परंतु या शेवटच्या दिवसात तो आपल्याशी त्याच्या पुत्राद्वारे बोलला आहे, त्याने पुत्राला सर्व गोष्टींचा वारस म्हणून नेमले. देवाने पुत्राकरवीच विश्व निर्माण केले. 3पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप असा आहे. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो. पुत्राने लोकांस त्यांच्या पापांपासून शुद्ध केले, नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूला बसला. 4तो देवदूतांपेक्षा श्रेष्ठ झाला. त्याचे नावसुद्धा जे वारशाने त्यास मिळाले ते त्यांच्या नावापेक्षा श्रेष्ठ आहे. 5देवाने कोणत्याही देवदूताला म्हणले नाही कीः “तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता झालो आहे?” आणि पुन्हा, ‘मी त्याचा पिता होईन, व तो माझा पुत्र होईल?’ 6आणि पुन्हा, देव जेव्हा त्याच्या पुत्राला जगामध्ये आणतो, तो म्हणतो, “देवाचे सर्व देवदूत त्यास नमन करोत.”
शुभवर्तमान
1प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. 2तोच प्रारंभी देवासह होता. 3सर्वकाही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याने केल्यावांचून झाले नाही. 4त्याच्यामध्ये जीवन होते; आणि ते जीवन मनुष्यमात्राचा प्रकाश होते. 5तो प्रकाश अंधारात प्रकाशतो; तरी अंधाराने त्यास स्वीकारले नाही. 6देवाकडून पाठविलेला एक मनुष्य प्रकट झाला; त्याचे नाव योहान. 7तो साक्षीकरीता, त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यावी म्हणून आला; यासाठी की सर्वांनी त्याच्याद्वारे विश्वास ठेवावा. 8योहान तो प्रकाश नव्हता, पण त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यावी म्हणून आला. 9जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्यास प्रकाशित करतो तो जगात येणार होता. 10तो जगात होता व जग त्याच्याद्वारे निर्माण झाले, तरी जगाने त्यास ओळखले नाही. 11जे त्याचे स्वतःचे त्यांच्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. 12पण जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवला, तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. 13त्यांचा जन्म रक्त किंवा देहाची इच्छा किंवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला. 14शब्द देह झाला व त्याने आमच्यात वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहीले, ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे कृपेने व सत्याने परिपूर्ण होते. 15योहान त्याच्याविषयी साक्ष देतो आणि मोठ्याने म्हणतो, “ज्याच्याविषयी मी सांगितले की, माझ्यामागून जो येत आहे तो माझ्यासमोर झाला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता, तो हाच आहे.” 16त्याच्या पूर्णतेतून आपल्या सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे. 17कारण नियमशास्त्र मोशेच्याद्वारे देण्यात आले होते; कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे झाली. 18देवाला कोणीही कधीहि पाहिले नाही. जो देवाचा एकुलता एक पुत्र पित्याच्या उराशी असतो त्याने त्यास प्रकट केले आहे.
सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र C, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष II.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क